मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्र अँड महिंद्र यांसारख्या ‘ब्लूचिप’ कंपन्यांच्या समभागांचा खरेदीचा सपाटा लावल्याने निफ्टी नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. तर सेन्सेक्सदेखील नवीन शिखरापासून अवघे काही अंश दूर आहे.

सप्ताहअखेर सलग तिसऱ्या सत्रात वाढ होत, मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १८१.८७ अंशांनी वधारून ७६,९९२.७७ या नवीन शिखरावर स्थिरावला. दिवसभरात त्याने २७०.४ अंशांची कमाई करत ७७,०८१.३० ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने मात्र ६६.७० अंश कमावत २३,४६५.६० ही ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. सत्रात त्याने २३,४९०.४० या आतापर्यंतच्या सर्वोच्च शिखराला स्पर्श केला.

हेही वाचा >>> Sensex नं पुन्हा मोडला विक्रम; सलग चौथ्या दिवशी मोठी झेप; निफ्टीचाही नवा उच्चांक!

अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून अल्पकालीन दर कपातीची संभाव्यता कमी झाल्यामुळे, भांडवली बाजाराच्या गतीमध्ये तात्पुरती घसरण झाली आहे. देशांतर्गत गुंतवणूकदार येत्या महिन्यात सादर केल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून संकेतांची वाट पाहात आहेत. जुलैमध्ये सादर केल्या जाणाऱ्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात सरकार कल्याणकारी योजनांवर भर देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उपभोगाशी निगडित क्षेत्रातील समभागांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी महिंद्र अँड महिंद्र, टायटन, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स आणि एशियन पेंट्सचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे, टेक महिंद्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, लार्सन अँड टुब्रो आणि स्टेट बँकेच्या समभागात मात्र घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारच्या सत्रात ३,०३३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.