लोकसत्ता बाजाराची निराशा झाली आणि त्या परिणामी मंगळवारी मतमोजणीच्या दिवशी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने तब्बल ६,००० अंशांहून अधिक घसरण अनुभवली. गेल्या चार वर्षांतील एका सत्रात झालेल्या या सर्वात मोठ्या घसरणीने, गुंतवणूकदारांना अपेक्षाभंगाच्या हादऱ्यासह, तब्बल ३१ लाख कोटींचा नफा लयाला गेल्याचे हताशपणे पाहावे लागले.

मंगळवारच्या धक्कादायक पडझडीच्या सत्रात, सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसअखेर प्रत्येकी जवळपास ६ टक्क्यांच्या घसरणीसह स्थिरावले. सोमवारच्या सत्रात मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला तिसऱ्यांदा मोठा विजय मिळण्याचा अंदाजाच्या बाजारात उत्साहात संचारला होता आणि तेजीच्या वादळात निर्देशांकांनी विक्रमी उच्चांकी पातळीवर मुसंडी मारला होती. त्या उन्मादी उत्साहाच्या विपरीत सेन्सेक्स ४,३८९.७३ अंशांनी म्हणजेच ५.७४ टक्क्यांनी घसरून, ७२,०७९.०५ या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर मंगळवारी बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्सने ६,२३४.३५ अंश म्हणजेच ८.१५ टक्के घसरून ७०,२३४.४३ या पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक दिवसअखेर १,३७९.४० अंशांनी (५.९३ टक्के) २१,८८४.५० पातळीवर बंद झाला. दिवभरातील सत्रात त्याने १,९८२.४५ अंश गमावत २१,२८१.४५ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. याआधी २३ मार्च २०२० रोजी करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी टाळेबंदीच्या घोषणेमुळे निर्माण झालेल्या घबराटीने सेन्सेक्स आणि निफ्टी त्या दिवशी सुमारे १३ टक्क्यांनी घसरले होते.

हेही वाचा >>>अदानी समूहाला पडझडीत ४.०७ लाख कोटींची झळ

मतमोजणीच्या कलावरून, भाजप हा देशातील सर्वात मोठा ठरला आहे. मात्र पूर्ण बहुमताचा आकडा गाठता न आल्याने सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना महायुतीतील इतर भागीदारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी, विद्यमान केंद्र सरकारच्या धोरणांची गती बाधित होण्याची शक्यता आहे. या धास्तीने मंगळवारच्या सत्रात सरकारी मालकीच्या कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, वीज, ऊर्जा, तेल आणि वायू कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नफावसुली झाली.

सेन्सेक्समधील ३० समभागांमध्ये एनटीपीसी सर्वाधिक १५ टक्क्यांहून अधिक घसरला, त्यापाठोपाठ स्टेट बँक १४ टक्क्यांहून अधिक, लार्सन अँड टुब्रो १२ टक्क्यांहून अधिक आणि पॉवर ग्रिड १२ टक्क्यांहून अधिक कोसळला. टाटा स्टील, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएसडब्ल्यू स्टील हे दिग्गज समभागही पिछाडीवर होते. दुसरीकडे या पडझडीतही, हिंदुस्थान युनिलिव्हरने ६ टक्क्यांनी झेप घेतली, तर नेस्ले ३ टक्क्यांनी वधारला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स आणि सन फार्मा हे समभागदेखील लाभकारक राहिले. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्र (एफएमसीजी) वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. अदानी समूहाच्या समभागांनादेखील सर्वाधिक फटका बसला असून त्यांचे एकत्रित बाजार भांडवल सुमारे ४ लाख कोटींनी घसरले.

याआधी मतमोजणीला बाजार कल कसा होता?

– मतमोजणीच्या दिवशी आजच्या प्रमाणे सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांच्या घसरणीचा प्रसंग १९९९ नंतर एकदाच घडला आहे.

