प्रमोद पुराणिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा समूहातील टाटा टेक्नॉलॉजीज या कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी ‘सेबी’कडे कागदपत्रे सादर केली, ही बातमी वाचताक्षणी भूतकाळातील आठवणी जागृत झाल्या. १९७३ पासून गत ५० वर्षांत टाटांनी आपल्या उद्योग समूहाची भांडवल उभारणी करण्याची जबाबदारी एका व्यक्तीने लीलया पेलली आणि ते नाव म्हणजे निमेश कम्पानी.

कोण हे कम्पानी, असा प्रश्न नवीन पिढी कदाचित विचारेल. परंतु शेअर बाजार ज्यांनी स्थापन केला, त्या संस्थापकांमध्ये जमनादास मोरारजी होते. म्हणूनच निमेश कम्पानी यांचे घराणे शेअर बाजाराच्या जन्मापासूनच बाजाराशी जोडले गेले आहे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

आजसुद्धा मुंबई शेअर बाजार ही ‘थ्री के’ची कहाणी आहे. यात पहिले कोठारी त्यांच्यावर या स्तंभातून लिहिलेले आहे. दुसरे कम्पानी, आणि तिसरे कोटक. कोटक यांचा वाढदिवस असल्याने गेल्याच आठवड्यात त्यांच्यावर या स्तंभात लिहिले आहे. क्रमवारीनुसार हे दुसरे के अर्थात निमेश कम्पानी यांचा जन्म ३० सप्टेंबर १९४६ ला झाला. १९७३ ला बी कॅाम आणि सी ए पूर्ण करुन शेअर दलाली या वडिलोपार्जित व्यवसायात ते पदार्पण करते झाले.

निमेश कम्पानी यांच्या वडिलांची नगीनदास छगनदास ही पेढी शेअर बाजाराच्या जीजीभॉय टॉवर इमारतीतच कार्यरत होती. ८० वर्षाचे त्यांचे वडील शेअर्स खरेदी विक्रीचे व्यवहार व्यवस्थित सांभाळायचे. इतके की, ग्राहकाने कार्यालयात प्रवेश करताक्षणीच, तो कशासाठी आला हे ते नेमके ताडत असत. म्हणजे ग्राहकांकडून पैसे घ्यायचे आहेत किंवा शेअर्सची विक्री केली परंतु सही जुळली नाही म्हणून शेअर्स सर्टिफिकेट आणि ट्रान्स्फर फॉर्म परत आला हे ते विनाविलंब सांगत. बाजाराच्या दृष्टीने ही ‘बॅड डिलिव्हरी’ आहे आणि ती त्वरित लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यावर त्यांचा भर असे.

निमेश कम्पानी यांनी मात्र नरिमन पॅाईंटस्थित नव्या कार्यालयात नव्याने व्यवसायास सुरुवात केली आणि तो व्यवसाय होता मर्चंट बँकिंगचा. जेएम फायनान्शियल आता एका विविधांगी व्यवसाय शाखांसह मोठ्या समूहात परिवर्तित झाला आहे. १९८० ला त्या वेळेच्या टेल्को या कंपनीने ७ वर्ष मुदतीचे परिवर्तनीय कर्ज रोखे बाजारात आणले होते, दोन भागांत रोख्यांचे समभागांत परिवर्तन होणार होते. पहिल्या चार वर्षानी म्हणजे १९८४ ला आणि दुसरे परिवर्तन १९८७ ला होणार होते. त्यावेळचे मर्चंट बँकर सर्वाचे हित सांभाळण्याचा प्रयत्न करीत. कंपनीला योग्य अधिमूल्य मिळावे, बरोबरीने गुंतवणूकदाराला फायदा व्हावा आणि बाजारसुध्दा आणखी प्रगत व्हावा अशी विचारसरणी त्या वेळेस होती. त्या काळात सात वर्षाचे कर्जरोखे आणणे हे धाडसाचे काम होते. परंतु निमेश कम्पानी यांनी ते यशस्वीरित्या करून दाखवले. टाटा पॅावर, टाटा हायड्रो इलेक्ट्रिक आणि आंध्र पॅावर अशा तीन टाटा कंपन्यांच्या शेअर्सची विक्री एकाच वेळेस करण्याचा विक्रम त्यांनी करून दाखवला. टाटा उद्योग समूह भांडवल उभारणीसाठी बाजारात येणार असला की त्याचे काम निमेश कम्पानींकडेच असणार हे नक्की असायचे.

