बंधन बँक लिमिटेड
(बीएसई कोड ५४११५३)

प्रवर्तक: चन्द्रशेखर घोष
बाजारभाव: रु. २४९/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: बँकिंग
भरणा झालेले भागभांडवल: रु. १६१०.८६ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ३९.९९
परदेशी गुंतवणूकदार ३३.५३
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १२.४७
इतर/ जनता १४.०१
पुस्तकी मूल्य: रु. १२२/-
दर्शनी मूल्य: रु. १०/-
लाभांश: १५%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १२.६
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १९.८
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १३.५
ढोबळ/नक्त अनुत्पादित कर्जाचे प्रमाण: ६.८/२.२%
कॅपिटल ॲडेक्वेसी गुणोत्तर: १८.७%
नेट इंटरेस्ट मार्जिन: ७.३
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई): ६.६७
बीटा : १
बाजार भांडवल: रु. ४०,२०८ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३०४ / १८२

दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेली, बंधन बँक ही भारतातील एक उभरती वाणिज्य बँक आहे. सुरुवातीला ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था अर्थात ‘एनजीओ’नंतर बँकेतर वित्तीय संस्था (एनबीएफसी) आणि सध्या एक वाणिज्य बँक म्हणून कार्यरत असलेली बंधन बँक इतर बँकांच्या तुलनेत थोडी वेगळी आहे. बंधन बँकेचे मूळ सूक्ष्म आणि लघू वित्त (मायक्रो-फायनान्स) क्षेत्रातील असल्याने बँकेचा व्यवसाय मुख्यत्वे जिथे बँकिंग अथवा वित्तीय सेवा अत्यल्प आहेत त्या भागांत आणि छोट्या किंवा वंचित बाजारपेठांना सेवा देण्यावर केंद्रित आहेत. बँकेची भारतात ३५ राज्यांतील ६०० जिल्ह्यांत उपस्थिती आहे. ती सूक्ष्म बँकिंग आणि सामान्य बँकिंगसाठी खास तयार केलेली बँकिंग उत्पादने, सेवा तसेच मालमत्ता आणि दायित्व उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान करते. ३० जून २०२३ पर्यंत बँकेच्या भारतभरात १,५४२ शाखा होत्या.

हेही वाचा : बाजार रंग: सत्तावीस वजा सातचे कोडे !

व्यवसाय विस्तार करताना बँकेने आपल्या चालू खाते उत्पादनाअंतर्गत “Biz-Deluxe”, “Biz-Pro” आणि “Start-up” या नावाने तीन प्रकार सादर केले असून, त्यांत ‘कॅश@पीओएस’ सुविधा आणि ‘सॉफ्टपीओएस’ सेवादेखील सुरू केल्या आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेची कामगिरी तुलनेने खास नाही. या कालावधीत, बॅंकेने ४,९०८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७२१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो ५ टक्क्यांनी घटला आहे. मात्र गेल्या आर्थिक वर्षांत बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत उत्तम कामगिरी करून दाखवली होती. गेल्या वर्षी बँकेने १८,८९६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २,०२९ कोटींचा निव्वळ नफा कमावला होता. २०२१-२२ च्या तुलनेत तो २१७ टक्क्यांनी अधिक होता.

हेही वाचा : सलग तिसऱ्या सत्रात घसरण; ‘सेन्सेक्स’चे १,६०० अंशांनी, गुंतवणूकदारांचे साडेपाच लाख कोटींनी नुकसान

• वाढीव व्याज खर्च आणि घसरणीमुळे निव्वळ व्याज उत्पन्नात किरकोळ वाढ (०.८ टक्के) झाली असून ते २,४९१ कोटींवर पोहोचले आहे.
• सकल बुडीत कर्ज मालमत्ता (नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (जीएनपीए)/निव्वळ बुडीत मालमत्ता (नेट नॉन-परफॉर्मिंग ॲसेट) (एनएनपीए) गुणोत्तर अनुक्रमे ६.७६ टक्के व २.१८ टक्के आहे.
• किरकोळ मालमत्ता आणि व्यावसायिक बँकिंग यांच्या नेतृत्वाखाली नजीकच्या काळात प्रगती आणि ठेवी वाढतील अशी अपेक्षा आहे. चालू खाते-बचत खाते (कासा) गुणोत्तर आणि क्रेडिट खर्चामध्ये सुधारणा करताना, वित्तीय वर्ष २०२४ मध्ये निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) ७ ते ७.५ टक्के राखण्याचा व्यवस्थापनाला विश्वास आहे.
• बँकेचे उद्दिष्ट वार्षिक २० टक्के वाढीचे आहे. आगामी कालावधीत ठेवी कर्जापेक्षा जास्त दराने वाढतील, कासा प्रमाण ४० टक्के येईल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा : व्याजदर वाढीच्या भीतीने ‘सेन्सेक्स’मध्ये आठ शतकी घसरण, गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; निफ्टी २० हजारांखाली

बंधन बँकेने आपल्या मालमत्ता पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने गेल्या काही महिन्यांत मोठी प्रगती केली आहे. नजीकच्या काळात अनुत्पादित कर्जाचे वाढीव प्रमाण अर्थात ‘स्लिपेज’ कमी करून आणि वसुली सुधारून आपली पत-गुणवत्ता सुधारण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागात हळूहळू होत असलेली सुधारणा, धोरणात्मक विस्तार आणि सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानामध्ये सातत्याने होत असलेली गुंतवणूक बँकेच्या दीर्घकालीन विकासाला मदत करेल. बँक आपली विद्यमान भौगोलिक पोहोच वाढविण्यावर आणि देशभरातील इतर बँका नसलेल्या भागात आपली उपस्थिती वाढवण्यावर भर देत राहील. त्याच वेळी, परवडणाऱ्या गृहनिर्माण विभागात जोरदारपणे प्रवेश करण्यासाठी गृह फायनान्सच्या कौशल्याचा बँकेला उपयोग होईल.

हेही वाचा : पडत्या रुपयाला तारण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून ३० अब्ज डॉलर पणाला

सध्या २५० रुपयांच्या आसपास असलेला हा समभाग मध्यम कालावधीत चांगला फायदा मिळवून देऊ शकेल.
शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा समभाग सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने समभाग खरेदीचे धोरण ठेवावे.

Story img Loader