लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात सलग चौथ्या सत्रात तेजीची दौड कायम असून प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये २८६ अंशांची भर पडली. तर निफ्टी २५ हजारांच्या समीप जाऊन स्थिरावला. धातू, ऊर्जा, आणि वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातील तेजीने बाजाराला बळ प्राप्त झाले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ३७२.६४ अशा मजबूत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात करत ८१,८२८.०४ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दिवसअखेर २८५.९४ अंशांच्या कमाईसह, तो ८१,७४१.३४ या सर्वोच्च उच्चांकी पातळीवर स्थिरावला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९३.८५ अंशांची भर पडली आणि तो २४,९५१.१५ या ऐतिहासिक शिखरावर बंद झाला.

आणखी वाचा-ओला इलेक्ट्रिक ‘आयपीओ’द्वारे ६,१०० कोटी उभारणार! गुंतवणूकदारांना ७२ ते ७६ रुपये किमतीला समभाग खुले

देशांतर्गत बाजारात निफ्टी २५ हजार अंशांचा मानसशास्त्रीय उंबरठा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, विद्यमान आर्थिक वर्षात कंपन्यांची घटलेली कमाई आणि वाढलेल्या समभागांच्या मूल्यांकनामुळे त्यात अडसर निर्माण होत आहे. दुसरीकडे जागतिक पातळीवरील सकारात्मक कल आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्ह आणि रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढली आहे. बँक ऑफ जपानने व्याजदर वाढवले असून आता सर्व गुंतणूकदारांचे लक्ष (भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री जाहीर होणाऱ्या) अमेरिकी पतधोरणावर केंद्रित झाले आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा- बाजार-रंग : अर्थसंकल्पातील आकडेमोड जुळवताना

सेन्सेक्समध्ये जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी इंडिया, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, भारती एअरटेल, आयटीसी आणि टेक महिंद्र यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, इन्फोसिस, महिंद्र अँड महिंद्र, बजाज फायनान्स आणि ॲक्सिस बँकेच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी ५,५९८.६५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

सेन्सेक्स ८१,७४१.३४ २८५.९४
निफ्टी २४,९५१.१५ ९३.८५
डॉलर ८३.७२ -१ पैसा
तेल ८०.५१ १.८८