एप्रिल १९९८ ला ८७ व्या वर्षी रॉजर मरे निधन पावला. बँकर्स ट्रस्ट कंपनीच्या इतिहासातला तो पहिला तरुण उपाध्यक्ष होता. वाचक सहजपणे विचारेल की, यात विशेष असे काय? परंतु या कारकीर्दीनंतरचा त्याचा इतिहास जगातील बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो यासाठी महत्त्वाचा की, बेन्जामिन ग्रॅहम निवृत्त झाल्यानंतर रॉजर मरेने ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ हा विषय शिकवण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रथम बेन्जामिन ग्रॅहम, त्यानंतर डेविड ॲण्ड डॉड आणि त्यानंतर रॉजर मरे असे संयुक्त लेखक ज्या पुस्तकाचे झाले ते पुस्तक म्हणजे ‘सिक्युरिटी ॲनालिसिस’. या पुस्तकाला गुंतवणूक शास्त्राचे बायबल किंवा भारतीयांना अनुरूप उपमा द्यायची तर या पुस्तकाला बाजाराची भगवद्गीता म्हणता येईल. प्राध्यापक मंडळीचा शेअर बाजाराशी काय संबंध, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना रॉजर मरे हे उत्तर आहे. कारण त्याने अगोदर नोकरी केली आणि त्यानंतर गुंतवणूकशास्त्र आणि त्यात पुन्हा मूल्यावर आधारित गुंतवणूक हा विषय शिकविण्यास सुरुवात केली. हेही वाचा.वीजनिर्मिती क्षेत्रातील तरुण ‘उर्जावान’ कंपनी : अदानी पॉवर लिमिटेड अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी याने महत्त्वाचे योगदान दिले आणि ते म्हणजे १९७४ ला अमेरिकेत आयआरआयएसए हा कायदा जन्मास आला. एम्प्लॉई रिटायरमेंट इन्कम सिक्युरिटी ॲक्ट ही संकल्पना त्यानेच मांडली. नुसतीच मांडली नाही तर या संकल्पनेचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर कायदा मंजूर होऊन, ही संकल्पना कायदा म्हणून अस्तित्वात आली. अत्यंत मानाचे असे निकोलस् मोलोडोवस्की अवॉर्ड त्याला १९९३ ला मिळाले. ते अवॉर्ड १९९३ पर्यंत फक्त ११ वेळा वेगवेगळ्या व्यक्तींना मिळाले होते. ज्यांनी गुंतवणूकशास्त्र मोलाची भर घातली अशी अगोदरची काही नावं सांगितली तरी याचे महत्त्व समजेल. हे अवॉर्ड अगोदर बेन्जामिन ग्रॅहमला मिळाले होते तर नोबेल पारितोषिक मिळालेल्या विल्यम शार्प याला हे अवॉर्ड त्याच्या नंतर म्हणजेच २७ मे २०२४ मिळाले. या सगळ्याची सुरुवात अमेरिकेतल्या येल युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्र या विषयाचे शिक्षण घेत असताना झाली. तेथे उन्हाळी सुट्टीतला प्रकल्प म्हणून त्याला मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांच्या सांगण्यावरून त्याने एक प्रोजेक्ट तयार केला. आणि त्यासाठी त्याला विशेष गुण मिळाले. हा अभ्यास १९३० च्या उन्हाळी सुट्टीत केलेला होता. असा विश्लेषणात्मक अहवाल त्याने प्रथमच बनवलेला होता. परंतु त्या अभ्यासात त्याने जे निष्कर्ष काढले होते त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हता. मात्र हार्वर्ड इकॉनॉमिक सोसायटी या संस्थेने एका नव्या विषयाला सुरुवात झाली आहे असे मान्य केले होते. हेही वाचा.