मुंबई: भारतातील पुनर्वापर क्षेत्राचा पुढील टप्पा केवळ कचऱ्याचे प्रमाण वाढवण्यावर नसून, प्रगत तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि शुद्धतेवर केंद्रित असेल. यामुळे आयात केलेल्या कच्च्या मालावरील अवलंबित्व कमी होऊन देश ‘सर्क्युलर इकॉनॉमी’च्या दिशेने वेगाने पुढे जाईल, असा विश्वास उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सोमवारपासून ‘प्लास्टिक्स रिसायकलिंग शो इंडिया’ आणि ‘भारत रिसायकलिंग शो’ या तीन दिवसांच्या संयुक्त प्रदर्शनाला सुरुवात झाली. मीडिया फ्यूजन आणि क्रेन कम्युनिकेशन्सद्वारे आयोजित या प्रदर्शनांमध्ये १५० हून अधिक प्रदर्शक प्लास्टिक, धातू, ई-कचरा आणि बॅटरी पुनर्वापराच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करत आहेत.

मीडिया फ्यूजनचे व्यवस्थापकीय संचालक ताहेर पात्रावाला यांनी, विखुरलेल्या पुनर्वापर क्षेत्राला एकत्र आणण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे माध्यम असल्याचे सांगितले. मॅकिन्सेचे वरिष्ठ सल्लागार आर. व्ही. श्रीधर यांनी सेन्सर-आधारित वर्गीकरण (सॉर्टिंग) आणि गुणवत्तेवर भर दिला, तर असोसिएशन ऑफ प्लास्टिक रिसायकलर्सचे महासंचालक शैलेंद्र सिंह यांनी पुढील पाच-१० वर्षांत हे क्षेत्र ११ टक्के दराने वाढेल असा अंदाज वर्तवला.

दरम्यान, ‘१लॅटिस’चे संचालक सुयोग केळुस्कर यांनी स्पष्ट केले की, भारत सध्या दरवर्षी २.५ अब्ज डॉलरचे लिथियम व कोबाल्ट आयात करतो. ईव्हीच्या वाढत्या वापरामुळे ‘बॅटरी रिसायकलिंग’ हे भविष्यातील सर्वात मोठे आणि वेगाने वाढणारे क्षेत्र ठरेल.