त्या काळात कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज नावाची संस्था होती. सेबीच्या स्थापनेपूर्वीचा तो काळ होता. कोणत्याही कंपनीला शेअर्स, कर्जरोखे विक्री करण्यासाठी या संस्थेची परवानगी तेव्हा घ्यायला लागत असे. कंपनीने विक्री करताना किती अधिमूल्य घ्यायचे यांचे स्वातंत्र्य त्यावेळी कंपन्यांना नव्हते हे एक टोक, तर ही संस्था बरखास्त झाल्यानंतर अवास्तव अधिमूल्य आकारून गुंतवणूकदारांना लुबाडले गेले हे दुसरे टोक. असो, तूर्त विषयांतर टाळू या. बंधने असताना सुद्धा निमेश कम्पानी यांनी कल्पकता दाखवून नवनवे प्रयोग केले. टाटा स्टील या कंपनीचे अंशत: परिवर्तनीय कर्जरोखे, सिक्युअर्ड प्रिमीयर नोट अशा प्रकारचे नवीन प्रयोग, नवीन मार्ग आणि वेगवेगळ्या साधनांचा योग्य उपयोग त्यांनी सर्वप्रथम केला.

निमेश कम्पानी यांच्याकडे अनेक व्यक्तींनी वर्षानुवर्षे भरीव कार्य केले. दिवंगत एम. आर. मोंडकर हे अगोदर आयसीआयसीआय बँक, मर्चंट बॅंकिंग डिव्हिजन या ठिकाणी नोकरीस होते ते नंतर जेएमकडे आले, सिटी बँकेकडे असलेले विक्रम पंडित किंवा एचएसबीसीच्या नैना लाल किडवई या सुद्धा काही वर्षे जेएमकडे नोकरीस होत्या. अशी भरपूर नावे लिहिता येतील.

त्या वेळेच्या युनिट ट्रस्टशी स्पर्धा करण्यासाठी १९८५ ला नागार्जुना फायनान्स या कंपनीने केएनआयटीएस् (नीटस्) या नावाने युनिटची विक्री सुरू केली. अर्थातच पुढे त्यांना ती बंद करावी लागली. काही वर्षानंतर या कंपनीचे संचालक असताना निमेश कम्पानी यांच्या आयुष्यात एक संकट आले होते. परंतु त्या संकटाला अत्यंत यशस्वीपणे सामोरे जाऊन त्यातून त्यांनी मार्ग काढला. अमेरिकेच्या मॅार्गन स्टेनले यांच्याबरोबर त्यांनी हातमिळवणी केली होती पंरतु त्यांना वेगळे व्हावे लागले, निमेश कम्पानी यांचे चुलत बंधू महेन्द्र कम्पानी शेअर बाजाराचे अध्यक्ष होते. शेअर बाजारात तंत्रज्ञान यावे यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. परंतु तंत्रज्ञानाचा वापर बाजारात सुरू झाला, तर आपल्या हितसंबधाना धोका निर्माण होऊ शकतो, अशा विचारसरणीची काही मंडळी एकत्र येऊन त्यांनी महेंद्र कम्पानी यांचा पराभव केला.

निमेश कम्पानी यांचा यांचा मुलगा विशाल कम्पानी परदेशात उच्च शिक्षण घेऊन या व्यवसायात आला. निमेश कम्पानी यांनी निवृत्ती स्वीकारली आणि विशाल त्यांचा वारसा सांभाळत आहे. या स्तंभात पुढे त्यांच्याही कामाचा आढावा घेण्याचा विचार आहे.

जेएम शेअर ॲण्ड स्टॅाक ब्रोकर लिमिटेड या नावाने कंपनीच्या शेअर्सची विक्री (आयपीओ) करून बाजारात सूचिबद्धता केली गेली. पुढे कंपनीचे नाव बदलले, वेगवेगळे व्यवसाय सुरु झाले. जेएम म्युच्युअल फंड सुरू करण्यात आला. प्रगतीचा हा दुसरा टप्पा आणि त्यावरचे लिखाण परत कधीतरी. (लेखक नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story about indian businessman nimesh kampani zws
First published on: 18-03-2023 at 16:08 IST