Sensex And Nifty Surge Led By IT Stocks Rebound: गेल्या काही आठवड्यांपासून अस्थिर असलेले भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज (बुधवारी) सकाळच्या सत्रात मोठी वाढ झाली होती.

सकाळी १०:३० वाजता, सेन्सेक्स ६४८.५४ अंशांनी वाढून ८२,८७२.४६ वर पोहोचला होता, तर निफ्टी ५० निर्देशांक २०९.७० अंशांनी वाढून २५,६३५.३५ वर पोहोचला होता.

मात्र, मुंबई शेअर बाजार आज सकाळच्या सत्रात मिळवलेली तेजी टिकवू शकला नाही. आज गाठलेल्या उच्चांकावरून सेन्सेक्स आणि निफ्टी हे निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले.

सेन्सेक्स ५०.१५ अंकांनी किंवा ०.०६% ने वाढून ८२,२७६.०७ वर बंद झाला आणि निफ्टी ५७.८५ अंकांनी किंवा ०.२३% ने वाढून २५,४८२.५० वर बंद झाला.

सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकावरून जवळजवळ ७०० अंशांनी घसरला तर निफ्टी महत्त्वाच्या २५,५०० च्या पातळीच्या (सपोर्ट लेव्हस) खाली बंद झाला. सेन्सेक्स ८२,९५७.९१ च्या इंट्राडे उच्चांकाला स्पर्श केला होता तर निफ्टी २५,६५२.६ वर पोहचला होता.

१) आयटी शेअर्समध्ये खरेदी:

मागील सत्रात विक्रीमुळे झालेल्या घसरणीनंतर, जागतिक माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीमुळे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) व्यक्त होणाऱ्या व्यत्ययाबद्दलच्या चिंता कमी झाल्यानंतर आयटी शेअर्समध्ये तेजी आली. निफ्टी आयटी निर्देशांक २.२३ टक्क्यांनी वाढला आणि एनएसईवर अव्वल कामगिरी करणारे क्षेत्र ठरले.

२) सकारात्मक जागतिक संकेत:

एआयच्या व्यत्ययाच्या भीतीमुळे निर्माण झालेल्या अडिकडील अस्थिरतेनंतर, जागतिक माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी दिसून आली. अँथ्रोपिकने क्लॉड तंत्रज्ञानाभोवती भागीदारी निर्माण करण्याची योजना आखल्याचे सांगितल्यानंतर गुंतवणूकदारांच्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राबद्दलच्या भावना सुधारल्या, ज्यामुळे त्यांचे एआय टूल्स सध्याच्या व्यवसाय मॉडेल्सना विस्थापित करू शकतात या चिंता कमी झाल्या.

जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियामधील वाढीमुळेही गुंतवणूकदरांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली आहे. याचबरोबर आशियाई बाजार बुधवारी उच्चांकी पातळीवर उघडले.

३) सोलर कंपन्यांना फटका:

एकिकडे प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी वाढ होत असताना, दुसरीकडे भारतातील सोलर उपकरण उत्पादक कंपन्यांच्या शेअर्मध्ये मात्र मोठी घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अमेरिकेने भारत आणि इतर काही देशांतील सोलर उपकरणांवर १२६% पर्यंत आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर, सुरुवातीच्या सत्रात वारी एनर्जीज लिमिटेड आणि प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचे ​​शेअर्स १५ टक्क्यांनी घसरले.

सकाळी ९:३० वाजेपर्यंत वारी एनर्जीजचे शेअर्स १४.६ टक्क्यांनी घसरून २,५८०.५ रुपयांवर पोहोचले होते. सत्राच्या सुरुवातीला लोअर सर्किट लागल्यानंतर तोटा आणखी वाढला. प्रीमियर एनर्जीजचे शेअर्स १२ टक्क्यांहून अधिक घसरून ६८१.३ रुपयांवर पोहोचले होते.