NSE IX global access platform for international investing: एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज (NSE IX) आपल्या ‘ग्लोबल ॲक्सेस’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून येत्या सहा महिन्यांत भारतीय गुंतवणूकदारांना ३० हून अधिक आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करण्याची सेवा उपलब्ध करून देणार आहे.

यातील पहिल्या टप्प्यात अमेरिकेचा शेअर बाजार आधीच खुला करण्यात आला आहे, अशी माहिती एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. बालसुब्रमण्यम यांनी दिली.

“सुरुवातीला, आम्ही तातडीने अमेरिकन बाजारांसाठी थेट सेवा सुरू केली आहे, जो गुंतवणूकदारांना अधिक आकर्षित करणारा आणि मोठा शेअर बाजार आहे. परंतु, मला असे वाटते की येत्या तीन ते सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना जगभरातील ३० हून अधिक बाजारांमध्ये गुंतवणूक करता येईल”, असे व्ही. बालसुब्रमण्यम यांनी मनीकंट्रोलला सांगितले.

‘ग्लोबल ॲक्सेस’ प्लॅटफॉर्मची रचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीमच्या (LRS) नियमांच्या अंतर्गत परकीय गुंतवणुकीला सुलभ करण्यासाठी करण्यात आली आहे.

लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम योजनेअंतर्गत, निवासी व्यक्तींना परकीय गुंतवणुकीसह परवानगी असलेल्या व्यवहारांसाठी प्रति आर्थिक वर्ष २,५०,००० अमेरिकन डॉलर्सपर्यंतची रक्कम परदेशात पाठवण्याची परवानगी आहे.

बालसुब्रमण्यम यांनी यावर भर दिला की, नोंदणीपासून ते ट्रेडिंगपर्यंतची संपूर्ण रचना प्रचलित नियमांचे पालन करेल अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे. “ही संपूर्ण गुंतवणूक रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत होईल. प्रत्येक वैयक्तिक गुंतवणूकदार एका वर्षात २,५०,००० डॉलर्सपर्यंतची रक्कमेची परदेशात गुंतवणूक करू शकतो”, असे त्यांनी सांगितले.

छोट्या गुंतवणूकदारांसाठी फ्रॅक्शनल इन्व्हेस्टिंग (अंशतः गुंतवणूक)

‘ग्लोबल ॲक्सेस’ प्लॅटफॉर्मचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘फ्रॅक्शनल ट्रेड्स’ (अंशतः गुंतवणूक) करण्याची सुविधा, ज्यामुळे गुंतवणूकदारांना महागड्या जागतिक शेअर्सचा पूर्ण भाग खरेदी करण्याऐवजी त्याचा काही हिस्सा खरेदी करण्याची मुभा मिळते.

बालसुब्रमण्यम यांनी सांगितले की, हे वैशिष्ट्य विशेषतः जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

“उदाहरणार्थ, ॲपलचा शेअर २७२ डॉलर्सचा आहे. जर आपल्या खात्यात ३१ डॉलर्स असतील, तर आपण त्याचे विभाजन करून तो खरेदी करू शकतो”, असे त्यांनी सांगितले.

“म्हणजेच, जर तुम्हाला ५ डॉलर्स किमतीचे ॲपलचे शेअर्स खरेदी करायचे असतील, तर तुम्हाला ५ डॉलर्स किमतीचे ॲपलचे शेअर्स खरेदी करता येऊ शकतात. तुम्हाला त्याचा एक फ्रॅक्शनलाइज्ड शेअर (Fractional Part) मिळेल आणि तो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असेल”, असे त्यांनी पुढे नमूद केले.