scorecardresearch

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील चैतन्याचा सुपरिणाम

ओबेरॉय रिॲल्टी लिमिटेड मुंबईत १३ दशलक्ष चौरस फूट जागेवर विविध प्रकल्प विकसित होत आहेत. या प्रकल्पाच्या एकूण विक्रीयोग्य क्षेत्राचे मोठे बुकिंग झाले आहे.

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील चैतन्याचा सुपरिणाम
स्थावर मालमत्ता क्षेत्रातील चैतन्याचा सुपरिणाम (फोटो सौजन्य इंडियन एक्सप्रेस)

ओबेरॉय रिॲल्टी समूहाची ओबेरॉय रिॲल्टी लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची स्थावर मालमत्ता विकासक कंपनी आहे. कंपनी निवासी बांधकाम, ऑफिस स्पेस, रिटेल, हॉस्पिटॅलिटी आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आदी व्यवसायांत आहे. कंपनीने मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी सुमारे ११.८९ दशलक्ष चौरस फूट जागेवर ४३ पेक्षा जास्त प्रकल्प विकसित केले आहेत, ज्यात ४५.६८ दशलक्ष चौरस फूट जागा तयार करण्यात आली आहे. कंपनीच्या प्रकल्पांचे पुढील तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करता येईल :(१) निवासी प्रकल्प, (२) भाड्याचे उत्पन्न: यामध्ये मॉल आणि व्यावसायिक जागांसारख्या गुंतवणुकीच्या मालमत्तेतून मिळणारे भाडे उत्पन्न समाविष्ट आहे, (३) हॉस्पिटॅलिटी आणि प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिसेस: यामध्ये खोल्यांची विक्री, अन्न आणि पेये आणि हॉटेल ऑपरेशन्सशी संबंधित सेवांचा समावेश आहे

हेही वाचा- वित्तरंजन : प्रजासत्ताक भारताचे पहिले अर्थमंत्री आणि अर्थसंकल्प

रिअल इस्टेट प्रकल्पांचा विस्तार

कंपनीचे सध्या मुंबईत १३ दशलक्ष चौरस फूट जागेवर विविध प्रकल्प विकसित होत असून ७६ टक्के निवासी, २० टक्के रिटेल, एक शाळा आणि उर्वरित हॉस्पिटॅलिटी प्रकल्प आहेत. थ्री सिक्स्टी वेस्ट, नावाचा निवासी प्रकल्प ओॲसिस रिॲल्टीसह संयुक्त भागीदारीतून विकसित केला जात आहे. वरळी येथे काम सुरू असलेल्या या प्रकल्पाचे व्यवस्थापन द रिट्झ-कार्लटनद्वारे केले जाईल, त्यात दोन उंच टॉवर्स आहेत. या प्रकल्पाच्या एकूण विक्रीयोग्य क्षेत्राचे मोठे बुकिंग झाले आहे.

ओबेरॉयने कंपनीच्या भागीदार सहाना ग्रुपचा वरळीतील आगामी पंचतारांकित हॉटेल मालमत्तेतील ५० टक्के हिस्सा १,०४० कोटी रुपयांच्या मोबदल्यात खरेदी केला आहे. हॉटेलच्या मालमत्तेत २२१ खोल्या कंपनीकडे आहेत आणि रिट्झ-कार्लटन ब्रँडअंतर्गत त्या चालविल्या आणि व्यवस्थापित केले जात आहेत. तसेच २६९ खोल्या मुंबईतील गोरेगावमधील वेस्टीन, मुंबई गार्डन सिटी येथे आहेत.

हेही वाचा- बाजार-रंग : काळ संक्रमणाचा

कंपनीचे याव्यतिरिक्त १५ दशलक्ष चौरस फूट जागेवर इतर प्रकल्प नियोजित असून त्यांत ५० टक्के निवासी, २५ टक्के ऑफिस, १५ टक्के हॉस्पिटॅलिटी आणि उर्वरित १० टक्के सोशल इन्फ्रा आणि रिटेल प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्प मुंबईत आहेत. यामध्ये बोरिवली येथील ४ स्टार हॉटेलचा प्रकल्प असून त्यांत २५०-३०० रूम्स ओबेरॉयच्या असतील. मॉर्गन स्टॅन्ले आणि ओबेरॉय रिॲल्टी यांनी मॉर्गन स्टॅन्लेच्या मुंबई ग्लोबल इन-हाऊस सेंटर ऑपरेशन्सचे शहरातील एकाच संकुलात एकत्रीकरण करण्यासाठी कंपनीकडून १.१ दशलक्ष चौरस फूट ऑफिस स्पेस ९.५ वर्षांसाठी भाड्याने देण्याचा करार केला आहे. नवीन संकुल गोरेगावमधील कॉमर्ज ३ इमारतीत असेल.कंपनीचे डिसेंबर २०२२ साठीच्या तिमाहीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. सप्टेंबर २०२२ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ६८९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३१८.८२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता. कंपनीचे आगामी नियोजित प्रकल्प आणि आतापर्यंतचा इतिहास पाहता तसेच स्थावर मालमत्ता क्षेत्रामध्ये आलेले चैतन्य पाहता नजीकच्या काळात ओबेरॉय रिॲल्टीकडून भरीव अपेक्षा आहेत. काही मोजक्या उत्तम विकासकांच्या रांगेत असलेली ही कंपनी येत्या दोन वर्षांत उत्तम परतावा देऊ शकेल.सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

हेही वाचा- सेन्सेक्सला २०० अंशांची गळती ; जागतिक मंदीच्या भीतीने

अजय वाळिंबे

stocksandwealth@gmail.com

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व बाजार ( Market ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 09:42 IST

संबंधित बातम्या