scorecardresearch

वित्तरंजन : हेटी ग्रीन (भाग २)

१८६५ ते १९१६ पर्यंत पुरुषांच्या मक्तेदारीतील विश्वात ग्रीन यांनी भरपूर नाव आणि पैसा कमावला.

Hetty Green
photo courtesy – social media

डॉ. आशीष थत्ते

१८६५ ते १९१६ पर्यंत पुरुषांच्या मक्तेदारीतील विश्वात ग्रीन यांनी भरपूर नाव आणि पैसा कमावला. १९०७ च्या आर्थिक संकटात हेटी ग्रीन चक्क न्यूयॉर्कसाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणजे त्यांची संपत्ती किती होती हे लक्षात येईल. पण त्यांनी कधीही स्वतःचे घर किंवा कार्यालय विकत घेतले नाही. केमिकल बँक नावाच्या बँकेतच त्यांनी आपले कार्यालय थाटले होते. त्यांचे कार्यालय मोठ्या ट्रंक किंवा सुटकेसेसने भरलेले असायचे. त्यांच्या विचित्र स्वभावामुळे गुंतवणुकीच्या धोरणांपेक्षा कंजूसपणाचे किस्सेच प्रसिद्ध झाले. त्यांच्या स्वत:च्या म्हणण्यानुसार त्या काटकसरी होत्या कंजूस नाही. काही पैशांचा स्टॅम्प शोधण्यासाठी त्या पूर्ण रात्र फिरल्या असे त्यांच्याबद्दल सांगितले जाते. तसेच काळ्या कपड्यांशिवाय त्यांनी कधीही काहीही घातले नाही. हे कपडेदेखील त्या पूर्ण विरेस्तोवर वापरायच्या. खर्च नको म्हणून त्यांनी कधी नेलपेन्ट लावले नाही तर साबणाचा खर्च वाचावा म्हणून कपड्यांचा फक्त मळका भाग धुवायच्या तर कधीही गरम पाणी वापराच्या नाहीत कारण पाणी गरम करण्यासाठी खर्च होतो. मुलाला झालेल्या दुखापतीवर त्या औषध घेण्यासाठी चक्क फुकटच्या औषधे देणाऱ्या दवाखान्यात गेल्या. तिथे त्यांची ओळख पटल्यावर त्यांना निघून जाण्यास सांगितले. मग काय त्याने स्वतःच मुलाच्या उपचारास सुरुवात केली आणि अखेरीस त्याचा परिणाम म्हणून मुलाचा पाय कापावा लागला. अर्थात त्यांच्या मुलाने ग्रीनच्या मृत्यूनंतर ही गोष्ट नाकारली. वृद्धापकाळात त्यांना हर्नियाच्या विकाराने ग्रासले असता त्या चक्क काठीने त्याची सूज कमी करायच्या. पण त्यांना डॉक्टरांवर पैसा खर्च करणे मंजूर नव्हते.

त्यांनी आपली बहुतांश गुंतवणूक रेल्वे आणि रस्त्याच्या रोख्यांच्या माध्यमातून केली. त्यावेळेला रेल्वेचे नुकतेच विस्तारीकरण होत होते. मात्र त्याला कुणीही पैसा पुरवत नव्हता. अशा वेळी ग्रीन यांनी शिकागो शहरात रेल्वे बनवणाऱ्या कंपन्यांना कर्ज देऊन दामदुपटीने वसूल केले. नुसते पैसे गुंतवा आणि विसरून जा अशा प्रकारची गुंतवणूक करण्यापेक्षा त्या वेळोवेळी गुंतवणुकीचा आढावा घेऊन खरेदी किंवा विक्री करायच्या.आयुष्याच्या शेवटी त्यांनी मुलाच्या घरी राहणे पसंत केले होते. तिथेदेखील घरातील मदतनीसाशी भांडत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ३ जुलै १९१६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूप्रसंगीच्या संपत्तीचे वर्णन करायचे तर सध्याच्या मूल्यानुसार त्यांची २० हजार कोटी ते ४० हजार कोटी इतकी संपत्ती होती. म्हणजे नक्कीच त्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिला होत्या.

त्यांच्या मुलाने म्हणजे नेडने ऐषोआरामात आयुष्य जगले आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्याची सारी संपत्ती त्यांच्या बहिणीच्या म्हणजे सिल्व्हियाकडे आली. सिल्व्हियाने लग्न केले असले तरी तिला कुणीही मूलबाळ नव्हते म्हणून सारी संपत्ती अखेरीस विविध धर्मदाय व शैक्षणिक संस्थांना दान करण्यात आली.

लेखक कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेण्ट अकाऊंटंट म्हणून कार्यरत /

ashishpthatte@gmail.com

@AshishThatte

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 11:36 IST

संबंधित बातम्या