Mutual Fund SIP mistakes : रमेश आणि सुरेश दोघेही बालपणीचे मित्र. रमेश अभ्यासात हुशार असल्याने उच्चशिक्षण घेऊन आयटी कंपनीत मोठ्या पगारावर काम करतोय. तर सुरेशने कशीबशी आपली पदवी पूर्ण करुन हॉटेल व्यवसाय सुरू केला. ५ वर्षांपूर्वी दोघे स्नेहमेळाव्याला एकत्र भेटले तेव्हा दोघांनाही म्युच्युअल फंडाविषयी माहिती समजली. त्याप्रमाणे दोघांनीही एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू केली. ५ वर्षानंतर जेव्हा दोघांची भेट झाली, तेव्हा गुंतवणुकीचा विषय निघाला तर सुरेशने रमेशपेक्षा मोठा निधी जमा केला होता. दोघांनीही सारखीच सुरुवात करुनही त्यांच्या गुंतवणुकीत मोठा फरक पाहायला मिळाला. याला कारण ठरलं रमेशच्या चुका. अनेक गुंतवणूकदार एसआयपी सुरू तर करतात, पण काही मूलभूत चुकांमुळे त्यांना अपेक्षित परतावा मिळत नाही. चला आज याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
१. बाजार घसरल्यानंतर घाबरुन एसआयपी बंद करणे
जेव्हा शेअर बाजार कोसळतो, तेव्हा भीतीपोटी अनेकजण एसआयपी थांबवतात. ही सर्वात मोठी चूक आहे. खरं तर, बाजार खाली असताना तुम्हाला तितक्याच पैशात जास्त ‘युनिट्स’ मिळतात. त्यामुळे घसरणीला भीती न मानता ती एक संधी समजा. मध्यपूर्वेत जेव्हा युद्धाची ठिणगी पडली तेव्हा, हीच चूक अनेकांनी केल्याचे पाहायला मिळाले.
२. उत्पन्नासोबत हप्ता न वाढवणे
अनेकजण ५-१० वर्षे एकाच रकमेची एसआयपी सुरू ठेवतात. महागाईवर मात करण्यासाठी तुमचे उत्पन्न वाढले की एसआयपीची रक्कमही दरवर्षी वाढवली पाहिजे. यासाठी ‘स्टेप-अप एसआयपी’ सुविधेचा वापर करा. सुरेश सरस ठरण्याचे कारण हेच आहे, की त्याने उत्पन्नासोबत एसआयपीची रक्कमही वाढवली.
३. केवळ ‘टॉप परफॉर्मिंग’ फंडांच्या मागे धावणे
गेल्या सहा महिन्यांत किंवा वर्षात ज्या फंडाने सर्वाधिक परतावा दिला, त्यातच गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. बाजाराचे चक्र बदलले की हे फंड मागे पडू शकतात. त्याऐवजी फंडाची दीर्घकालीन सुसंगत कामगिरी तपासा.
४. उद्दिष्टाशिवाय गुंतवणूक करणे
रिटायरमेंट, मुलांचे शिक्षण किंवा घर खरेदी यांसारखी स्पष्ट उद्दिष्टे समोर नसल्यास, तुम्ही गरजेपेक्षा कमी गुंतवणूक करता किंवा वेळेआधीच पैसे काढून घेता. प्रत्येक एसआयपीला एका ध्येयाशी जोडा.
५. अति-विविधता
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये १५-२० फंड असणे म्हणजे तुम्ही चांगली विविधता केली आहे असे नाही. यामुळे परतावा कमी होतो. साधारणपणे ५ ते १० दर्जेदार फंड तुमच्या सर्व आर्थिक उद्दिष्टांसाठी पुरेसे असतात.
६. मालमत्ता वाटपाकडे दुर्लक्ष
सर्व पैसे केवळ इक्विटीमध्ये लावण्याऐवजी वय, जोखीम घेण्याची क्षमता आणि गरजेनुसार इक्विटी, डेट आणि सोने यामध्ये विभागणी करा. यामुळे बाजारातील अस्थिरतेचा फटका कमी बसतो.
७. कामगिरीचा आढावा न घेणे
‘गुंतवणूक करा आणि विसरून जा’ हा मंत्र चांगला असला, तरी वर्षातून किमान एकदा आपल्या फंडाच्या कामगिरीचा आढावा घेणे गरजेचे आहे. जर एखादा फंड सातत्याने आपल्या बेंचमार्कपेक्षा कमी परतावा देत असेल, तर तो बदलणे हिताचे ठरते.
८. भावनेच्या भरात निर्णय घेणे
बाजार थोडा लाल रंगात दिसला की पॅनिक सेलिंग करणे टाळा. बाजार दुरुस्ती ही तात्पुरती असते. दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यात मोठा नफा होतो.
९. आपत्कालीन निधी नसणे
अनेकजण घाईने गुंतवणूक सुरू करतात पण आपत्कालीन निधी ठेवत नाहीत. अचानक नोकरी गेली किंवा वैद्यकीय खर्च आला की एसआयपी मोडली जाते. त्यामुळे किमान ३-६ महिन्यांच्या खर्चा इतका निधी बाजूला ठेवल्यानंतरच एसआयपी सुरू करा.
१०. अवास्तव परताव्याची अपेक्षा
शेअर बाजारात दरवर्षी २०-३०% परतावा मिळेल ही अपेक्षा चुकीची आहे. नियोजनासाठी वार्षिक १०-१२% परतावा हा एक वास्तववादी बेंचमार्क मानून चालणे श्रेयस्कर ठरते.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.
