मुंबई : टाटा समूहातील महत्त्वाच्या नेतृत्व बदलांच्या आणि व्यवसाय पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांची कन्या माया टाटा या लवकरच टाटा डिजिटलमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. टाटा समूहातील इतर कंपन्यांमध्ये नव्या भूमिकेची जबाबदारी स्वीकारण्याबाबत त्या विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

वृत्तानुसार, ३७ वर्षीय माया टाटा या सध्या टाटा समूहातील विविध पर्यायांचा विचार करत असून, विशेषतः Trent Limited आणि Tata Consumer Products या कंपन्यांमध्ये भूमिका स्वीकारण्याची शक्यता तपासली जात आहे. यामध्ये ट्रेंट हा त्यांचा पसंतीचा पर्याय असल्याचे सांगितले जात आहे.

टाटा डिजिटलमध्ये मोठी फेररचना

जेव्हा टाटा डिजिटल कंपनीत व्यापक पुनर्रचना सुरू आहे., अशावेळी ही घडामोड समोर आली आहे. टाटा सन्सने आतापर्यंत टाटा डिजिटलमध्ये २४ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली असून, कंपनीच्या तोट्यांबाबत नोएल टाटा यांनी चिंता व्यक्त केल्याचे वृत्त आहे. कंपनीअंतर्गत चालणाऱ्या टाटा न्यू, बिगबास्केट, क्रोमा आणि 1mg या व्यवसायांच्या कामगिरीवरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. वृत्तानुसार, खर्च नियंत्रण आणि कार्यक्षमतेसाठी टाटा न्यूच्या कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे.

माया टाटा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात Tata Capital येथे केली होती. त्यानंतर त्यांनी टाटा डिजिटलमध्ये काम सुरू केले. त्यांचे बंधू नेव्हिल टाटा हे आधीपासूनच ट्रेंटशी संबंधित असून स्टार बाजार व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर बहीण लेआ टाटा या इंडियन हॉटेल्स कंपनी मध्ये कार्यरत आहेत.

तोट्यांवरून वाढलेले प्रश्न

अलीकडील काही बैठकींमध्ये नोएल टाटा यांनी टाटा समूहातील तोट्यातील व्यवसायांच्या कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे वृत्त आहे. विशेषतः टाटा डिजिटल, एअर इंडिया आणि इतर नव्या व्यवसायांमधील मोठ्या गुंतवणुकीच्या परताव्याबाबत स्पष्ट रोडमॅप मागितल्याचेही सांगितले जाते. मात्र, माया टाटा यांच्या संभाव्य बदलीबाबत टाटा समूहाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तरीही टाटा समूहातील नेतृत्व, उत्तराधिकार नियोजन आणि व्यवसाय पुनर्रचनेच्या दृष्टीने या घडामोडीकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत माया टाटा?

माया टाटा यांनी ब्रिटनमधील Bayes Business School आणि University of Warwick येथे शिक्षण घेतले. व्यवसाय, वित्त आणि व्यवस्थापन क्षेत्रात त्यांचे शिक्षण झाले आहे. त्यांनी सुरुवातीला Tata Capital अंतर्गत असलेल्या Tata Opportunities Fund मध्ये काम केले. त्यानंतर त्यांची बदली Tata Digital मध्ये करण्यात आली, जिथे त्यांनी डिजिटल व्यवसाय आणि Tata Neu प्लॅटफॉर्मशी संबंधित प्रकल्पांमध्ये भूमिका बजावली.

त्या Tata Medical Center Trust, Tata Education Trust, RD Tata Trust आणि इतर काही टाटा ट्रस्टशी संबंधित विश्वस्त मंडळांवर कार्यरत आहेत.

२०२५ मध्ये त्यांची आणि त्यांची बहीण Leah Tata यांची Sir Ratan Tata Industrial Institute च्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती.

सध्या त्या चर्चेत का आहेत?

अलीकडील वृत्तांनुसार, टाटा डिजिटलमधील फेररचनेच्या पार्श्वभूमीवर माया टाटा कंपनीतून बाहेर पडून Trent Limited किंवा Tata Consumer Products मध्ये नवी जबाबदारी स्वीकारू शकतात. विशेषतः ट्रेंटमध्ये जाण्याची शक्यता अधिक असल्याचे वृत्त आहे. टाटा समूहातील पुढील नेतृत्व पिढीमध्ये नोएल टाटा यांची तीन मुले — Leah Tata, Maya Tata आणि Neville Tata — यांच्याकडे उद्योगजगताचे विशेष लक्ष आहे. भविष्यात टाटा समूहाच्या विविध व्यवसायांमध्ये त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.