Is it right time to invest in Indian stock market now: भू-राजकीय तणावामुळे शेअर बाजारात गोंधळ उडाला आहे आणि कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना या तीव्र घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहण्याचा मोह होऊ शकतो. परंतु ट्रस्ट म्युच्युअल फंडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मिहिर व्होरा यांनी ही घाई करण्याची वेळ नसल्याचे म्हटले आहे.
“सर्व काही हवेत आहे. हे किती काळ चालेल याची खात्री नाही, म्हणून सध्या ही वाट पाहण्याची परिस्थिती आहे”, असे व्होरा यांनी सांगितल्याचे वृत्त एनडीटीव्ही प्रॉफिटने दिले आहे.
व्होरा यांनी इशारा दिला की सध्याची परिस्थिती मागील भू-राजकीय उलथापालथींपेक्षा अधिक गुंतागुंतीची ठरू शकते. जेव्हा युक्रेन युद्ध सुरू झाले तेव्हा अनेकांनी असे गृहीत धरले होते की ते लवकर संपेल. पण ते संपले नाही आणि त्याचे दूरगामी आर्थिक परिणाम झाले.
“युक्रेनच्या परिस्थितीच्या उलट, या युद्धात तेल आणि वायूच्या पुरवठ्यावर थेट परिणाम होत आहे”, असे त्यांनी नमूद केले. जर हा संघर्ष लांबला, तर ऊर्जेच्या वाढलेल्या किमतींमुळे महागाई वाढू शकते, कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक विकासाच्या अपेक्षेला खीळ बसू शकते.
सध्याची अनिश्चितता पाहता व्होरा म्हणाले की ते घाई करण्यापेक्षा रोख रक्कम जपून ठेवण्याला प्राधान्य देतील. “माझ्या मते, आम्ही सध्या ‘होल्ड’ (वाट पाहण्याच्या) भूमिकेत आहोत. आमची गुंतवणूक आधीच झालेली आहे. आता आम्हाला रोख रक्कम सुरक्षित ठेवायला आवडेल. ही परिस्थिती अजूनही स्पष्टपणे ‘खरेदी’ किंवा ‘विक्री’ करण्याची नाही”, असे त्यांनी सांगितले.
व्होरा यांनी पुढे असेही नमूद केले की, “जेव्हा बाजार पुन्हा सावरतो तेव्हा केवळ सर्वात स्वस्त असलेले शेअर्सच तेजीचे नेतृत्व करतात असे नाही. त्याऐवजी, ज्या कंपन्यांची कमाई जोरात आहे आणि ज्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहेत, अशा कंपन्या चांगली कामगिरी करण्याची शक्यता असते.”
त्यांचा सल्ला आहे, “एक ‘वॉचलिस्ट’ तयार ठेवा. तुम्हाला खरेदी करायच्या असलेल्या शेअर्सची यादी करा. परंतु बाजारातील अस्थिरतेच्या पहिल्या काही दिवसांत आवेशात येऊन भांडवल गुंतवू नका.”
