ONGC, Oil India Shares Rise On Crude Oil Spike: गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ले केल्याने संपूर्ण आखाती प्रदेशात परिस्थिती बिकट झाली आहे. याचा आज भारतीय शेअर बाजारांवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आज बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. व्यापाराच्या सुरुवातीच्या मिनिटांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८ लाख कोटींहून अधिक रुपयांची घट झाली आहे.
दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्षाचा खालील कंपन्यांच्या शेअर्सना फटका बसला आहे;
लार्सन अँड टुब्रो
भारतातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा समूहाचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात ४% पेक्षा जास्त घसरले आहेत. कारण या समूहाची मध्य पूर्वेत लक्षणीय गुंतवणूक आहे. त्यांच्या एकूण ऑर्डर बुकपैकी जवळजवळ ३५% ऑर्डर्स पश्चिम आशियातून येतात.
व्हीए टेक वाबाग
मध्य पूर्वेत, विशेषतः सौदी अरेबियामध्ये व्हीए टेक वाबागचे प्रकल्प सुरू असल्याने हा शेअर ४% तोट्यासह व्यवहार करत आहे.
कल्पतरू प्रोजेक्ट्स
आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत त्यांच्या एकूण ऑर्डर बुकपैकी ११% ऑर्डर्स मध्य पूर्वेकडील आहेत. कंपनी या प्रदेशातील मोठ्या प्रकल्पांसाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे आज त्यांच्या शेअर्समध्ये ३% पेक्षा जास्त घसरण झाली आहे.
एलटी फूड्स आणि केआरबीएल
या दोन्ही तांदूळ उत्पादक कंपन्यांचे शेअर्स ३% ते ४% पर्यंत घसरले आहेत कारण या प्रदेशात तांदळाच्या निर्यातीबाबत चिंता वाढली आहे. केआरबीएलला बासमती तांदळाच्या निर्यातीतील जवळपास ६१% महसूल मध्य पूर्व आणि जीसीसी प्रदेशातून मिळतो, तर २०२५ च्या आर्थिक वर्षात एलटी फूड्सच्या ९% महसूल मध्य पूर्वेतील निर्यातीतून आला आहे.
इंडिगो
इराणच्या प्रत्युत्तरामुळे विमान वाहतूक क्षेत्रासाठी महत्त्वाचे ट्रान्झिट हब असलेल्या दुबई, अबू धाबी आणि दोहा या प्रदेशांना फटका बसल्यानंतर भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे शेअर्सही जवळपास ५% घसरले आहेत.
संरक्षण क्षेत्रातील शेअर्सना फायदा
सोमवारी पारस डिफेन्स, आयडियाफोर्ज या भारतातील संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये १०% पर्यंत वाढ झाली आहे कारण संरक्षण क्षेत्रातील शेअर्स सामान्यतः अशा संघर्षांना सकारात्मक प्रतिसाद देतात. त्यामुळे संरक्षण उपकरणांची आणि त्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या घटकांची मागणी वाढते.
भारत डायनॅमिक्स आणि डेटा पॅटर्न्सचे शेअर्सदेखील ३% ते ४% च्या दरम्यान वाढीसह व्यवहार करत आहेत.
ओएनजीसी, ऑइल इंडियामध्ये वाढ
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ ओएनजीसी आणि ऑइल इंडिया सारख्या कंपन्यांच्या शेअर्ससाठी फायदेशीर ठरत आहे. या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स ३% ते ४% च्या दरम्यान वाढीसह व्यवहार करत आहेत.
