सध्या काही महिलांचा आपल्या आसपास चांगलाच बोलबाला आहे, एक म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी शर्यतीत उतरलेल्या कमला हॅरिस, सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि बांगलादेशच्या शेख हसीना. पण आजच्या आणि पुढील भागातील महिलादेखील जगात चर्चेत आहेत. मात्र चांगल्या कारणासाठी नव्हे तर एका घोटाळ्यातील सहभागामुळे, जो न्यायालयात सिद्धदेखील झाला आहे. तसे बघायला गेले तर महिलांचा सहभाग घोटाळ्यामध्ये तसा कमीच असतो याचे कारण म्हणजे विशेषतः आपल्या देशामध्ये पुरुषांची वित्तीय क्षेत्रात असणारी सक्रियता. अर्थात याला काही सन्माननीय अपवादसुद्धा आहेतच. पण व्हिएतनाममध्ये जो घोटाळा उघडकीला आला त्यात फक्त महिलेचा सहभाग होता असे नाही तर या घोटाळ्याची व्याप्तीसुद्धा प्रचंड होती आणि ती होती तब्बल ३ लाख ६८ हजार कोटी रुपये म्हणजेच ४४ अब्ज अमेरिकी डॉलर. बरं हा घोटाळा फार जुना नसून एप्रिल २०२४ मध्येच याचा निकाल लागला. पण तरीही भारतातील माध्यमांनी त्याची फारशी दखल घेतल्याचे दिसत नाही. आता बघू या हा घोटाळा नक्की केला कसा.

ट्रॅन्ग माय लॅन असे तिचे नाव. गरीब घरातून आलेली पण तरीही आपली एक वेगळी ओळख तिने स्थावर मालमत्तेच्या उलाढालीतून मिळवली होती. तिचा मूळ उद्योग महिलांच्या केसांच्या संबंधित वस्तू विकण्याचा होता. त्यातूनच तिची ओळख काही राजकारण्यांशी झाली आणि तिच्यामधील गुणांना हेरून तिला स्थावर मालमत्तेसंबंधित उद्योग चालू करण्यास प्रोत्साहन दिले गेले. वर्ष १९५६ मध्ये जन्मलेल्या लॅनने १९९२ मध्ये स्थावर मालमत्ता विकण्याचा उद्योग चालू केला आणि अर्थातच राजकारण्यांच्या आशीर्वादाने त्यात प्रचंड यश मिळवले. वर्ष २०१२ मध्ये तिने ३ दिवाळखोरीत गेलेल्या बँकांचे एकत्रीकरण केले आणि सायगॉन गोन जॉइंट स्टॉक कमर्शियल बँकेची स्थापना केली. या तीन बँक होत्या फर्स्ट बँक (फिकॉमबँक), व्हिएतनाम टिन नागिह बँक आणि सायगॉन बँक (एससीबी). या तिन्ही बँका व्हिएतनामच्या हाओ ची मिन शहरामध्ये होत्या. या शहराचे जुने नाव सायगॉन होते, जे त्यांच्या एका नेत्याच्या नावावरून १९७५ मध्ये बदलले. देशाची राजधानी हनोई असली तरी आर्थिक राजधानी हाओ ची मिनच आहे.

हेही वाचा…रिझर्व्ह बँकेच्या धोरण कठोरतेवर नाराजी; ‘सेन्सेक्स’ची ५८१ अंशांनी घसरंगुडी

व्हिएतनाममध्ये नियम आहे की, तुमचे कुठल्याही बँकेत पाच टक्क्यांपेक्षा जास्त समभागांची मालकी असू शकत नाही. तरीही लॅनने विविध आस्थापनांद्वारे आणि खोट्या कंपन्या उभारून तब्बल ९१.५० टक्के मालकी या नवीन बँकेत मिळवली होती. एकदा का एवढी मोठी मालकी मिळवली की, घोटाळा होणे जवळजवळ निश्चितच! व्हिएतनामी जनतेने विश्वासाने बँकेत पैसे गुंतवले होते, मात्र त्यांचा मोठा विश्वासघात झाला. बँकेने ज्यांना कर्ज म्हणून दिले त्यादेखील बनावट आणि शेल कंपन्या या लॅननेच स्थापन केलेल्या होत्या. म्हणजे हे पैसे तिने बुडवले. वॅन तीनह फॅट असे तिच्या स्थावर मालमत्तेच्या कंपनीचे नाव होते. या कंपनीलादेखील सायगॉन बँकेने कर्ज दिले होते, जे अर्थातच बुडाले. अजून पण घोटाळ्यात बरेच काही आहे जे सामान्यांच्या कल्पनेपलीकडले होते, पण ते पुढील भागात बघू या.