मुंबई : आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी, तेल ते दूरसंचार आणि किरकोळ विक्री अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या त्यांच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ या समूहाकडून सलग सहाव्या वर्षी कोणतेही वेतन घेतले नाही. केवळ कंपनीकडून मिळणार लाभांश हाच त्यांच्या कमाईचा मुख्य स्रोत राहिला आहे.
अंबानी यांनी आर्थिक वर्ष २००८-०९ (एप्रिल २००८ ते मार्च २००९) पासून २०१९-२० पर्यंत त्यांचे वार्षिक मानधन १५ कोटी रुपयांवर मर्यादित ठेवले होते. त्यानंतर, आर्थिक वर्ष २०२१ पासून, करोना महासाथीमुळे कंपनी आणि तिचे सर्व व्यवसाय पुन्हा पूर्ण क्षमतेने नफा कमावण्याच्या स्थितीत येईपर्यंत, त्यांनी वेतन न घेण्याचा निर्णय घेतला. मुकेश अंबानी यांची एप्रिल २०२९ पर्यंतच्या आणखी पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आणि या कालावधीत त्यांनी कोणतेही वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात, त्यांना वेतन, भत्ते, इतर सुविधा आणि निवृत्तीकालीन लाभ म्हणून ‘शून्य’ रक्कम मिळाली आहे. मानधन स्वेच्छेने सोडून देण्याची ही प्रक्रिया जून २०२० मध्ये सुरू झाली; करोना काळात देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक आरोग्यावर झालेला विनाशकारी परिणाम लक्षात घेऊन, अंबानी यांनी संपूर्ण वेतन न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ आणि आता २०२५-२६ मध्येही कायम ठेवला आहे.
आजच्या जागतिक कॉर्पोरेट विश्वात हे उल्लेखनीय आहे; बऱ्याच कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे अवाजवी मानधन हा भागधारक आणि कंपनीच्या प्रशासनाशी संबंधित एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. याउलट, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये, रिलायन्सने ९५,७५४ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक नफा आहे आणि कंपनीचे बाजार भांडवल १८,१९,१०३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
लाभांशापोटी ९.६६ कोटी
१०० अब्ज डॉलरच्या किंचित कमी निव्वळ संपत्तीसह जगातील २१ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अंबानी यांच्या कमाईचा मुख्य स्रोत मात्र लाभांशातून मिळणारे उत्पन्न असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे रिलायन्समध्ये १.६१ कोटी समभाग आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ साठी जाहीर केलेल्या प्रति समभाग ६ रुपये लाभांशाच्या आधारे, त्यांना लाभांशापोटी ९.६६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यांच्या नियंत्रणाखालील ‘प्रवर्तक गटातील’ कंपन्यांकडे ६६४.५ कोटी समभाग (किंवा ५०.०७ टक्के हिस्सेदारी) आहेत, ज्यातून त्यांना ३,९८७ कोटी रुपयांचे लाभांश उत्पन्न प्राप्त होते.
चुलत्यांना २५ कोटी वेतन
अंबानी यांचे चुलत भाऊ – निखिल आणि हिताल मेसवानी – यांचे मानधन प्रत्येकी २५ कोटी रुपयांवर स्थिर राहिले आहे. या रकमेमध्ये १० कोटी रुपये पगार, भत्ते आणि इतर सुविधा, ४४ लाख रुपये निवृत्तीकालीन लाभ आणि १४.५६ कोटी रुपये नफ्यावरील कमिशन यांचा समावेश आहे. कार्यकारी संचालक पी. एम. एस. प्रसाद यांचे मानधन आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील १९.९६ कोटी रुपयांवरून वाढून, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये २०.५८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
अंबानी यांची तीन मुले – ईशा, आकाश आणि अनंत – यांची ऑक्टोबर २०२३ मध्ये संचालक मंडळावर (बोर्डावर) नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना कोणत्याही पगाराशिवाय (शून्य पगार) केवळ ‘बैठक शुल्क’ आणि नफ्यावरील कमिशन देण्याचे निश्चित करण्यात आले होते. जुळे भाऊ-बहीण असलेल्या आकाश आणि ईशा यांना प्रत्येकी ५ लाख रुपये बैठक शुल्क आणि २.५ कोटी रुपये कमिशन म्हणून मिळाले.
अंबानी यांच्या मुलांमध्ये सर्वात धाकटा असलेल्या अनंत याची गेल्या वर्षी रिलायन्सच्या संचालक मंडळावर ‘कार्यकारी संचालक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; आर्थिक वर्ष २०२६ मध्ये त्याला १२.१७ कोटी रुपयांचा पगार (ज्यामध्ये २.२९ कोटी रुपयांच्या कमिशनचा समावेश आहे) मिळाला.
