Share Market Updates: भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी या निर्णयाचे स्वागत केल्याने काल मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकाने सुमारे ३००० अंकाची तर निफ्टी ५० ने सुमारे ७०० अंकांची उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले होता. परंतु, आज (मंगळवारी) भारतीय इक्विटी निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली आहे.
आज बाजार सुरू झाल्यानंतर सकळी ११ वाजेपर्यंत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे ५०० अंकांपेक्षा जास्त घसरला आहे. तर एनएसई निफ्टी ५० निर्देशांक सुमारे १५० अंकानी घसरला आहे.
तत्पूर्वी सकाळी बाजार उघडल्यानंतर, सेन्सेक्स ८३७ अंकांनी किंवा १.०२ टक्क्यांनी घसरून ८१,५९३ वर पोहोचला होता. तर निफ्टी, २३८ अंकांनी किंवा ०.९५ टक्क्यांनी घसरून २४,६८७ वर पोहोचला होता. देशांतर्गत निर्देशांकांमध्ये या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचे १ लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवल (मिड-कॅप) कमी झाले आहे.
१.०९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बुडाली
आज झालेल्या या घसरणीमुळे बीएसई मार्केट कॅपने सुचवल्याप्रमाणे, गुंतवणूकदारांची गुंतवणूक १.०९ लाख कोटी रुपयांनी घसरून ४३१.४७ लाख कोटी रुपयांवर आली आहे. जी काल ४३२.५६ लाख कोटी रुपये होती. आज घसरलेल्या शेअर्समध्ये एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, एअरटेल आणि इटरनल (पूर्वीचे झोमॅटो) यासारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे.
५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ३५ शेअर्स
आज शेअर बाजार उघडल्यानंतर तब्बल ३५ शेअर्सनी ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली आहे. यामध्ये एपीएल अपोलो ट्यूब्स, एस्टर डीएम हेल्थकेअर, भारती हेक्साकॉम आणि रेडिंग्टन सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, आज १४ शेअर्सनी त्यांची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली आहे.
शेअर बाजारातील ३,३०२ शेअर्सपैकी २,०८६ शेअर्समध्ये आज घसरण दिसून येत आहे. यामध्ये फक्त ९६३ शेअर्समध्ये वाढ झाली, तर १५६ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
सकाळी ११ पर्यंत स्विगी, एथर इंडस्ट्रीज, केफिन टेक्नॉलॉजीज, यूपीएल, वेल्सपन लिव्हिंग, इटरनल, मॅक्रोटेक डेव्हलपर्स आणि केपीआर मिल लिमिटेड यांचे शेअर्स ६.२० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.
स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १,२४६.४८ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) १,४४८.३७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते.