Mumbai Real Estate Home Buying : मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या शहरात आपल्या हक्काचं घर असावं असं वाटत असतं. मात्र, दिवसेंदिवस गगनाला भिडणाऱ्या घरांच्या किमतीने हे स्वप्न धुसर होत चालले आहे. इतकेच काय स्वस्तात घरे देणाऱ्या म्हाडाची घरेही मध्यमवर्गींयांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. नुकतेच म्हाडा मुंबई मंडळाच्या २६४० घरांपैकी ९५९ विजेत्यांनी मंडळाला घरे परत केली आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर विशाल भार्गव यांनी केलेल्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर नवीन चर्चेला तोंड फुटले आहे. “मुंबईत महिन्याला ८० हजार रुपये कमावणे म्हणजे एकप्रकारे दारिद्र्यरेषेच्या खाली राहण्यासारखेच आहे,” असे विधान भार्गव यांनी केलं आहे.
८०,००० रुपये कमावणे म्हणजे दारिद्र्यरेषेच्या खाली?
एका २४ वर्षीय तरूणाने कंटेंट क्रिएटर विशाल भार्गव यांना घर खरेदीसंदर्भात सल्ला विचारला होता. हा तरुण दरमहा ८०,००० रुपये कमावत असून मुंबईतील अंधेरीसारख्या महागड्या भागात घर घेण्याची त्याची इच्छा होती. नोकरी सुरू करुन त्याला काहीच वर्षे झाली आहेत, अशा परिस्थितीत कमी वयात घर घ्यावे का? असा त्याचा प्रश्न होता. यावर भार्गव यांनी दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भार्गव म्हणाले “८० हजार रुपयांचा पगार देशातील इतर शहरांत आकर्षक पगार मानला जाऊ शकतो. पण, मुंबईत परिस्थिती वेगळी आहे. या शहरात या रकमेची खरेदी क्षमता मर्यादित ठरते.”
भार्गव यांचा तरूणांना मोलाचा सल्ला
भार्गव म्हणाले, की रिअल इस्टेटचे भाव नेहमीच वाढतात हा समज चुकीचा आहे. भविष्यात दर परवडणार नाहीत या विचाराने अनेकजण घर घेण्याची घाई करतात. पण, काही भागात घरांच्या किमती वाढतात, तर काही ठिकाणी त्या कमीही होतात. तरुण वयातच अवाढव्य कर्ज घेण्याची घाई करू नये. वयाच्या २४ व्या वर्षी घराचा हप्ता डोक्यावर घेण्याऐवजी स्वतःच्या कौशल्यांवर, करिअरवर आणि उत्पन्न वाढवण्यावर भर दिला पाहिजे. जर अंधेरीसारख्या भागात घर सध्या परवडत नसेल, तर इतर भागात भाड्याने राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर तुमच्या आवडत्या ठिकाणी घर खरेदीचा विचार करावा.
कमी वयात घर खरेदी केल्यास काय होऊ शकते?
अनेकजण असा विचार करतात की कमी वयात घर घेतल्यास लवकर गृहकर्जातून मुक्त होता येईल. पण, लहान वयातच मोठा होम लोनचा बोजा पाठीवर घेतल्यास माणूस आर्थिक निर्णय घेताना अधिक सावध होतो. यामुळे नवीन व्यवसायाचे किंवा करिअरमधील धोके पत्करण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते, ज्याचा थेट परिणाम भविष्यातील संपत्ती निर्मितीवर होतो.
भाड्याने रहावे की घर खरेदी करावे?
विशाल भार्गव यांच्या या सल्ल्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडलेले पाहायला मिळाले. एका गटाच्या मते, मुंबईत तरुण वयात होम लोन घेणे म्हणजे करिअरच्या सुरुवातीलाच स्वतःला बांधून टाकल्यासारखे होईल. तर दुसऱ्यांचे म्हणणे आहे की, जितक्या लवकर घर खरेदी करू तितकाच भविष्यातील आर्थिक भार कमी होईल.
