गुंतवणूक म्हटली की त्याचे विविध पर्याय आले. यात भांडवली बाजार म्हटलं तर, समभाग, म्युच्युअल फंड, कर्जरोखे त्यात येतात. तर इतर पर्यायांमध्ये जमीन, गृहसंकुलामधील घरांची खरेदी-विक्री, सोने, चांदी व एमसीएक्सवरील गुंतवणूक, असे विविध पर्याय समोर येतात. भांडवली बाजारातील समभागांमधील गुंतवणुकीचा पर्याय हे माध्यम निवडले तर त्याचे यशापयशाचे मोजमाप करण्यासाठी भांडवली बाजाराच्या निर्देशांकाचा आधार घ्यावा लागतो. आज निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकावर असल्याने हा निर्देशांक गुंतवणूकदारांचा ‘जीवश्च कंठश्च मित्र’ झाला आहे. आजच्या धकाधकीच्या, महागाईच्या दिवसांत कायदेशीर पर्यायी उत्पन्न, तसेच आताच्या तरुण पिढीला निवृत्तीनंतर, निवृत्तिवेतन नसल्याने त्याचे नियोजन हे आताच गुंतवणुकीच्या माध्यमातून ‘जोडोनिया उत्तम धन व्यवहारे, वापरावे उदास काळे’ अशी गुंतवणूक असावी असे सांगणारी ही माध्यमे तत्त्वज्ञाची भूमिकादेखील वठवत आहेत. हा उद्देश साध्य करण्यासाठी प्रारंभिक समभाग विक्री, समभागात, म्युच्युअल फंडातील वृद्धी योजना अशा विविध माध्यमातून गुंतवणुकीचा मार्ग दाखवणारी ही विविध माध्यम वाटाडे / मार्गदर्शकदेखील आहेत. विविध गुंतवणूक पर्यायांना / माध्यमांना ‘मितवा’ या शीर्षकाखाली एकत्र आणणे म्हणजे विविध गुंतवणुकीतील पर्यायांची उत्तम सांगडच. मितवा अर्थात, मि-मित्रत्वाच्या नात्याने, त-तत्त्वज्ञ, वा-वाटाड्या अशा तिन्ही भूमिका ‘मितवा’ अशा गोंडस शब्दात एकत्र आल्या आहेत. दीर्घमुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या सर्व गुंतवणुकीच्या पर्यायांना, आता चालू असलेल्या नितांत सुंदर तेजीमुळे भांडवल वृद्धी, चांगला परतावा, नफा मिळत असल्याने, ही गुंतवणुकीची विविध माध्यमेच आज गुंतवणूकदारांची ‘मितवा’ झाली आहेत. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या. शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स: ७९,९९६.६९ / निफ्टी: २४,३२३.८५ गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांकाने २३,२०० ते २३,८०० च्या परिघात जुलै मध्यापर्यंत पायाभरणी केल्यास, निफ्टी निर्देशांक २४,२०० ते २४,५०० च्या नवीन उच्चांकाला गवसणी घालण्यास सिद्ध होईल. या वाक्याची प्रचीती आता आपण अनुभवत आहोत. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांक एखाद्या हलक्याफुलक्या घसरणीत २३,९५० ते २३,७५० पर्यंत खाली आल्यास, या स्तरावर कालानुरूप वेळ व्यतीत केल्यास, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २४,५०० ते २४,८०० असेल. अर्थसंकल्पापर्यंत निफ्टी निर्देशांक २३,८०० ते २३,५०० पर्यंतच्या स्तरावर घसरल्यास, निफ्टीने आपली किंमत स्वरूपातील व कालानुरूप स्वरूपातील पडझड पूर्ण केली आणि अर्थसंकल्पानंतर निर्देशांकाचे २४,८०० ते २५,१०० च वरचे लक्ष्य दृष्टीपथात येईल. हेही वाचा >>>सेन्सेक्स’ ८०,०४९ अंशांच्या नव्या शिखरावर; निफ्टीची २४,४००ला गवसणी ‘शिंपल्यातील मोती’ सदरातील समभागांचा आढावा एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत शिफारस केलेल्या समभागांचा विचार करता, २२ एप्रिलच्या लेखातील जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हा समभाग २३९ रुपयांना सुचविला होता. या समभागाचे ३५० रुपयांचे दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य नमूद केलेले जे समभागाने १ जुलैला ३५८ रुपयांचा उच्चांक मारत साध्य केले. अल्पावधीत त्याने ४५ टक्क्यांचा परतावा दिला. असेच काहीसे फेडरल बँक आणि बँक आँफ महाराष्ट्रबद्दल घडले. ८ एप्रिलच्या लेखातील ६५ रुपयांना शिफारस केलेल्या बँक आँफ महाराष्ट्रने, ३ जूनला ७३ रुपयांचा उच्चांक मारत १२ टक्क्यांचा परतावा दिला. २७ मेच्या लेखात १६३ रुपयांना शिफारस केलेल्या फेडरल बँक या समभागाने ३ जुलैला १८३ रुपयांचा उच्चांक मारत १२ टक्क्यांचा परतावा दिला. श्री दिग्विजय सिमेंट, मॅनकाईंड फार्मा आणि स्टर्लिंग टूल्स हे समभाग ‘स्टॉप लॉस’ तत्त्वाचे पालन करत, लेखात नमूद केलेल्या वरच्या लक्ष्यांसाठी राखून ठेवावेत. शिंपल्यातील मोती आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (शुक्रवार, ५ जुलै भाव - ८१.