‘बाजारातील माणसं’ या साप्ताहिक लेखमालेत फक्त मोठ्या व्यक्तीवर लिखाण करणे हा हेतू नसून ज्या व्यक्तींनी शेअर बाजार तळागाळात पोहोचविण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले, त्यांच्या कामाचीसुद्धा दखल आवश्यक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवंगत जे. एच. दिवाण यांचे कार्यालय दलाल स्ट्रीटसमोर असलेल्या भूपेन चेंबर्स या इमारतीत होते. याच इमारतीत ‘बॅाम्बे शेअर होल्डर्स असोसिएशन’ वरच्या मजल्यावर आणि खालच्या मजल्यावर जे. एच. दिवाण, त्यांची पत्नी, मुलगा आनंद दिवाण आणि दोन कर्मचारी असे कार्यालय होते. दिवाण या व्यक्तीची एका वाक्यात ओळख म्हणजे – ‘हा माणूस शेअर बाजाराचा दिवाना होता.’

हेही वाचा – माझा पोर्टफोलियो/ संशोधन, नवोन्मेष आणि ‘ब्रॅण्ड मूल्य’- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड

त्यांच्या कार्यालयात त्यांच्या टेबलावर खुर्चीच्या मागे कंपन्यांचे वार्षिक अहवाल ढिगाने पडलेले असत. टेबलाजवळ असलेल्या सात-आठ खुर्च्यांमध्ये वेगवेगळी माणसे बसलेली असत, दिवाण यांच्या टेबलावरचा साधा जुना फोन वाजत असायचा. फोनवर आलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे आणि त्याचबरोबर कार्यालयात बसलेल्या माणसांबरोबर बाजारासंबंधी, कंपन्यांसंबंधी, कंपन्यांच्या अहवालासंबंधी, कंपन्यांच्या वार्षिक ताळेबंदाबाबत विचारांची देवाणघेवाण व्हायची. दर सोमवारची ‘शेअर मार्केट न्यूज लेटर’ आणि तीसुद्धा सायक्लोस्टाइल प्रती काढून प्रसिद्ध व्हायची, तर ‘मार्केट आऊटलुक’ हा अंकदेखील दरमहा प्रसिद्ध व्हायचा. दोन्हीची वार्षिक फी अतिशय नाममात्र होती; परंतु अत्यंत कमी खर्चात, अत्यंत चांगली माहिती उपलब्ध होत असे.
आर्थिक वर्तमानपत्रे त्या काळात होती; परंतु या वर्तमानपत्रात शेअर बाजारासंबधी जी माहिती उपलब्ध व्हायची, त्यापेक्षाही जास्त माहितीची गरज वाढू लागली होती. इंग्रजी किंवा मराठी वर्तमानपत्रापेक्षा ‘मुंबई समाचार’, ‘व्यापार’ ही दैनिके गुजराती भाषेत भरपूर माहिती उपलब्ध करून देत होती; पण वर्तमानपत्रे कंपन्यांची माहिती प्रसिद्ध करताना फारच सोवळेपणा दाखवत. अर्थात आता अगदी विरुद्ध दुसरेच टोक प्रसारमाध्यमांनी गाठलेले पाहायला मिळते. त्या वेळेस इतका सोवळेपणा होता की, एखाद्या कंपनीने एखादा नवीन प्रकल्प सुरू केला तर कंपनीचे नाव सोडून बाकी इतर माहिती प्रसिद्ध व्हायची आणि बातमीत एका खासगी कंपनीच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले असे छापले जायचे. आकाशवाणीवरच्या बातम्यांतसुद्धा कंपनीच्या नावाचा उल्लेख केला जात नसे. अशा वेळेस या सर्व प्रसारमाध्यमांमध्ये जी उणीव होती ती दिवाण भरून काढायचे. कंपन्याचे ताळेबंद, वार्षिक सभा, आतल्या गोटातील खबर इत्यादी खरपूस मजकूर ते देत असत.

खेडेगावात चावडीवर किंवा पारावर गावात काय घडले याच्या सर्व बातम्या चांगल्या किंवा वाईट चघळल्या जातात. तसाच प्रकार बाजारासंबंधीच्या सर्व बातम्या दिवाण यांच्या कार्यालयात चघळल्या जायच्या. धीरुभाई अंबानी यांच्यावर जे. एच. दिवाण सतत लिहायचे आणि स्वत:च म्हणायचे की, बाजारातले लोक मला धीरुभाईंचा चमचा म्हणतात.

हेही वाचा – बाजाररंग: बुडी, पडझड आणि आगामी काळ

त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या काही व्यक्तींच्या असे लक्षात आले की, अशा बातम्या छापणे हा एक मोठा व्यवसाय होऊ शकेल. म्हणून दारोदारी व्यायामाचे उपकरण – बुलवर्कर विकणाऱ्या रॅास डिस या व्यक्तीने त्यांच्या रॅास मुरारका फायनान्स या कंपनीमार्फत ‘मनी अपॉर्च्युनिटी’ नावाचा साप्ताहिक पेपर सुरू केला. त्याचा आदर्श घेत पुढे मग, ‘बिझनेस इंडिया’, ‘बिझनेस टुडे’, ‘फाॅर्च्युन इंडिया’, ‘दलाल स्ट्रीट जर्नल’, ‘कॅपिटल मार्केट’ अशी साप्ताहिके, पाक्षिक, मासिके प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली.

दिवाण यांच्या कार्यालयात व्ही. बी. पदोडे हे येत असत. आता नेमके आठवत नाही, परंतु ते प्राप्तिकर विभागात नोकरी करीत होते. त्यांनी नोकरी सोडून ‘दलाल स्ट्रीट जर्नल’ सुरू केले. भुता यांनी ‘प्रॅाफीट’ नावाने साप्ताहिक सुरू केले, तर ‘कॅपिटल मार्केट’ला जे. एम. फायनान्स सर्व्हिसेसचा पाठिंबा होता. या सुमारास अल्केश दिनेश मोदी या शेअर दलालांनीसुद्धा शेअर बाजाराविषयी ‘न्यूज लेटर’ प्रसिद्ध करण्यासाठी, तर पुढे शेअर बाजाराचे प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली.

जे. एच. दिवाण यांनी पुणे शेअर बाजाराची स्थापना करण्यात पुढाकार घेतला होता. २५ मे १९२१ रोजी जन्मलेले जे. एच. दिवाण १८ एप्रिल १९८६ रोजी हे जग सोडून गेले. शेअर बाजार सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना सलाम!

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Market people information on j h divan who tried to bring the stock market to common investors ssb
First published on: 27-03-2023 at 11:35 IST