प्रमोद पुराणिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपन्यांच्या वार्षिक सभांचा हंगाम सुरू झाला आहे. या सभांना उपस्थित राहणे हा बाजारातल्या काही भागधारकांचा आवडता उद्योग असतो. या सभांना उपस्थित राहणारे भागधारकांचा गोतावळा बहुढंगी-बहुरंगीच आहे. विविध वयोगटांचे, विविध जाती-धर्मांचे, सुशिक्षित, अल्पशिक्षित, सीए, चार्टर्ड सेक्रेटरी, गुंतवणूक सल्लागार, म्युच्युअल फंडांचे व्यवस्थापक, विश्लेषक, पत्रकार असा हा वर्ग आहे. एवढेच काय तर स्पर्धक कंपन्यांचे कर्मचारीदेखील हटकून वार्षिक सभांना हजेरी लावतात. अशा भागधारकांकडे खूप मोठ्या संख्येने समभाग असू शकतात किंवा समभागांची संख्या अगदीच किरकोळ असली तरी त्यांना या दिवशी विशेष ‘सन्मान’ आणि रुबाबदेखील प्राप्त झालेला असतो. कारण ‘अध्यक्ष महाराज’ अशा संबोधनासह एकदा सुरुवात केली की, कंपनीच्या अध्यक्षांना कंपनीबद्दल काहीही प्रश्न ते विचारू शकतात, असाच त्यांचा आविर्भाव असतो. व्यासपीठावर बसलेले कंपनीचे अध्यक्ष, कंपनीचे संचालक हेसुद्धा काही कच्च्या गुरूचे चेले नसतात. त्यांनाही वर्षानुवर्षे या खेळाचा अनुभव असतो. काही वेळा तर त्यांनीच काही भागधारकांना पढवून ठेवलेले असते.

यानिमित्ताने पटकन डोळ्यांसमोर येतात, त्या रिलायन्सच्या वार्षिक सभा. धीरुभाई अंबानी हाताच्या बाह्या सरसावून उभे राहिले की समोर गुजरातीत बोलणारा भागधारक असला तर गुजराती भाषेत त्याला उत्तर मिळायचे. कोणत्याही प्रश्नाला त्वरित, कागदपत्र बघायची गरज न लागता ते उत्तर देत. कधी कधी अध्यक्षांसमोर उजव्या आणि डाव्या बाजूला भागधारकांना बोलावण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी माइक ठेवलेले असत. एकदा डाव्या बाजूच्या भागधारकाने प्रश्न विचारला की, नंतर उजव्या बाजूच्या भागधारकाची प्रश्न विचारण्याची पाळी असायची.

एकदा टाटा स्टीलच्या वार्षिक सभेत, रूसी मोदी अध्यक्ष असताना एक धमाल घडली होती. समोर बसलेल्या भागधारकाने एक विचित्र प्रश्न विचारला होता. त्यावर मोदींनी आपल्या हाताचे पहिले बोट कानावरील भागात डोक्याला लावले आणि बोलणाऱ्याचा स्क्रू ढिला आहे हे सभागृहात पोहोचवले. प्रचंड मोठा हास्यकल्लोळ झाला. प्रश्न विचारणाऱ्याला कळले नाही, नेमके काय झाले ते. कारण तो सभासदांकडे तोंड करून मोठमोठ्याने बोलत होता. त्वरित रूसी मोदींनी बोट थोडे खाली घेतले, कान खाजवला आणि उत्तर दिले – ‘‘कान को खुजली आयी. कान भी मेरा, और खुजली भी मेरी.” टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

एखाद्या कंपनीची वार्षिक सभा जर दक्षिण मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात असेल तर सभा सुरू झाल्यानंतर एखादी महत्त्वाची माहिती मिळाली तर लगेच शेअर बाजारात जाऊन शेअर्सची विक्री अथवा खरेदी करणे याची काही भागधारकांना घाई व्हायची. त्यावेळेस भ्रमणध्वनी नव्हते, त्यामुळे वार्षिक सभा सोडून दलाल स्ट्रीटवर धाव घेतली जायची. नानी पालखीवाला ज्या टाटा कंपन्याचे अध्यक्ष होते, त्याचे अध्यक्षीय भाषण ऐकायला मिळणे हा एक वेगळाच आनंद होता, “एक टाटा ट्रक १२ माणसांना रोजगार देतो,” हे वाक्य तर अजूनही डोक्यातून जात नाही. हिंदुस्तान लिव्हर या कंपनीचे वर्षानुवर्षे अध्यक्ष असलेले टी. थॅामस यांचे अध्यक्षीय भाषण ऐकणे हासुद्धा एक अत्यानंद असायचा. पाठोपाठ मोठमोठ्या वर्तमानपत्रामध्ये संपूर्ण पानभर अध्यक्षीय भाषण आणि त्या शिवाय एखाद्या सभासदाने मागणी केली तर त्याला भाषणाची पुस्तिका पाठवली जात असे. लोकसभेच्या खासदाराला किमान काही शिक्षण असावे ही मागणी त्या काळात एखाद्या कंपनीचा अध्यक्ष करतो हे आज सांगूनसुद्धा खरे वाटणार नाही.

भागधारकांच्या सभेतल्या प्रश्नाने चिडून जाऊन रेमंड या कंपनीने आपले नोंदणीकृत कार्यालय झडगाव (रत्नागिरीजवळ) नेले आणि तेथे वार्षिक सभा घेण्यास सुरुवात केली. व्हीआयपी या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय सातपूर, नाशिकला असल्याने या कंपनीची वार्षिक सभा नाशिकला व्हायची. ४-५ कंपनी कर्मचारी, भागधारकांपैकी २-३ त्यात अस्मादिकही अशी सभा व्हायची. नाशिकला कारखाना असलेली परफेक्ट सर्कल ही कंपनी दरवर्षी भागधारकांना भक्ती टुरिझम घडवून आणायची. दादरहून दोन बसेस भरून नाशिकला यायच्या, त्यानंतर मग देवदर्शन झाल्यानंतर वार्षिक सभा व्हायची आणि मग संध्याकाळी मुंबईहून आलेल्या भागधारकांचे मुंबईस प्रयाण व्हायचे, आता या कंपनीने बाजारातील शेअरची नोंदणी रद्द केलेली आहे आणि नव्या रूपात नावसुद्धा बदलले आहे. ताळेबंदाचा उत्कृष्ट अभ्यास असलेले अनेक भागधारक मुंबईला होणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या वार्षिक सभांना उपस्थित राहून प्रश्न विचारायचे. त्यामुळे ताळेबंद अभ्यास कसा करावा यांचे प्रशिक्षण मिळायचे, यासाठीदेखील वार्षिक सभांना उपस्थित राहण्याची संधी सोडू नये.

‘सेबी’ने करोनाकाळात कंपन्यांना दूरचित्रसंवाद तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वार्षिक सभा आयोजित करण्यासाठी जी सवलत दिली होती, ती बंद व्हावी आणि पुन्हा जुन्या पद्धतीने वार्षिक सभा सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.

pramodpuranik5@gmail.com

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market people annual meetings of companies shareholders present print eco news ysh
First published on: 04-06-2023 at 11:27 IST