Pakistan Stock Exchange Crash: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घटना घडली. या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारत सरकारने २३ एप्रिल रोजी भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली. तसेच सिंधू पाणी करारही स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणि बिघडत्या परिस्थितीचा परिणाम पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर होत असल्याचं दिसून येत आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज पाकिस्तानचा शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. एवढंच नाही तर यानंतर पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा फटका पाकिस्तानला बसल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त मिंटने दिलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट बंद पडली असून पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर ‘We’ll be back soon’ असा मेसेज दिसत आहे. तसेच पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजची (पीएसएक्स) वेबसाईट पुढील सूचना मिळेपर्यंत देखभालीखाली असल्यामुळे बंद असल्याचं कारण देण्यात आलं आहे. तसेच पीएसएक्स स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट पुन्हा लवकरच सुरु होईल असंही म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या शेअर बाजारात घसरण
दरम्यान, पाकिस्तानच्या शेअर बाजाराज मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. आज १०० निर्देशांक (KSE-१००) पहिल्या पाच मिनिटांत दोन टक्क्यांहून अधिक किंवा २,५०० अंकांनी घसरून १,१४,७४०.२९ वर पोहोचला. जरी निर्देशांकाने काही तोटा भरून काढला असला तरी दुपारी ३ वाजेपर्यंत १,५३२.४२ अंकांनी किंवा १.३१ टक्क्यांनी घसरून ११५,६९३.७२ वर पोहोचला होता.
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या?
पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट बंद पडल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी एक्सवर (ट्विटर) वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझर्सने म्हटलं आहे की, “शेअर विक्री थांबवण्याचा चांगला मार्ग”, तर दुसऱ्या एकाने म्हटलं की, “पाकिस्तानमध्ये स्टॉक एक्सचेंज देखील आहे?” तसेच आणखी एकाने म्हटलं, “पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्याचा परिणाम”, आणखी एका युझर्सने आश्चर्य व्यक्त करत म्हटलं की, “पाकिस्तानमध्ये स्टॉक एक्सचेंज आहे??? ही बातमी योग्य आहे.” दरम्यान, दुसऱ्या एका युझर्सने म्हटलं की, “पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट हॅक झाली असेल?”