Zerodha App : भारत आणि अमेरिकेने बहुप्रतिक्षित व्यापार कराराची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीदरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी (आज) झिरोधा या ट्रेडिंग ॲपमध्ये अनेक युजर्सना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. या युजर्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या समस्या सर्वांसमोर मांडल्या आहेत.

अनेक युजर्सनी दावा केला आहे की, झिरोधा ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना वेळेवर आपले व्यवहार पूर्ण करता आले नाहीत आणि त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, झिरोधाने या कथित तांत्रिक अडचणींबाबत अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

डाउनडिटेक्टरनुसार, आज शेअर बाजार सुरू झाल्यानंतर पहिल्या तासात अनेक युजर्सनी झिरोधा ॲपमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार केली आहे. सकाळी सुमारे ९.२० वाजता सेन्सेक्स २५१०.७२ अंकांनी किंवा ३.०७ टक्क्यांनी वाढून ८४,१७७.१८ वर पोहोचला असताना युजर्सनी आपल्या तक्रारी मांडल्या.

एका युजरने दावा केला की, तांत्रिक बिघाडामुळे त्याचे आज जवळपास ५०,००० रुपयांचे नुकसान झाले. त्याने सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर केले आहे, ज्यामध्ये ॲपवर त्याच्या पोझिशन्स आणि होल्डिंग्स शून्य दाखवली जात आहेत. दुसऱ्या एका युजरने ॲपवरील एरर मेसेजचे छायाचित्र शेअर केले आहे.

अनेक युजर्सना कथितरित्या “504 Gateway Timeout” हा एरर दिसत होता. “एका महत्त्वाच्या दिवशी तुम्ही अयशस्वी झालात. या समस्यांसाठी कोणाला जबाबदार धरले पाहिजे? चार्ट सेटिंग्ज बदलल्या आहेत. किमती अपडेट होत नसल्यामुळे पोझिशन्स व्यवस्थित दिसत नाहीत. एंट्री किंवा एक्झिट घेता येत नाही. मी पाहिले आहे की अशा सर्व मोठ्या घटना किंवा प्रसंगी असेच घडते”, असे एका चार्टर्ड अकाउंटंटने सोशल मीडियावर लिहिले आहे.

दुसऱ्या एका युजरने दावा केला की, त्याला ग्रोवरही समस्या येत आहेत. “आज सकाळी ९:१५ ते ९:२० दरम्यान झिरोधा आणि ग्रो दोन्ही ॲप्समध्ये तांत्रिक अडचणी होत्या. मी हे ॲप्स वापरतो. ही लाजिरवाणी गोष्ट आहे की गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सना वाऱ्यावर सोडले जात आहे. हे पूर्णपणे ठग आहेत जे जाणीवपूर्वक त्रुटी शोधून लूट करत आहेत”, असे त्याने लिहिले.