scorecardresearch

‘सेन्सेक्स’ची पुन्हा आपटी

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचा समभागात ७.२१टक्क्यांची सर्वाधिक घसरण झाली.

‘सेन्सेक्स’ची पुन्हा आपटी
संग्रहित छायाचित्र (सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निधीचे निर्गमन आणि देशांतर्गत बँकिंग व वित्त कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी नफावसुलीसाठी विक्रीचा मारा केल्याने बुधवारी प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. सलग दुसऱ्या सत्रातील या घसरणीसह प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ९४१ अंशांनी (१.५४ टक्के) गडगडला आहे.

दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ३०४.१८ अंशांची घसरण होऊन तो ६०,३५३.२७ पातळीवर बंद झाला. दिवसभरात ६०७.६१ अंश गमावून तो ६०,०४९.८४ या सत्रातील नीचांकी पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे निफ्टीमध्ये ५०.८० अंशांची घसरण झाली आणि तो १७,९९२.१५ पातळीवर स्थिरावला.

जागतिक पातळीवर, अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हने महागाई आणखी कमी करण्यासाठी व्याजदरवाढीची आक्रमक भूमिका कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बॅंकेतर वित्तीय क्षेत्रातील आघाडीच्या बजाज फायनान्सचे तिमाहीत निकाल निराशाजनक राहिल्याने बाजारात निराशेचे वातावरण पसरले. जागतिक मंदीच्या संभाव्य भीतीमुळे खनिज तेलाच्या दरात मोठी घसरण झाली. मात्र पुन्हा तेलाच्या किमती पूर्वपदावर आल्या आहेत. मात्र दीर्घावधीत वस्तू-सेवांना मागणी कायम राहील याबाबत गुंतवणूकदार आशादायी आहेत, असे निरीक्षण जियोजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचा समभागात ७.२१टक्क्यांची सर्वाधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ बजाज फिनसव्‍‌र्ह, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टायटन, पॉवर ग्रिड, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, टेक महिंद्र, विप्रो आणि भारती एअरटेलचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावले. तर आयटीसी, हिंदूस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, नेस्ले आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे समभाग सर्वाधिक तेजी दर्शवित होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात,२,६२०.८९ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

रुपयाला ३० पैशांचे बळ

गुरुवारच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया ३२ पैशांनी वधारून ८२.५० पातळीवर बंद झाला.  परकीय चलन बाजारात, रुपयाने ८२.७५ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. त्यानंतरच्या सत्रात त्याने ८२.५० या उच्चांकी तर आणि ८२.८० या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

मराठीतील सर्व बाजार ( Market ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 05:39 IST

संबंधित बातम्या