मुंबईः आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (२० जानेवारी) शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी दमदार वाढ साधली. बीएसई सेन्सेक्स ४५४.११ अंशांनी वाढून, पुन्हा ७७ हजारांच्या पातळीवर विराजमान झाला, तर एनएसई निफ्टी १४१.५५ अंशांच्या मुसंडीसह २३,३४४.७५ वर बंद झाला. दोन्ही निर्देशांक प्रत्येकी ०.६० टक्क्यांच्या वाढीसह स्थिरावले. दिवसाच्या मध्यान्हाला सेन्सेक्सने तब्बल ७०० अंशांची मुसंडी दर्शविली होती. अनुकूल जागतिक संकेतांनी शेअर बाजाराला उत्साही दिशा दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर, त्यांच्या संभाव्य धोरणात्मक भूमिकेबाबत साशंकतेसह, गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा राहिला आहे. तरी पदग्रहणाआधी चीनशी सकारात्मक संवाद सुरू करण्याचे त्यांच्या आश्चर्यकारक आश्वासनाचे सोमवारी जागतिक बाजारात आशावादी पडसाद उमटले. बरोबरीने, अपेक्षेपेक्षा सरस तिमाही कामगिरी नोंदवणाऱ्या कोटक महिंद्र बँकेच्या नेतृत्वात बँकिंग शेअर्समधील दमदार तेजी, तसेच विप्रोच्या तिमाही कामगिरीनेही बाजारात आयटी शेअर्समध्ये खरेदीचे वातावरण तयार केले. चांगल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीज या दिग्गज शेअरमध्येही निरंतर खरेदी सुरू असून, गेल्या काही तीन दिवसांत त्याचा भाव ४.९ टक्क्यांनी वधारला आहे.

सोमवारच्या तेजीला चालना देणारे प्रमुख घटक

१. ट्रम्प २.० धोरणासंबंधी चिंता-हरण: ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी खूप चांगले संवाद राखण्याच्या केलेल्या घोषणेला जागतिक बाजारपेठांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्यामुळे या दोन जागतिक अर्थसत्तांमधील व्यापार तणाव कमी होण्याची शक्यता आहे. ताबडतोबीची प्रतिक्रिया म्हणजे हाँगकाँगचा हँग सेंग आणि जपानचा निक्केई २२५ या प्रमुख आशियाई निर्देशांकांनी सोमवारी तेजी नोंदवली.
तथापि आयात शुल्कात वाढीसंबंधित ट्रम्प यांच्या हालचालींवर जगाचे विशेष लक्ष असेल. त्यांनी सूत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी तब्बल १०० महत्त्वाच्या आदेशांवर स्वाक्षरी करण्याचे पूर्वसंकेत दिले आहेत. मार्टिन लूथर किंग ज्युनियर दिनानिमित्त सोमवारी अमेरिकी बाजारपेठा बंद राहतील. त्यामुळे ट्रम्प २.० धोरणाचे अमेरिकी आणि पर्यायाने त्यानंतर भारतीय बाजारावरही पूर्णपणे परिणाम हे मंगळवारनंतरच दिसून येतील.

२. बँकिंग शेअर्समध्ये तेजी: बँकिंग शेअर्सनी सोमवारच्या तेजीला प्रामुख्याने चालना दिली. चालक होते, ज्यामध्ये बँक आघाडीवर होती. एकत्रित निव्वळ नफ्यात १० टक्के वाढ नोंदविणाऱ्या डिसेंबर तिमाहीतील कामगिरीच्या परिणामी कोटक महिंद्र बँकेचा शेअर सोमवारच्या सत्रात ९.२ टक्क्यांनी वाढला. ही बाब सर्वच बँकांच्या शेअर्ससाठी सकारात्मक ठरली. त्यामुळे बँक निफ्टी Bank Nifty निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक वाढला. निर्देशांकात सामील १२ पैकी ११ शेअर्स हे वाढीसह बंद झाले. विप्रोच्या शेअरमध्ये ६.५ टक्के मू्ल्यवाढ झाली. निफ्टी ५० निर्देशांकांतील हे दोन सर्वाधिक वाढ साधणारे समभाग ठरले.

३. रुपयाची मूल्यवृद्धी: देशांतर्गत समभागांमधील वाढ आणि आशियाई चलनांमधील मजबूती लक्षात घेऊन भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत प्रारंभिक सत्रात १४ पैशांनी वधारून ८६.४६ वर पोहोचला. डॉलर निर्देशांक गेल्या काही दिवसांत प्रथमच, ०.२२ टक्क्यांनी घसरून १०९.१० वर आला. ब्रेंट खनिज तेलाच्या किमतीही ०.१२ टक्के अशा किंचित घसरून ८०.६९ डॉलर प्रति पिंपावर ओसरल्या. हे घटक बाजारात खरेदीपूरक सकारात्मकतेस पूरक ठरले.

शेअर बाजारात दिवसभर खरेदीचा सर्वव्यापी जोर राहिला. त्यामुळे १३ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी ११ हे चांगली वाढ साधत दिवसअखेर स्थिरावले. बँकिंग आणि आयटी निर्देशांकांसह, निफ्टी डिफेन्स निर्देशांक २.४३ टक्क्यांनी वधारला आणि त्यात सामील सर्व १६ शेअर्सचे भाव वाढले.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai stock market starts the week with a 450 points rise in sensex print eco news asj