MomsMade Thekua Business : बॉलिवूड अभिनेता आर. माधवन आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. यावेळी त्याची पोस्ट कुठल्या चित्रपटाचे प्रमोशन करणारी नाही की जाहिरात नाही तर, अशा एका माय-लेकाची आहे, ज्यांनी घरातून सुरू केलेल्या व्यवसायाचे रुपांतर आज ७५ कोटी रुपयांच्या साम्राज्यात झालं आहे. विशेष म्हणजे बिहारचा पारंपरिक आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ असलेल्या ‘ठेकुआ’ने आता थेट आयटी हब असलेल्या बंगळुरू शहरात आपले स्थान निर्माण केले आहे.

घरच्या स्वयंपाकघरातल्या ४ शेगड्यांवरून सुरुवात

बिहारमध्ये १५ वर्षे अध्यपनाचे काम केलेल्या वीणा देवी मुलासाठी (समीर) बंगळुरूला स्थलांतरित झाल्या. मात्र, कामाची सवय असलेल्या वीणा देवी यांना घरात बसून राहवेना. सुरुवातील त्यांनी विरंगुळा म्हणून राहत्या सोसायटीत घरगुती स्नॅक्स तयार करून देण्यास सुरुवात केली. तेव्हाच मुलगा समीरच्या डोक्यात एक बिझनेस आयडिया आली. बाजारपेठेत मिळणाऱ्या पदार्थांमध्ये रसायने, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि पाम ऑईलचा अतिवापर होतो. यातूनच ‘मॉम्समेड’ या ब्रँडने जन्म घेतला. या ब्रँडअंतर्गत त्यांनी बिहारमधील लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ ‘ठेकुआ’ विकण्यास सुरुवात केली.

आरोग्यदायी ‘ठेकुआ’!

ठेकुआ बनवताना साखर, मैदा किंवा पाम ऑईलचा अजिबात वापर केला जात नाही. त्याऐवजी शुद्ध गूळ, साजूक तूप आणि गव्हाचे पीठ वापरून अत्यंत आरोग्यदायी आणि चविष्ट ठेकुआ तयार केले जातात. त्यामुळे बाजारातील पदार्थांपेक्षा मॉम्समेड ठेकुआची चव खास आहे.

रोज १००० हून अधिक ऑर्डर्स; १५ कोटींचे वार्षिक उत्पन्न

सुरुवातीला घराच्या स्वयंपाकघरात अवघ्या ४ शेगड्यांवरून वीणा देवी यांनी ठेकुआ बनवणे सुरू केले, तर समीरने मार्केटिंगची धुरा सांभाळली. या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १५ कोटी रुपये आहे, तर ब्रँडचे एकूण मूल्य ७५ कोटी रुपयांवर गले आहे. मॉम्समेडला नियमित १,००० हून ऑर्डर्स येतात. आज या व्यवसायाच्या माध्यमातून ५० महिलांना थेट रोजगार मिळाला असून, त्या निर्मितीपासून पॅकेजिंगपर्यंतचे काम पाहतात. ठेकुआव्यतिरिक्त ही कंपनी नीमकी आणि चना डाळ यांसारखे पारंपरिक स्नॅक्सही तयार करते.

आर. माधवनकडून कौतुकाचा वर्षाव

टेक इनव्हेस्टर आदित्य सिंग यांनी शेअर केलेली ही सक्सेस स्टोरी अभिनेता आर. माधवन याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर री-पोस्ट केली. “स्थानिक आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीला योग्य ब्रँडिंग आणि दर्जाची जोड दिली, तर काय कमाल होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे,” अशा शब्दांत या उद्योजकांचे कौतुक केले जात आहे.