February 2026 IPO List In India: फ्रॅक्टल ॲनालिटिक्स, आये फायनान्स, इंडो एमआयएम, क्लीन मॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्स, गजा अल्टरनेटिव्ह ॲसेट मॅनेजमेंट, स्कायवेज एअर सर्व्हिसेस आणि पीएनजीएस रेवा डायमंड या कंपन्यांचे येत्या काही दिवसांत आयपीओ येणार असून, या कंपन्या आयपीओच्या माध्यमातून तब्बल १४ हजार कोटी रुपये उभारणार आहेत. याबाबत सूत्रांच्या हवाल्याने मनीकंट्रोलने वृत्त दिले आहे.

फ्रॅक्टल ॲनालिटिक्स लिमिटेडने आपल्या आयपीओची दिशा आधीच निश्चित केली आहे. त्यांचा आयपीओ ९ फेब्रुवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि ११ फेब्रुवारी रोजी बंद होईल. कंपनी आयपीओद्वारे सुमारे १,०२३ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे, तर ऑफर-फॉर-सेलद्वारे सुमारे १,८१० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. एकूण इश्यूचा आकार ४,९०० कोटी रुपयांवरून ४० टक्क्यांपेक्षा जास्त कमी करून २,८३४ कोटी रुपये करण्यात आला आहे. कंपनीने या आयपीओसाठी प्रति शेअर ८५७-९०० रुपये प्राइस बँड निश्चित केला आहे.

फ्रॅक्टल ॲनालिटिक्स ही प्रगत विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील एक जागतिक कंपनी आहे, जी विविध व्यवसायांना डिजिटल आणि डेटा-आधारित निर्णय घेण्यास मदत करते.

यानंतर येणारा आणखी एक आयपीओ आये फायनान्सचा आहे, जे सुमारे १,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. त्यातील किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा सुमारे १० टक्के असेल, अशी माहिती या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने दिली आहे. याचाही मनीकंट्रोलच्या वृत्तात उल्लेख आहे.

आये फायनान्सचा आयपीओ देखील सबस्क्रिप्शनसाठी ९ फेब्रुवारी रोजी खुला होईल आणि ११ फेब्रुवारी रोजी बंद होईल. कंपनीने प्रति शेअर १२२-१२९ रुपये प्राइस बँड निश्चित केला आहे.

इंडो एमआयएमचा आयोपीओ सर्वात मोठा

या घडामोडींशी संबंधित एका दुसऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, इंडो एमआयएम हा या सर्वांपैकी सर्वात मोठा आयपीओ असण्याची शक्यता आहे, ज्याचा आकार सुमारे ५,५०० कोटी रुपये असेल. यानंतर क्लीन मॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्सचा क्रमांक लागतो, जी आपल्या आयपीओद्वारे सुमारे ३,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.

इतर तीन कंपन्यांचे आयपीओ

या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांच्या मते, उर्वरित तीन कंपन्यांमध्ये गजा अल्टरनेटिव्ह ॲसेट मॅनेजमेंटचा समावेश आहे, जी सुमारे ६५६ कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. स्कायवेज एअर सर्व्हिसेस, जी सुमारे ६५० कोटी रुपयांचा आयपीओ आणण्याची योजना आखत आहे आणि पीएनजीएस रेवा डायमंड सुमारे ३६० कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.