उद्योगपतींची आत्मचरित्रे वाचायला सुरुवात केली की, अर्थकारण, राजकारण, समाजकारण या सर्व गोष्टींचे एवढे प्रचंड संदर्भ सापडतात की, माणूस आश्चर्यचकितच होतो. शंतनुराव किर्लोस्कर यांचे चरित्र अनेक संघर्षाच्या प्रसंगांनी आकाराला आलेले आहे. काटे आणि फुले या आत्मचरित्राअगोदर अनेक वर्षांपूर्वी जेट युगातला मराठी माणूस हे शंतनुराव किर्लोस्करांनी लिहिलेले पुस्तक वाचलेले होते. रोखठोक बोलणारे, यंत्रांना बोलके करणारे शेती आणि शेतकरी, शेतीसाठी लागणारी हत्यारे, उपकरणे घडवणारे, ती कशी तयार करता येतील याचा सतत विचार करणारे शंतनुराव हे एक वेगळेच रसायन होते. एक मराठी उद्योजक अनेक संकटावर मात करतो, भविष्याची काळजी करू नका, भविष्य निर्माण करा असे सांगतो. बाजाराच्या संबंधाने विचार करायचा तर कमिन्सच्या शेअर विक्रीने १९६२ मध्ये २०० पट जास्त भरणा होणारी मागणी मिळवली होती. हे आज वाचताना आश्चर्याचा धक्का बसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किर्लोस्कर उद्योग समूहाची पहिली कंपनी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड वर्ष १९२० मध्ये सुरू झाली. वर्ष १९४६ ला किर्लोस्कर इलेक्ट्रिक बंगळूरुला सुरू झाली. तर मशिनरी तयार कंपनी म्हैसूर किर्लोस्कर म्हणून अस्तित्वात आली. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स या कंपनीचा इतिहास तर फारच संघर्षाचा आहे. आज वाचताना आश्चर्य वाटेल, परंतु किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कारखान्याला विरोध झाला होता. निवृत्तीधारकांचे आणि विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात कारखाने नकोत असा विचार पुढे आलेला होता. मात्र सर्व अडचणींवर मात करून शंतनुरावांनी किर्लोस्कर ऑइल इंजिन्स या कंपनीसाठी पुण्याला जागा खरेदी करून जुलै १९४७ ला बांधकाम सुरू केले. वर्ष १९४९ ला उत्पादन सुरू झाले. २५ एप्रिल १९४९ ला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील उद्योगमंत्री यांच्या हस्ते कारखान्याचे उद्घाट्न झाले. कारखान्यात एवढ्या दर्जेदार इंजिनाची निर्मिती झाली की, वर्ष १९४९ ला तयार झालेले इंजिन वर्ष १९७९ पर्यंत व्यवस्थित चालू होते. जानेवारी १९५० ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कारखान्याला भेट दिली.

हेही वाचा : वित्तरंजन : सीआरबी घोटाळा (भाग १)

उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ अर्थात फिक्की या संस्थेचे अध्यक्षपद वर्ष १९६५ शंतनुराव किर्लोस्कर यांच्याकडे आले. या संस्थेच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना सरकारची औद्योगिक धोरणासंबधी कानउघाडणी करण्यास शंतनुराव घाबरले नाहीत. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी या तत्कालीन तिन्ही पंतप्रधानांसोबत शंतनुरावांचे घनिष्ठ संबंध होते. शंतनुरावांनी एक धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे वर्ष १९६४ ला जर्मनीत जाऊन जर्मन कंपनी खरेदी केली. भिवंडीची दांडेकर मशिनरी आणि जर्मन कंपनी या एकमेकांना पूरक कंपन्या ठरल्या.

