Premium

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, धानासह अनेक पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

मोदी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार तूर डाळीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Modi government big decision

शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारने अनेक पिकांवरची किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. ही वाढ २०२३-२४ या आर्थिक वर्षातील खरीप पिकांसाठी करण्यात आली आहे. मोदी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार तूर डाळीच्या किमान आधारभूत किमतीमध्ये प्रति क्विंटल ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर धान, मका आणि भुईमुगाच्या किमान आधारभूत किमतीमध्येही वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असून, नवीन पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. शेतीचा वाढता खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्या पिकाचा MSP किती वाढला?

मंत्रिमंडळाने २०२३-२४ साठी उडीद डाळीचा एमएसपी प्रति क्विंटल ३५० रुपयांनी वाढवून ६,९५० रुपये प्रति क्विंटल केला आहे. त्याचबरोबर मक्याचा एमएसपी १२८ रुपये प्रति क्विंटल आणि धानाचा एमएसपी १४३ रुपये प्रति क्विंटलने वाढवून २,१८३ रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मोदी मंत्रिमंडळाकडून मूगाच्या एमएसपीमध्ये कमाल ८०३ रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे आणि मुगावरील एमएसपी ८,५५८ रुपये प्रति क्विंटलवर गेला आहे.

एमएसपीमध्ये यंदा सर्वाधिक वाढ झाली

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, कृषी क्षेत्रात आम्ही वेळोवेळी CACP (कृषी खर्च आणि किमती आयोग) च्या शिफारशींच्या आधारे एमएसपी निश्चित करीत आहोत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा खरीप पिकांसाठी एमएसपीमध्ये झालेली वाढ सर्वाधिक आहे.

हेही वाचाः मोदी सरकार आता ‘या’ कंपनीचा हिस्सा विकणार; ३८ हजार कोटींचा निधी जमवणार

मान्सून सामान्य राहणार

एल निनोचा प्रभाव असला तरी जून ते सप्टेंबर दरम्यान वातावरण सामान्य राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. मात्र, एक जूनला मान्सून केरळमध्ये वेळेवर पोहोचू शकलेला नाही.

हेही वाचाः पीएफमध्ये जमा केलेले आपले कष्टाचे पैसे धोक्यात? EPFOचा शेअर्समधील गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही मोदी सरकारचे कौतुक

शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांच्या वतीने केंद्र सरकारचे आभार, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 09:30 IST
Next Story
Money Mantra: प्राप्तिकर कायद्यानुसार उत्पन्नाचे प्रकार किती? संपत्ती म्हणजे काय? (भाग दुसरा)