scorecardresearch

‘सेन्सेक्स’मध्ये ८४७ अंशांची तेजी ; मजबूत जागतिक संकेतांनी खरेदी उत्साह

तीन दिवस सलग सुरू राहिलेल्या पडझडीनंतर सप्ताहारंभ भांडवली बाजारासाठी फायद्याचा ठरला.

‘सेन्सेक्स’मध्ये ८४७ अंशांची तेजी ; मजबूत जागतिक संकेतांनी खरेदी उत्साह
संग्रहित छायाचित्र (सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक कल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज तसेच माहिती-तंत्रज्ञान समभागांमधील वाढलेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये सोमवारी जवळपास दीड टक्क्यांनी मोठी उसळी घेतली.

तीन दिवस सलग सुरू राहिलेल्या पडझडीनंतर सप्ताहारंभ भांडवली बाजारासाठी फायद्याचा ठरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८४६.९४ अंशांनी (१.४१ टक्क्यांनी) वाढून ६०,७४७.३१ वर स्थिरावला. दिवसभरात त्याने ९८९.०४ अंशांची झेप घेऊन, ६१ हजारांनजीक म्हणजे ६०,८८९.४१ पातळीपर्यंत मजल मारली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीने २४१.७५ अंशांनी (१.३५ टक्क्यांनी) वाढून १८,१०१.२० या पातळीवर दिवसांतील व्यवहाराला निरोप दिला.

प्रामुख्याने माहिती-तंत्रज्ञान समभागांमध्ये अमेरिकेत नॅसडॅकवरील तेजीच्या कामगिरीनंतर आणि सोमवारी संध्याकाळी जाहीर होणाऱ्या टीसीएसच्या तिमाही वित्तीय निकालावर लक्ष ठेऊन, स्थानिक बाजारात चांगली मागणी मिळविली. या खरेदीपूक सकारात्मकतेने निर्देशांकांनी तीन दिवसांची घसरण मोडून काढली. 

शुक्रवारी अमेरिकेतील बाजार तेजीत होते. मुख्यत: अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडच्या नरमलेल्या सुराने वॉल स्ट्रीटवर उत्साह होता. महागाई कमी होत असून, अपेक्षेपेक्षा जास्त वाढलेल्या डिसेंबरच्या वेतनमानामुळे अमेरिकी अर्थव्यवस्था रुळावर येण्याची शक्यता वाढली आहे. या अनुकूल घडामोडीमुळे भारताच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आशावाद बळावला आणि तिमाही निकालांपूर्वीच या समभागांना खरेदीचे पाठबळ मिळाल्याचे दिसून आले, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी मत नोंदविले.

मराठीतील सर्व बाजार ( Market ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 04:55 IST

संबंधित बातम्या