US Iran conflict impact on Indian stock market today: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे गुंतवणूकदारांच्या भावना कुमकुवत झाल्या आहेत. यामुळे प्रमुख भारतीय निर्देशांक २ मार्च रोजी मोठ्या प्रमाणात कोसळल्याचे पाहायला मिळत आहे.
या घसरणीमुळे व्यवहाराच्या पहिल्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले कारण बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ४६३.५० लाख कोटी रुपयांवरून ४५५ लाख कोटी रुपयांवर घसरले.
दुपारी १:४० वाजता, सेन्सेक्स १,५७९.४० अंकांनी किंवा १.९४% ने घसरून ७९,७०७.७९ वर आणि निफ्टी ४७९.५५ अंकांनी किंवा १.९% ने घसरून २४,६९९.१० वर व्यवहार करत होता. यामध्ये सुमारे ५७५ शेअर्स वधारले आहेत, ३,३४२ शेअर्स घसरले आहेत आणि १३५ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
शुक्रवारी भारतीय शेअर बाजार आधीच घसरणीसह बंद झाले होते. सेन्सेक्स ९६१ अंकांनी घसरला होता, तर निफ्टी १.२५ टक्क्यांनी घसरला होता.
आशियाई बाजार आज मोठ्या प्रमाणात नकारात्मक व्यवहार करत आहेत. निक्केई २२५ सुमारे १.५ टक्क्यांनी, हँग सेंग २ टक्क्यांहून अधिक आणि आशिया-पॅसिफिक निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. यूएस इक्विटी-इंडेक्स फ्युचर्स देखील नकारात्मक व्यवहार करत होते.
वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे क्रूड तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ही शेअर बाजारात ही घसरण झाली. ज्यामुळे महागाई, वित्तीय दबाव आणि जागतिक विकासाबद्दल पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या वाढीनंतर ब्रेंट क्रूड ७६ डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत होता.
तेल कंपन्यांशी संबंधित शेअर्स दबावाखाली
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने विमान वाहतूक, ऑटो, पेंट आणि इतर ऊर्जा-केंद्रित क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्स जवळजवळ ५ टक्क्यांनी, लार्सन अँड टुब्रो ३ टक्क्यांहून अधिक, तर मारुती सुझुकी आणि एशियन पेंट्स देखील मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. रिअल्टी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला, निफ्टी रिअल्टी इंडेक्स जवळजवळ ४ टक्क्यांनी घसरला आहे.
दुसरीकडे, ओएनजीसी जवळजवळ ४ टक्क्यांनी वाढला, कारण क्रूडच्या किमती वाढल्याने अपस्ट्रीम रिअलिझेशन वाढू शकते. भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि हिंदाल्कोने देखील वाढ दर्शविली आहे.
तज्ज्ञ काय म्हणाले?
जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही.के. विजयकुमार म्हणाले की, क्रूड तेलामुळे निर्माण होणारा ऊर्जा धोका हा बाजारातील प्रमुख घटक आहे. “जर ब्रेंट क्रूड ७६ डॉलर्सच्या आसपास राहिला तर इक्विटी बाजार कमकुवत राहू शकतात परंतु मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे”, असे ते म्हणाले.
युद्धाशी संबंधित अनिश्चिततेमुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, परंतु संकटांच्या काळात पॅनिक सेलिंग ऐतिहासिकदृष्ट्या प्रतिकूल सिद्ध झाले आहे, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी गुंतवणूकदारांना बँकिंग, ऑटोमोबाईल्स, भांडवली वस्तू आणि संरक्षण यासारख्या देशांतर्गत वापराच्या क्षेत्रांमध्ये हळूहळू उच्च-गुणवत्तेच्या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.
मागील सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७,५३६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते, तर देशांतर्गत संस्थांनी १२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली होती.