– पहिला प्रसंग, २३ मे २०१९ रोजी (मोदी २.० पर्व) सेन्सेक्स २९८.३२ अंशांनी घसरून ३८,८११.३९ पातळीवर स्थिरावला, तर निफ्टी ८०.८५ अंशांनी घसरून ११,६५७.०५ वर स्थिरावला होता.

– त्याआधी, १६ मे २००९ रोजी (यूपीआय-२ पर्व) सेन्सेक्स-निफ्टी तब्बल १७ टक्क्यांहून अधिक वधारले होते. सत्रांतर्गत निर्देशांकांना दोनदा वरचे सर्किट लागून, उर्वरित दिवसासाठी बाजारातील व्यवहार स्थगित करावे लागण्याचा हा प्रसंगही विरळाच.

क्षेत्रनिहाय घसरण

० व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप ८.०७ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ६.७९ टक्क्यांनी घसरले. निर्देशांकांमध्ये युटिलिटीज १४.४० टक्के, वीज १४.२५ टक्के, तेल आणि वायू १३.०७ टक्के, सेवा १२.६५ टक्के, भांडवली वस्तू १२.०६ टक्के, ऊर्जा ११.६२ टक्के आणि धातू क्षेत्र ९.६५ टक्क्यांनी घसरले.

मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध ३,३४९ कंपन्यांचे समभाग घसरले, तर ४८८ कंपन्यांचे समभाग वधारले. त्यापैकी २९२ कंपन्यांच्या समभागांनी ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळीला स्पर्श केला, तर १३९ कंपन्यांच्या समभागांनी पडझडीतही वर्षभरातील उच्चांक गाठला.

विश्लेषकांचे म्हणणे काय?

येणारे सरकार कोणाचेही असो, विकास समर्थक धोरणे, टिकाऊ पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक, वित्तीय तूट कमी करण्याचे उपाय या गोष्टी अव्याहत सुरू राहिल्या तर त्याचे खूप चांगले परिणाम दिसतील. आम्हाला विश्वास आहे की सत्तेवर कोणीही आले तरी येत्या काही वर्षांत हे सुरूच राहील.- यीफार्न फुआ, विश्लेषक, एस अँड पी ग्लोबल रेटिंग

नवीन सरकारने, भारताला भरभराट सुरू असलेली डिजिटल अर्थव्यवस्था बनवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित दुसऱ्या पिढीतील सुधारणांची कास धरणे अपेक्षित आहे. व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी, देशांतर्गत गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आवश्यक सुधारणांना गती दिली पाहिजे आणि सरकारने रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.- रोमल शेट्टी, मुख्याधिकारी, डेलॉइट दक्षिण आशिया

भारताच्या आर्थिक ताकदीविषयी दीर्घकालीन चित्र अबाधित आहे, परंतु एनडीए आघाडी सरकारमुळे, सध्याचीच आर्थिक धोरणे सुरू राहतील, पण त्यांची गतिशीलता कमी होण्याची अपेक्षा आहे. यातून बाजारात अल्पकालीन अस्थिरता कायम राहू शकते. परंतु गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टिकोनातून खरेदीच्या संधींकडे पाहावे.- ए. बालसुब्रमण्यन, व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लि.

गुंतवणूकदार ३१ लाख कोटींनी होरपळले!

मंगळवारच्या सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदार सुमारे ३१ लाख कोटींनी गरीब झाले. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल ३१,०७,८०६.२७ कोटी रुपयांनी घसरून ३९४.८३ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारच्या सत्रातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारभांडवलात १३.७८ लाख कोटींची भर पडली होती आणि ते ४२५.९१ लाख कोटींच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने पहिल्यांदा कौल आला त्या १६ मे २०१४ या दिवशी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ८०.६३ लाख कोटी होते. तर २३ मे २०१९ रोजी दुसऱ्यांदा ते सत्तेवर आले तेव्हा ते १५०.१७ लाख कोटी रुपये होते.