Sensex rebounds 600 points from day low: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा जगभरातील शेअर बाजारांना फटका बसत आहे. यामध्ये भारतीय बाजारांचाही समावेश आहे. बुधवारी शेअर बाजाराच्या मुख्य निर्देशांकांनी, सेन्सेक्स आणि निफ्टीने, खालच्या स्तरावर झालेल्या ‘व्हॅल्यू बायिंग’मुळे (खरेदीमुळे) सुरुवातीच्या घसरणीतून काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न केला.
सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १,७०० अंकांनी किंवा २.२४ टक्क्यांनी कोसळून ७८,४४३.२ या ११ महिन्यांच्या निचांकी स्तरावर पोहोचला होता. तर निफ्टी २.२५ टक्क्यांनी घसरून २४,३०५.४ या १० महिन्यांच्या निचांकी स्तरावर आला होता.
दुपारी ३:३० वाजता सेन्सेक्स १,१२२.६६ अंशांच्या (१.४०%)) घसरणीसह ७९,११६.१९ वर बंद झाला, तर निफ्टी ३८५.२० (१.५५%) अंशांच्या घसरणीसह २४,४८०.५० वर बंद झाला.
१) व्हॅल्यू बायिंग:
आज बाजार उघडताच झालेल्या मोठ्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी चांगल्या दर्जाच्या शेअर्समध्ये खरेदी केली, ज्यामुळे निर्देशांकांना झालेला तोटा अंशतः भरून काढण्यास मदत झाली.
२) टेक्निकल लेव्हल्स:
निफ्टीने २४,४०० चा टप्पा पुन्हा गाठला, ज्याला बाजार विश्लेषक एक महत्त्वाची आधार पातळी (सपोर्ट लेव्हल) मानतात.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले की, “मोठ्या घसरणीसह बाजार उघडल्यानंतर सुधारणेचे जे प्रयत्न सुरू आहेत, ते टिकून राहण्यासाठी निफ्टी २४,५०० च्या स्तरावर राहणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही, तर निफ्टी २४,००० ते २३,५५० च्या दरम्यान खाली घसरू शकतो.” तसेच, त्यांनी वाढती अस्थिरता आणि बाजारातील मोठ्या चढ-उतारांची शक्यता लक्षात घेता गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
३) कच्च्या तेलाच्या अस्थिर किमती:
कमोडिटी मार्केटमध्ये जागतिक बेंचमार्क असलेल्या ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुरुवातीच्या घसरणीनंतर थोडी सुधारणा झाली. ते ०.८७ टक्क्यांच्या वाढीसह ८२.११ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होते.
बाजार का घसरत आहेत?
इराणवर अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे तेल पुरवठा खंडित होण्याची भीती पुन्हा निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्या आहेत. गुंतवणूकदार जोखीम टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत आहेत.
आनंद राठी रिसर्चच्या मते, ऐतिहासिक पुरावे केवळ भू-राजकीय आधारावर भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी किंवा सतत घसरण होण्याची शक्यता दर्शवत नाहीत. भूतकाळातील संघर्षांदरम्यान झालेल्या घसरणी सामान्यतः उथळ, गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत झाल्याने आणि तात्पुरत्या होत्या.
भारतीय शेअर बाजार युद्धाच्या बातम्यांपेक्षा सततच्या ऊर्जा धक्क्यांमुळे आणि जागतिक तरलतेमुळे अधिक प्रभावित होतात, असे आनंद राठी रिसर्चने पुढे म्हटले आहे.
