नवी दिल्ली : टाटा समूहातील विविध ट्रस्टच्या विश्वस्तपदाचा मेहली मिस्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आणण्याच्या निर्णयाला त्यांनी धर्मादाय आयुक्तांसमोर आव्हान दिले आहे. यावर उत्तर देण्यास मुदतवाढ देण्याची मागणी टाटा ट्रस्टने केली होती. या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी १५ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे.

टाटा समूहातील तीन ट्रस्टमध्ये मेहली मिस्त्री हे विश्वस्त होते. टाटा ट्रस्टने त्यांचा विश्वस्तपदाचा कार्यकाळ ट्रस्टने संपुष्टात आणून या बदलाचा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला होता. याला मेहली यांनी धर्मादाय आयुक्तांसमोर आव्हान दिले आहे. मिस्त्री यांनी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी आणखी अवधी देण्याची मागणी टाटा ट्रस्टच्या वकिलांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली. याला मिस्त्री यांच्या वकिलांनी विरोध केला. अखेर धर्मादाय आयुक्तांनी टाटा ट्रस्टचे मागणी मान्य करून या प्रकरणाची सुनावणी १५ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

टाटा समूहातील तीन ट्रस्टमधून विश्वस्त म्हणून मिस्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात आणल्याचा बदल अहवाल टाटा ट्रस्टने सादर केला आहे. ही प्रक्रिया आणि निर्णयाशी निगडित प्रशासकीय मुद्द्यांना मिस्त्री यांनी आक्षेप घेतले आहेत. टाटा समूहातील विविध ट्रस्टची रचना आणि त्यांच्या प्रशासकीय पद्धतीवरही बोट ठेवण्यात आले आहे. यावर धर्मादाय आयुक्तांसमोर मंगळवारी सुनावणी झाली. टाटा ट्रस्टने या प्रकरणी उत्तर देण्यास मुदतवाढ मागितली. यासाठी सर रतन टाटा ट्रस्टच्या विश्वस्तपदाची मुदत संपल्यानंतर बाहेर पडलेल्या विजय सिंह यांच्या प्रकरणाचा दाखला देण्यात आला. विजय सिंह यांची मुदत १४ ऑगस्टला संपल्यानंतर त्यांनी मुदतवाढ मागितली नव्हती.

ट्रस्टच्या रचनेस आव्हान पुढील सुनावणीवेळी धर्मादाय आयुक्तांकडून टाटा ट्रस्टचे उत्तर आणि मिस्त्री यांचे आक्षेप यावर निर्णय घेतला जाईल. टाटा समूहातील विविध ट्रस्टच्या रचनेशी निगडित बदल अहवालाला आव्हान देण्यात आल्याने ही सुनावणी महत्वाची ठरणार आहे. टाटा समूहातील सर रतन टाटा ट्रस्ट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, बाई हिराबाई जमशेटजी टाटा नवसारी चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टमधील मिस्त्री यांचा कार्यकाळ बदल अहवालाद्वारे संपुष्टात आण्यात आला होता.