Options Trading Experience Of Uber Driver: एक्सवरील अलिकडच्या एका पोस्टमुळे डेरिव्हेटिव्ह्ज (ऑप्शन्स) ट्रेडिंग करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांच्या जोखमींबद्दलचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. एक्स पोस्टमध्ये एका उबर ड्रायव्हरचा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे, ज्याने ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये २.५ लाख रुपये गमावले होते. विशेष म्हणजे, हा तोटा सहन करणारा उबर ड्रायव्हर महिन्याला फक्त २५,००० रुपये कमावतो.
व्हिडिओमध्ये ड्रायव्हरने त्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे. “२०२४ मध्ये ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये मला २.५ लाख रुपयांचे नुकसान झाले. पण माझ्याकडे काही स्टॉक्स होते आणि ते नफ्यात होते, त्यामुळे त्यात मला कोणताही तोटा झाला नाही. मला झालेला संपूर्ण तोटा ऑप्शन्समुळेच झाला”, असे त्याने स्पष्ट केले. मात्र, या ड्रायव्हरने कबूल केले की त्याने ट्रेडिंग मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले नव्हते. त्यामुळेच त्याला हा तोटा झाला.
जेव्हा त्याला विचारले गेले की हा तोटा त्याच्या वार्षिक उत्पन्नाइतका आहे का, तेव्हा तो फक्त “हो” असे म्हणाला. पुढे, या ड्रायव्हरने स्पष्ट केले की जोपर्यंत त्याच्याकडे “गुंतवणूक करण्यासाठी चांगले भांडवल येत नाही”, तोपर्यंत तो पुन्हा कधीही ऑप्शन्स ट्रेडिंग करणार नाही.
व्हिडिओमध्ये पुढे ड्रायव्हरने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने अलीकडे केलेल्या नियमनातील बदलांचे स्वागत केले, विशेषतः इनॲक्टिव्ह अकाऊंट्सच्या विकली सेटलमेंटऐवजी मंथली फंड सेटलमेंटच्या निर्णयाचे. “सेबीचा हा एक चांगला नियम आहे. यामुळे आता फसवणूक होण्याची शक्यता कमी झाली आहे”, असे हा उबर ड्रायव्हर म्हणाला. यावेळी ड्रायव्हरने व्हिडिओमध्ये उच्च ब्रोकरेज शुल्क आकारण्याबाबतही चिंता व्यक्त केली आहे.
या पोस्टमध्ये बहुराष्ट्रीय ट्रेडिंग कंपनी जेन स्ट्रीटविरुद्ध सेबीच्या निर्णायक कारवाईचे कौतुक करण्यात आले आहे. ही कंपनी कथितपणे बाजारात फेरफार करत होती. दरम्यान, सेबीने जेन स्ट्रीटचे ४,८४० कोटी रुपये जप्त केले आहेत.