घोटाळा, महिला आणि मृत्युदंड (भाग १) वर्ष १९३०, अमेरिकेच्या इतिहासात हे फारच महत्त्वाचे वर्ष. कारण १९२९ ला अमेरिकी बाजार कोसळलेला होता. परंतु तेजी-मंदी ही बाजारातली चक्रे कायमच असतात आणि त्यामुळे त्यानंतर अशा काही घटना घडल्या, ज्या त्या काळात अनाकलनीय होत्या. किंवा असे काही घडू शकते असे भाकीतसुद्धा कोणालाही करता आले नव्हते. काय झाले होते तर १९३१ मध्ये? ब्रिटनने गोल्ड स्टँडर्ड मोडीत काढले होते. जर्मनीतल्या बँका कोसळल्या होत्या. आणि अशा काळात रॉजर मरेने मिसोरी पॅसिफिक कन्व्हर्टिबल फ्रिफर्ड स्टॉक या शेअर्सचे विश्लेषण केले. विशेषतः परिवर्तनीय शेअर असल्याने ही संकल्पना नवीन होती. मात्र त्यानंतर हा शेअर कोसळला आणि त्या कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. व्यवसायातून शिक्षण क्षेत्रात आलेल्या मरेला हा मोठा धक्का होता. पुन्हा शिक्षण क्षेत्रातून व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश मिळविणे आवश्यक झाले होते. कारण त्याला १९३४ ला लग्नासाठी पैशाची जमवाजमव करणे आवश्यक होते. त्या काळात बँकर्स ट्रस्ट कंपनी त्याला आठवड्याला २५ डॉलर पगार देत होती. परंतु बँकेने स्पष्ट सांगितले होते की, तुला तुझ्या लायकीपेक्षा फारच जास्त पगार बँक देत आहे. तुझ्या नोकरीची बँकेला काहीही आवश्यकता नाही. फक्त जुने कर्मचारी सांभाळायचे कारण ते संस्थेशी एकनिष्ठ आहेत म्हणून त्यांनी याला सांभाळले. १९३२ ला बँकेने तीन व्यक्तींना नोकरीला ठेवले प्रत्यक्षात त्यांच्याकडे ३० ट्रेनी असायचे. परंतु अशा वेळेस मरेने आपले कौशल्य सिद्ध केले. कोर्टीने ब्राऊन हा कोलबिंया बिझनेस स्कूल या संस्थेचा डीन झालेला होता. आणि त्याने एक दिवस मरेला त्या संस्थेचा असोसिएट डीन म्हणून येण्याची ऑफर दिली. मरे या संस्थेशी जोडला गेला. त्याला मात्र अशी जबाबदारी उचलायला लागली की, जी जबाबदारी बेन्जामिन ग्रॅहमने वर्षानुवर्षे सांभाळली होती. बेन्जामिन ग्रॅहमला निवृत्त होऊन कॅलिफोर्नियाला जायचे होते. त्यामुळे ग्रॅहमबरोबर सेमिनारला बसणे, ग्रॅहम कसे शिकवतो हे जाऊन बघणे हा अनुभव त्याच्यासाठी विलक्षण होता. त्या अगोदर बँकर्स ट्रस्ट या संस्थेत मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्याला अनेक आर्थिक अहवाल प्रसिद्ध करावे लागत होते. त्यामुळे हे काम त्याच्या दृष्टीने सोपे होते आणि त्यामुळे संस्थेत त्याला विशेष सन्मान मिळू लागला होता. हेही वाचा.रिझर्व्ह बँकेच्या धोरण कठोरतेवर नाराजी; ‘सेन्सेक्स’ची ५८१ अंशांनी घसरंगुडी बेन्जामिन ग्रॅहम शिकविण्यात अतिशय उत्कृष्ट होता. परंतु त्याला लिहिण्याचा कंटाळा होता. त्यामुळे हे काम डेविड एल. डॉड करायचा. यामुळे हा बेन्जामिन ग्रॅहमच्या वर्गात बसायचा व्यवस्थित त्याचे शिकवणे लिहून घ्यायचा. आपल्या वर्गात ग्रॅहमने अनेक कंपन्यांची अनेक उदाहरणे शिकवता शिकवता दिलेली असायची. त्यांचे सर्व पुढचे संशोधन करण्याचे काम डेविड एल. डॉडने केले. आणि म्हणून १९३४ ला सिक्युरिटी ॲनालिसिस हे गुंतवणूक शास्त्राचे बायबल निर्माण झाले. हेही वाचा.जगभरातील बाजारांच्या पुनर्उभारीसह; ‘सेन्सेक्स’ची ८७५ अंशांनी उसळीआजसुद्धा या पुस्तकाचे महत्त्व नाकारता येत नाही. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. बॉण्ड्स हेच फक्त गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यम आहे, शेअर्स हा सट्टा आहे असा त्यावेळेस समज होता. शेअर बाजार अभ्यास करण्यासाठी जे स्टँडर्ड टेक्स्ट बुक होते ते चेंबरलेन ॲण्ड एडवर्डस यांचे होते. आणि याचवेळेस मूल्यावर आधारित गुंतवणूक या संकल्पनेचा उदय होण्यास सुरुवात झाली आणि आजसुद्धा मूल्य विरुद्ध वृद्धी हा बाजाराचा संघर्ष वर्षानुवर्षे अखंडपणे सुरू आहे. बाजारातली माणसं यात बाजारात खेळणारे जेवढे महत्त्वाचे तेवढेच महत्त्व या शास्त्राचे आणि त्यातील संकल्पनाची निर्मिती करणाऱ्या विविध चिंतकांचे. त्यांना सलाम केलाच पाहिजे!