ब्रिटनच्या अँथनी बोल्टन या निधी व्यवस्थापकाला प्रवाहाविरुद्ध जाणारा किंवा ब्रिटनचा वॉरेन बफेट असेही त्यांना म्हणू शकतो. शिवाय मूल्यांवर आधारित गुंतवणूकदार पीटर लिन्च बरोबरदेखील त्यांची तुलना होऊ शकते. बोल्टन यांचे वेगळेपण काय तर स्वतंत्रपणे विचार करण्याची ताकद आणि आपल्या विचारावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. ऐकीव माहितीवर अवलंबून राहणारे अनेक असतात. पण त्या विचारसरणीचा प्रभाव पडू द्यायचा नाही. केलेल्या चुकांपासून धडा घ्यायचा पण यश डोक्यात जाऊ द्यायचे नाही या विचारसरणीचे अँथनी बोल्टन आहेत.

७ मार्च १९५० ला जन्मलेल्या बोल्टन यांनी ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. वयाच्या फक्त २९ व्या वर्षी १९७९ ला फिडीलिटीने त्यांना नोकरी दिली. केंब्रिज विद्यापीठामध्ये अभियांत्रिकीमध्ये ?

पदवी घेऊन फिडीलिटीचे लंडन निवासी पहिले निधी व्यवस्थापक म्हणून अँथनी बोल्टन यांना ओळखले जाते. ते आता निवृत्त झाले आहे. सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने फिडीलिटीसाठी ते काम करतात. त्यांनी शास्त्रीय संगीताची आवड जोपासली. त्यांना तीन मुले असून ब्रिटनमध्ये सुसेक्स येथे त्यांचे निवासस्थान आहे. बोल्टन यांनी १) इन्व्हेस्टिंग विथ अँथनी बोल्टन २) ॲनाटॉमी ऑफ स्टॉक मार्केट ३) इन्व्हेस्टिंग अगेंस्ट दी टाईड अशी तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत.

हेही वाचा : भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण

डिसेंबर १९७९ ते डिसेंबर २००७ पर्यंत त्यांनी फिडीलिटीचा स्पेशल सिच्युएशन्स हा फंड सांभाळला. त्यानंतर लंडनमध्ये नोंदणी असलेला फिडीलिटी चायना स्पेशल हा फंड सांभाळला. याचबरोबर नोव्हेंबर १९८५ ते डिसेंबर २००२ फिडीलिटी युरोपीयन फंड, १९९० ते २००३ फिडीलिटी युरोपियन ग्रोथ फंड, फिडीलिटी युरोपियन व्हॅल्यूज फंड, इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट १९९१ ते २००१ पर्यंत आणि फिडीलिटी स्पेशल व्हॅल्यूज पीएलसी हा फंड १९९४ ते २००७ पर्यंत सांभाळला.

ब्रिटनमधील सर्वात मोठी खुली योजना म्हणून स्पेशल सिच्युएशन या फंडाने विक्रम केला. २००६ ला हा फंड खूप मोठा झाला असल्यामुळे व्यवस्थापन करण्यासाठी अडचणी येऊ लागल्या म्हणून त्याची विभागणी केली गेली. मात्र यामुळे गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्यास सुरुवात केली. शेवटी मूळ पदावर येण्यासाठी फंडाला २०१० हे वर्ष बघायला लागले. सतत २८ वर्षे बोल्टन यांनी या फंडाच्या गुंतवणूकदारांना चक्रवाढीने वार्षिक सरासरी १९.५ टक्के परतावा दिला. या कालावधीत या फंडाच्या आधारभूत निर्देशांकाची वाढ फक्त १३.५ टक्के होती.

आयुष्यभराच्या आपल्या अनुभवावर आधारलेली पुस्तके त्यांनी लिहिली. एखादा शेअर आपल्या फंडात आपण का सांभाळतो आहे, याचे कारण माहिती असलेच पाहिजे. तर एखादा शेअर चांगला असताना जर काही गुंतवणूकदारांना तो आवडत नसेल तर त्याचीसुद्धा कारणे शोधली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीचा निर्णय चुकला तर नुकसान सहन करण्याची ताकद हवी.

हेही वाचा : Stock Market Opening Bell : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स-निफ्टीची नकारात्मक सुरुवात

फिडीलिटी संस्थापक जोहानसन यांनी जुलै १९८४ मध्ये बोल्टन यांच्या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिताना फार महत्त्वाची वाक्ये वापरली आहेत. एक गोष्ट विसरू नका, ती म्हणजे खेळातले जे स्टार खेळाडू असतात हे केव्हा ना केव्हा मागे पडतातच. ते कायम सर्वोकृष्ट कामगिरी दाखवू शकत नाही. जेव्हा ते निवृत्त होतात तेव्हा ते दुसऱ्या खेळाडूंसाठी जागा रिकामी करून देतात. त्यामुळे कोणत्याही घटनेची काळजी करायची नाही. या ओळी वाचताना शताब्दीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या मै दो पल का शायर हू गाण्यांच्या ओळी आठवल्या,

प्रत्येक वेळेस एखादा शेअर वाढणे किंवा घटणे याला काही ना काही कारण असते. त्याची माहिती नक्कीच मिळवता येते. मात्र ते सहज-सोपे नाही. एखाद्या शेअरला अनेक पैलू असतात. यामुळे या सर्व प्रकारात एखादी संधी आपले कार्य करत असते आणि म्हणून ब्रान्च रिकी नावाचा अमेरिकी खेळ व्यवस्थापक असे म्हणतो की, लक इज द रेसिड्यु ऑफ डिझाइन.

सध्या सर्वत्र प्रचंड माहितीचा पुरवठा उपलब्ध आहे. तो सर्वसामान्य गुंतवणूकदारालादेखील उपलब्ध होतो. जो एक काळ वॉल स्ट्रीटवरच्या मोठ्या गुंतवणूकदारांना शेअर संशोधकांना फक्त उपलब्ध होता. यामध्ये माहितीच्या प्रचंड साठ्यामधून योग्य माहितीचा योग्य उपयोग करायचा हे अवघड काम आहे. बाय लो अँड सेल हाय हे जरी बोलायला सोपे असले तरी अमलात आणणे कठीण आहे.

हेही वाचा : तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?

बोल्टन यांचे एक महत्त्वाचे वाक्य असे आहे की, गुंतवणूकदाराने कोणत्या किमतीला शेअर खरेदी केला ते डोक्यातून काढून टाकायचे असते. त्याचबरोबर अमुक एक किमतीला शेअर पोहोचला की मी तो विकून टाकेन हेसुद्धा डोक्यातून काढून टाकायचे. एखाद्या शेअरचा बाजारभाव काही ना काही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र त्याच्या फार आहारी जाऊ नये.

सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, एखाद्या कंपनीबद्दल डोक्यात संशय निर्माण झाला असेल आणि अनेक प्रश्न पडल्यास त्यावेळेस फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर शोधा आणि तो प्रश्न म्हणजे कंपनीचा नफा फक्त कागदावरचा आहे की तो खरोखर कमावलेला आहे. तो रोकड स्वरूपात कंपनीच्या खात्यात दिसतो आहे का?

बाजारातली माणसं या स्तंभात भारतातील म्युच्युअल फंड घराण्यांचे निधी व्यवस्थापक याविषयी लेखमाला चालू असताना थोडासा बदल म्हणून वेगवेगळ्या देशांतील मोठ्या निधी व्यवस्थापकांची देखील ओळख करून देण्याचा मानस आहे.

प्रमोद पुराणिक

लेखक नाशिकस्थित अर्थअभ्यासक आहेत.