सामान्य माणूस रात्रंदिवस मेहनत करून आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा काही भाग पीएफ खात्यात जमा करतो, जेणेकरून वृद्धापकाळात सेवानिवृत्तीनंतर त्याचे आयुष्य व्यवस्थित जाऊ शकेल. आपले पैसे सुरक्षित ठेवण्याची काळजी सरकारी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) घेत असते. पण आता ईपीएफओच्या एका निर्णयानंतर तुमचे पैसे खरेच सुरक्षित राहतील का?, असाच प्रश्न विचारला जातोय.
देशातील सुमारे ६ कोटी लोकांच्या पीएफ खात्यातील पैसे ईपीएफओकडे जमा आहेत. EPFO वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून त्यावर व्याज मिळवते आणि नंतर त्याचे योगदानकर्त्यांमध्ये वाटप करते. यातील काही भाग ईपीएफओने शेअर बाजारातही गुंतवला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे मानले जात असले तरी आता EPFO पूर्वीपेक्षा शेअर बाजारात आपली गुंतवणूक वाढवणार आहे.




शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवणार
ईपीएफओ शेअर बाजारातील गुंतवणूक वाढविण्याच्या विचारात आहे. तसेच एक्सचेंज ट्रेडेड फंडांद्वारे जमा केलेले पैसे इक्विटी आणि इतर पर्यायांमध्ये पुन्हा गुंतवले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, EPFO लवकरच यासंदर्भात अर्थ मंत्रालयाकडे मंजुरी मागणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त परतावा मिळू शकेल. यासंदर्भात ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच निर्णय घेतला होता. मार्चमध्ये झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तातही याचा उल्लेख आहे. मिनिट्सनुसार, ईपीएफओची इच्छा आहे की, ईटीएफमध्ये जमा केलेले पैसे आता इक्विटी किंवा इतर संबंधित पर्यायांमध्ये गुंतवले जावेत. असे केल्याने EPFO ची शेअर बाजारात थेट गुंतवणूक वाढेल आणि ती शेअर्समधील गुंतवणुकीच्या १५ टक्के मर्यादेपर्यंत पोहोचेल.
हेही वाचाः आदित्य बिर्ला समूह आता ज्वेलरी रिटेल व्यवसायात उतरणार; ५००० कोटींची गुंतवणूक करणार
EPFO आपल्या निधीची गुंतवणूक वित्त मंत्रालयाच्या पद्धतीनुसार करते. सध्या EPFO ETF द्वारे इक्विटीमध्ये दरवर्षी वाढणाऱ्या ठेवींपैकी केवळ ५ ते १५ टक्के गुंतवणूक करू शकते. बाकीचे पैसे त्यांना डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवावे लागतात. ईटीएफ रिडीम केल्यानंतर येणारे पैसे कसे वापरायचे याबद्दल कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत.
हेही वाचाः ४० हजार रुपये दरमहा खात्यात येणार, तुमच्या आई-वडिलांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना
तुमच्या बचतीवरची जोखीम वाढेल का?
जानेवारी २०२३ च्या आकडेवारीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची केवळ १० टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली गेली आहे. खरं तर फंडाच्या १५ टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवण्याची परवानगी आहे. ईपीएफओने २०१५-१६ पासून ईटीएफद्वारे इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत EPFO ने ETF मध्ये एकूण १,०१,७१२.४४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हे त्यांच्या एकूण ११,००,९५३.५५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या ९.२४ टक्के आहे. ईपीएफओला यातून जास्तीत जास्त परतावा मिळणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, EPFO चा हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा अस्थिर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे असू शकते. हे लोकांच्या कष्टाचे पैसे धोक्यात घालण्यासारखे असल्याचंही अनेक अर्थतज्ज्ञांचं मत आहे.