Satya Nadella AI Cricket Analysis App: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले की, सध्या ते त्यांचा मोकळा वेळ एआय-आधारित क्रिकेट विश्लेषण अ‍ॅप तयार करण्यात घालवत आहेत. बेंगळुरूमधील एका कार्यक्रमात बोलताना सत्या नाडेला म्हणाले की तंत्रज्ञान आणि क्रिकेटवरील प्रेमामुळे ते हे अ‍ॅप विकसित करत आहेत.

अ‍ॅप विकसित होत असताना सत्या नाडेला यांनी या अ‍ॅपचा वापर भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम कसोटी संघ निवडण्यासाठी देखील केला होता. त्यांनी प्रेक्षकांना संघातील प्रत्येक खेळाडूच्या निवडीचे मूल्यांकन कसे केले ते सांगितले, ज्यामध्ये विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात कर्णधारपद कोणाला द्यायचे या निर्णयाचाही समावेश होता, ज्यामध्ये कोहली सरस ठरला.

सत्या नाडेला यांनी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये गुंतवणूक

सत्या नाडेला यांनी फ्रँचायझी क्रिकेट संघांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या हे अ‍ॅप त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. इतर तंत्रज्ञान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत, त्यांनी द हंड्रेड लीगमधील लंडन स्पिरिट संघाची ४९ टक्के मालकी खरेदी केली आहे. ते अमेरिकेतील सिएटल ऑर्कास या व्यावसायिक टी२० क्रिकेट संघाचे सह-मालक देखील आहेत.

मायक्रोसॉफ्टने वॉशिंग्टन येथील त्यांच्या मुख्यालयाच्या पुनर्विकासादरम्यान तेथे क्रिकेट मैदानाचाही समावेश केला आहे, जिथे भारतीय वंशाचे अभियंते मोठ्या प्रमाणात आहेत. यावरून सत्या नाडेला यांचे क्रिकेटप्रेम दिसून येते.

“हे कदाचित अमेरिकेतील एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने मुख्यालयात बांधलेले पहिले क्रिकेट मैदान असेल”, असे मायक्रोसॉफ्टने त्यावेळी म्हटले होते.

कोण आहेत सत्या नाडेला?

सत्या नाडेला यांचा जन्म १९६९ मध्ये हैदराबाद येथे झाला, त्यांचे शालेय शिक्षण तेथेच हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये झाले. मणिपाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून त्यांनी अभियांत्रिकीत पदवी घेतली व नंतरचे शिक्षण परदेशात पूर्ण केले. शिकागो विद्यापीठातून एमबीए केल्यानंतर १९९२ मध्ये ते मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले.

सुरुवातीला ते विंडोज डेव्हलपमेंट रिलेशन्स ग्रुपमध्ये प्रोग्रॅम मॅनेजर होते. नंतर ते वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन व विकास) या पदावर बढती झाली. सध्या ते मायक्रोसॉफ्ट वर्ड व क्लाऊड अँड एंटरप्राइजेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आहेत. क्लाउड विभागात त्यांनी केलेले काम पाहून त्यांना ‘क्लाऊड गाय’ असेही म्हटले जाते.