१९ रु.) आपल्या अंगभूत गुणांमुळे ज्यात हुशारी, मेहनत, कल्पकतेची जोड देत आर्थिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करणारे व्ही. वैद्यनाथन यांच्या कुशल नेतृत्वाखाली, आर्थिक क्षेत्रात ‘फर्स्ट’ येण्याची मनीषा ठेवणारी ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ असणार आहे. आर्थिक आघाडीवर, दोन आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च तिमाहीतील तुलनात्मक आढावा घेतल्यास, उत्पन्न ७,८२१.८३ कोटींवरून ९,८६१.२१ कोटी, करपूर्व नफा १,०७६.२३ कोटींवरून ९४१.६० कोटी तर निव्वळ नफा ८०२.६२ कोटींवरून ७२४.५५ कोटी आहे. यात संभाव्य अनुत्पादित कर्जांसाठी ४८२.४३ वरून ७२२.३१ कोटींची तरतूद केल्याने नफ्यावर परिणाम झाला आहे. समभागाचे आलेख वाचन करता समभागाने आपल्याभोवती १५ रुपयांचा परीघ (बॅण्ड) निर्माण केलेला आहे, जसे की ७०. ८५. १०० रुपये. समभागाचा बाजारभाव सातत्याने ८५ रुपयांच्यावर १५ दिवस टिकल्यास समभागाचे अल्पमुदतीचे वरचे लक्ष्य हे ९५ ते १०० रुपये, तर दीर्घमुदतीचे वरचे लक्ष्य हे १२५ ते १५० रुपये असेल. हा संथगतीने वाढणारा समभाग असल्याने भविष्यातील बाजारातील व समभागातील घसरणीत हा समभाग ७० ते ६५ रुपयांदरम्यानच्या प्रत्येक घसरणीत २० टक्क्यांच्या पाच तुकडयांत हा समभाग खरेदी करावा. आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेडमधील दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ५० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा. महत्त्वाची सूचना : वरील समभागांत लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचे तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केलेले आहे. निकालपूर्व विश्लेषण १) आनंद राठी वेल्थ लिमिटेड तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, ११ जुलै ५ जुलैचा बंद भाव- ४,०१०.२५ रु. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ३,८०० रु. अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,२५० रुपये, द्वितीय लक्ष्य ४,५०० रुपये. ब) निराशादायक निकाल : ३,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,५५० रुपयांपर्यंत घसरण २) टीसीएस लिमिटेड तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार,११ जुलै ५ जुलैचा बंद भाव- ४,०११.८० रु. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ३,८५० रु. अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,८५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,३०० रुपये, द्वितीय लक्ष्य ४,६०० रुपये. ब) निराशादायक निकाल : ३,८५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,६०० रुपयांपर्यंत घसरण ३) इन्फोसिस लिमिटेड तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, १८ जुलै ५ जुलैचा बंद भाव - १,६४७.४५ रु. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,५०० रु. अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,५०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,७५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,८५० रुपये. ब) निराशादायक निकाल : १,५०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,४०० रुपयांपर्यंत घसरण ४) पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, १८ जुलै ५ जुलैचा बंद भाव- : ४,७७१.२५ रु. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ४,५५० रु. अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५,००० रुपये, द्वितीय लक्ष्य ५,५०० रुपये. ब) निराशादायक निकाल : ४,५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४,००० रुपयांपर्यंत घसरण - आशीष ठाकूर लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत. ashishthakur1966@gmail.com अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.