मुंबई : जागतिक भांडवली बाजार सावरल्याने आणि देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी गेल्या तीन सत्रांतील घसरणीनंतर स्वस्त झालेले समभाग खरेदी करण्याचा सपाटा लावल्याने सेन्सेक्सने बुधवारच्या सत्रात ८७५ अंशांची उसळी घेतली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८७४.९४ अंशांची कमाई केली आणि तो १.११ टक्क्यांच्या वाढीसह ७९,४६८.०१ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,०४६.१३ अंशांची मजल मारत ७९,६३९.२० ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३०४.९५ अंशांनी वधारून २४,२९७.५० पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>> Sensex Today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराची भरपाई, गुंतवणूकदारांचा ६ लाख कोटींचा फायदा!

बँक ऑफ जपानच्या डेप्युटी गव्हर्नरांनी आर्थिक अस्थिरतेच्या काळात मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर जगभरातील भांडवली बाजारांनी लक्षणीय पुनर्उभारी अनुभवली. देशांतर्गत भांडवली बाजारातदेखील सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक खरेदी दिसून आली. यात गृहनिर्माण क्षेत्र आघाडीवर होते. गृहनिर्माण क्षेत्रात दीर्घ मुदतीच्या भांडवली नफा करावरील ‘इंडेक्सेशन’चे फायदे पुनर्स्थापित करण्याच्या अर्थ मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे सकारात्मक पडसाद उमटले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिडचे समभाग प्रत्येकी ३ टक्क्यांहून अधिक वधारले. त्यापाठोपाठ टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, महिंद्र अँड महिंद्र, मारुती आणि लार्सन अँड टुब्रो यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर इंडसइंड बँक, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्र आणि टायटन यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.

सेन्सेक्स ७९,४६८.०१ ८७४.९४ १.११%

निफ्टी २४,२९७.५० ३०४.९५ १.२७%

डॉलर ८३.९६ ४

तेल ७७.३४ १.१२