मुंबई : गेल्या पाच सत्रातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांनी घसरलेल्या किमतीत समभाग खरेदीला प्राधान्य दिल्याने बाजार सप्ताहअखेर सकारात्मक पातळीवर बंद झाला. तेल वितरण कंपन्या आणि बँकांच्या समभागांमध्ये सर्वाधिक खरेदी बळावल्याने सेन्सेक्स ७५ अंशांनी वधारला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा समभाग ७५.७१ अंशांनी वधारून, ७३,९६१.३१ पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. सत्रादरम्यान, त्याने ७४,४७८.८९ अंशांचा उच्चांक आणि ७३,७६५.१५ अंशांची नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४२.०५ टक्क्यांची घसरण झाली आणि तो २२,५३०.७० अंशांवर स्थिरावला.

हेही वाचा…माझा पोर्टफोलियो : अत्यल्प कर्जदायित्व, मूल्यांकनही आकर्षक!

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच्या अस्थिरतेमध्ये प्रमुख निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्स गेल्या पाच सत्रात २ टक्क्यांहून अधिक घसरले. सर्वांचे लक्ष आता शनिवारी संध्याकाळच्या मतदानोत्तर कौल चाचणीकडे लागले आहे. निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी घसरलेला मतदानाचा टक्का आणि भांडवली बाजारातील तीव्र चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांना सावध भूमिका घेण्यास प्रवृत्त केले आहे. बाजारातील कोणत्याही आकस्मिक प्रतिक्रियांपासून गुंतवणूक सुरक्षित राखण्यासाठी गुंतवणूकदार मजबूत क्षेत्रे आणि मूलभूतदृष्ट्या प्रबळ असलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये त्यांची गुंतवणूक करत आहेत, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँकेचे समभाग तेजीत होते. तर, नेस्ले इंडिया, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, मारुती सुझुकी इंडिया, इन्फोसिस, ॲक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हरच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजारच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी ३,०५०.१५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

हेही वाचा…लोहपोलाद क्षेत्र: चढउतार, व्यवसाय संधी आणि गुंतवणूक

बाजार आकडेवारी

सेन्सेक्स ७३,९६१.३१ ७५.७१ (०.१०%)
निफ्टी २२,५३०.७० ४२.०५ (०.१९%)

डॉलर ८३.४९ २०
तेल ८१.५३ -०.४०