शंतनुराव काळाच्या पुढचा विचार करणारे होते. यामुळे त्या काळातल्या अनेक सामाजिक संघर्षाना सामोरे जाण्यास शंतनुराव कधीही घाबरले नाहीत. महात्मा गांधी यांच्या अस्पृश्यता निवारण या विचारसरणीला शंतनुरावांनी पाठिंबा दिला. मात्र देशांतर्गत उद्योगवाढीबाबत महात्मा गांधीजी यांचे अनेक विचार चुकीचे असल्याचे सांगून, त्याला विरोध करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. १९६५ ला शंतनुरावांना सरकारने पद्मभूषण हा सन्मान दिला. भारत-पाकिस्तानच्या वर्ष १९६५ ला झालेल्या युद्धात भारतीय उद्योगाने तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना केवळ पाठिंबाच दिला नाही तर अनेक गरजांसाठी उद्योजक मदतीसाठी पुढे आले. त्यासाठीदेखील शंतनुराव यांनीच पुढाकार घेतला होता.

हेही वाचा : ह्युंडाईची भारतात ‘महा-आयपीओ’ची तयारी; गुंतवणूकदारांकडून तब्बल २५ हजार कोटी उभारण्याचे लक्ष्य

कोणताही उद्योजक आणि त्यांचा प्रत्येक निर्णय यशस्वी होईलच असे नाही. नियोजन मंडळाने चुकीचे नियोजन केले आणि ऑइल इंजिनची मोठ्या प्रमाणावर आयात करण्याची संधी काहींना साधून घेतली. अशावेळेस किर्लोस्कर ऑइल इंजिन्सवर संकट कोसळले. मात्र कामगारांना विश्वासात घेऊन शंतनुराव त्या संकटालाही धैर्याने सामोरे गेले. लक्ष्मणराव यांनी शंतनुरावांना (आपल्या मुलाला) अमेरिकेत एमआयटी येथे शिक्षणासाठी पाठविणे हा धाडसी निर्णय होता, परंतु तो निर्णय योग्य ठरला.

शंतनुराव यांना आयुष्यात अनेक अपमानास्पद प्रसंगाना तोड द्यावे लागले. परवाना मिळण्यासाठी अडीच तास लाकडी खोक्यावर बसून राहावे लागले. खुर्ची उपलब्ध नसते हे वाचताना अंगावर काटे उभे राहतात. किर्लोस्कर ट्रॅक्टर्स लिमिटेड यशस्वी होऊ शकली नाही. त्याची अनेक कारणे होती. परंतु तो इतिहास बाजूला ठेवलेला बरा. भारतावर ब्रिटिशांनी राज्य केले. आपल्या उत्पादनाला स्पर्धक निर्माण होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले. परंतु अशावेळेस काही इंग्लंडच्या कंपन्यानंतर काही जर्मन कंपन्या अशाप्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांशी आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याचे करार करून शंतनुरावांनी सुरू केलेला छोटा उद्योग लक्ष्मणरावांनी खूप मोठा केला हे नक्की. शेवटी १९९४ ला शंतनुराव किर्लोस्कर हे जग सोडून गेले. ३० वर्षांनंतर आजसुद्धा ‘बाजारातील माणसं’ या लेखमालेत बजाज, कल्याणी, किर्लोस्कर या नावांचा उल्लेख करावाच लागतो, त्याशिवाय हा समृद्ध उद्योजकीय आणि त्यांनी स्वकर्तृत्वातून फुलवलेला इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.

हेही वाचा : Money Mantra : माझा पोर्टफोलियो :  पोर्टफोलियोची शान.. एशियन पेंट्स लिमिटेड

“किर्लोस्कर उद्योग समूह महाराष्ट्राच्या फक्त औद्योगिकीकरणात अग्रेसर होता असे नाही तर साहित्य, संस्कृती, नाटक अशा अनेक ऐवजांनी किर्लोस्करवाडीचा इतिहास गच्च भरला आहे. परंतु जागेची मर्यादा लक्षात घेऊन औद्योगिकीकरण एवढ्याच विषयावर लक्ष केंद्रित केले आहे.” – प्रमोद पुराणिक

pramodpuranik5@gmail.com

लेखक नाशिकस्थित अर्थअभ्यासक

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pioneer of make in india shantanurao kirloskar mmdc css
First published on: 12-02-2024 at 07:15 IST