Zerodha CEO Nithin Kamath advice to stock traders on risk management : झिरोधाचे सीईओ नितीन कामत यांनी शेअर बाजारातील आठवडभरात झालेल्या मोठ्या उलथापालथीनंतर भारतातील रिटेल ट्रेडर्ससाठी एक महत्त्वाचा सल्ला देणारी पोस्ट शेअर केली आहे. कामत यांनी शनिवारी केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले की, कसे कमोडिटी मार्केट्स अशा प्रकारे कोसळले की, त्यामुळे ‘रिस्क मॅनेजमेंट सिस्टम’ देखील गोंधळून गेली, आणि ट्रेडर्स आणि ब्रोकर्स दोघेही संकटात सापडले.

कामत हे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले की, “सर्व मुख्य धातूंनी लोअर सर्किट गाठले, एका दिवसात ते जेवढे खाली जाऊ शकतात, तेवढे घसरले. चांदीचे दर ३० टक्क्यांनी, तर सोन्याचे दर १५ टक्क्यांनी कोसळले; इतर धातुंचीही हीच स्थिती होती. तर नॅचरल गॅस हा मात्र अप्पर सर्किटमध्ये होता,” असे कामत यांनी लिहिले.

तसेच त्यांनी अशा अस्थिर चढ-उतार हे दुर्मिळ पण विध्वंसक असतात असेही त्यांनी नमूद केले. “आमच्या १६ वर्षांच्या ऑपरेशन्सदरम्यान आम्ही असे काही यापूर्वी फक्त एकदाच पाहिले आहे, जेव्हा करोना काळात कच्च्या तेलाचा किमती निगेटिव्ह प्राइसवर पोहोचल्या होत्या. पण ती फक्त एकच कमोडिटी होती आणि तेव्हा आजच्यासारखे कमोडिटी ट्रेडिंग लोकप्रिय देखील नव्हते. काल कमोडिटीजमध्ये जे घडले, तेच इक्विटीजमध्येही घडू शकते; आपण हे २००८ मध्ये पाहिले आहे.”

झेरोधाचे प्रमुख कामत यांनी पुढे इशारा देखील दिला की, जेव्हा मार्केटमध्ये किंमती खूप वर-खाली होतात, “तेव्हा मार्जिन कॉल किंवा बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळत नाही.” पुढे त्यांनी सल्ला दिला की, त्याच पैशांनी ट्रेडिंग करा जो गमावणे तुम्हाला परवडू शकले. ते म्हणाले की, “जर तुम्ही जोखीमेचे व्यवस्थापन योग्यरित्या केले नाही, तर तुम्ही सलग १० वर्षे यशस्वीपणे ट्रेडिंग करूनही, एकाच दिवसात तुमचे सर्व काही गमावू शकता.”

विशेष बाब म्हणजे कामत यांनी दिलेला हा इशारा अगदी योग्य वेळेवर दिल्याचे दिसून आले. कारण त्यांनी हा इशारा दिल्याच्या अवघ्या एकाच दिवसानंतर, म्हणजेच रविवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे इक्विटीजमध्ये प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली. सेन्सेक्सने सुरुवातीला ८२७२६.६५ या एका दिवसातील उच्चांकी पातळीवर पोहोचल मात्र दुपारपर्यंत त्यात मोठी घसरण होऊन तो ८०९३१.४१ वर आला, म्हणजेच त्यात १,३३८.३७ अंकांची घट झाली. निफ्टीची स्थितीही अशीच होती, सकाळी १२५.२५ अंकांच्या वाढीसह २५४४०.९० वर असलेला निफ्टी दुपारी १२:३० पर्यंत ४९४.४० अंकांनी घसरून २४८२६.२५ वर पोहोचला.