पीटीआय, नवी दिल्ली: आशियातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘मूडीज रेटिंग्स’ने मोठा दिलासा दिला आहे. मूडीजने रिलायन्सचे पतमानांकन ‘Baa2’ वरून ‘Baa1’ वर उंचावले आहे. विशेष म्हणजे, हे रेटिंग भारताच्या सार्वभौम पतमानांकनापेक्षा दोन स्तरवर आहे. कंपनीची मजबूत आर्थिक स्थिती, शिस्तबद्ध वित्तीय धोरणे आणि वैविध्यपूर्ण व्यवसाय यामुळे हे मानांकन सुधारले आहे. भारताचे सार्वभौम रेटिंग सध्या ‘Baa3’ आहे.

रिलायन्सची मजबूत आर्थिक स्थिती, विविध क्षेत्रांतील व्यवसायांची उपस्थिती, शिस्तबद्ध वित्तीय धोरणे आणि सातत्यपूर्ण रोख प्रवाह यामुळे हा दर्जावाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे मूडीजने स्पष्ट केले. मूडीजच्या अहवालानुसार, रिलायन्सने तेल-ते-रसायने (ऑइल-टू-केमिकल्स), दूरसंचार, डिजिटल सेवा आणि किरकोळ विक्री या क्षेत्रांत मजबूत बाजारपेठीय स्थान निर्माण केले आहे. तसेच कंपनीच्या एकूण महसुलापैकी एक-तृतीयांशहून अधिक हिस्सा निर्यातीमधून येत असल्याने जागतिक स्तरावरही तिची उपस्थिती मजबूत आहे.

रिलायन्सकडे सुमारे २५ अब्ज डॉलरची रोख उपलब्धता असून कर्जाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मजबूत रोख प्रवाह, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारांमध्ये सहज निधी उभारण्याची क्षमता आणि सावध वित्तीय धोरणे यामुळे कंपनीची पतक्षमता अधिक बळकट झाल्याचे मूडीजने म्हटले आहे.

विशेष म्हणजे, निव्वळ कर्ज शून्यावर आणण्याचे सार्वजनिक वचन देऊन ते प्रत्यक्षात पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय कंपन्यांमध्ये रिलायन्सचा समावेश असल्याचेही संस्थेने नमूद केले. यामुळे उच्च पतमानांकनाला साजेशी आर्थिक शिस्त कंपनीने कायम ठेवली असल्याचे अधोरेखित झाले आहे. मात्र, रिलायन्सचा दूरसंचार आणि किरकोळ विक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणावर भारतीय अर्थव्यवस्थेवर अवलंबून असल्याने कंपनीचे पतमानांकन भारताच्या सार्वभौम पतमानांकनापेक्षा दोन स्तरांपेक्षा अधिक वाढविता येणार नसल्याचे मूडीजने स्पष्ट केले.

रिलायन्ससाठी ‘स्थिर’ दृष्टिकोन कायम ठेवला आहे. पुढील एक ते दोन वर्षांत कंपनीच्या प्रमुख व्यवसायांमधील उत्पन्नवाढ कायम राहील आणि आर्थिक निर्देशक मजबूत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मूडीजच्या मते, भारताच्या सार्वभौम पतमानांकनात सुधारणा झाल्यास आणि कंपनीचे आर्थिक निर्देशक मजबूत राहिल्यास भविष्यात आणखी श्रेयवाढीची शक्यता आहे. उलट, आक्रमक भांडवली खर्च, मोठ्या अधिग्रहणांमुळे कर्जवाढ किंवा व्यवसायाच्या कामगिरीत लक्षणीय घसरण झाल्यास पतमानांकनावर दबाव येऊ शकतो.

‘नेट डेट झिरो’चे उद्दिष्ट: आर्थिक शिस्त राखत ‘नेट डेट झिरो’ (पूर्णपणे कर्जमुक्त) स्थिती गाठणारी आणि तशी कटिबद्धता दाखवणारी रिलायन्स ही देशातील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. पुढील १ ते २ वर्षांत कंपनीच्या सर्वच क्षेत्रांतील व्यवसायांमध्ये उत्तम नफा वाढ होईल आणि आर्थिक ताळेबंद मजबूत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

रिलायन्सकडून ५ वर्षांत १३० टक्के परतावा

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा सध्याचा बाजारभाव ३,००० रुपये आहे. सध्याच्या घडीला रिलायन्सचे एकूण बाजारभांडवल सुमारे १९.८० लाख कोटी रुपये इतके असून, ही बाजार मूल्याच्या दृष्टीने भारतातील पहिल्या क्रमांकाची सर्वात मोठी लार्ज-कॅप कंपनी आहे. रिटर्नचा विचार केला तर, रिलायन्सने गुंतवणूकदारांना सातत्याने स्थिर आणि चांगला परतावा दिला आहे. गेल्या १ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना अंदाजे १९% ते २३% च्या दरम्यान परतावा दिला आहे. जर दीर्घकालीन परतावा पाहिला, तर गेल्या ५ वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना १३०% पेक्षा जास्त मजबूत परतावा दिला आहे.

“रिलायन्सचे मोठे नेटवर्क, विविध क्षेत्रांतील कमाईचे स्त्रोत आणि सरकारी महसुलावर असलेले मर्यादित अवलंबित्व यामुळे आर्थिक मंदीच्या काळातही स्थिर नफा कमावण्याची कंपनीची क्षमता दिसून येते.”
– मूडीज रेटिंग्स