Mutual Fund Investment Plan For 5 Lakhs : मुलांच्या शिक्षणात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी अनेक पालक विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करत असतात. पण, नोकरीतून मिळालेली ग्रॅच्युटी, पीएफची रक्कम, बोनस किंवा व्यवसायात झालेला नफा, अचानक हातात येतो. तेव्हा एवढी मोठी रक्कम कुठे गुंतवावी? हा सर्वात मोठा प्रश्न पालकांसमोर आणि गुंतवणूकदारांसमोर उभा राहतो. ‘द सायकॉलॉजी ऑफ मनी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक मॉर्गन हाऊसेल यांच्या मते, पैशांच्या बाबतीत ‘तुमचे वर्तन आणि योग्य गुंतवणूक पर्याय’ हेच ठरवते की तुम्ही त्या पैशातून किती मोठी संपत्ती निर्माण करू शकता.

५ लाख एकदम गुंतवण्याची चूक करू नका!

५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून मॉर्गन हाऊसेल यांचा हा विचार आपण समजून घेऊयात. जेव्हा आपल्या हातात ५ लाख रुपयांसारखी मोठी रक्कम येते. त्याचवेळी शेअर बाजारात तेजी असते. अशावेळी बहुतेक गुंतवणूकदार या तेजीत सर्व पैसे एकरकमी लावण्याची चूक करतो. कारण, बाजारात मोठी घसरण झाल्यास घाबरून जाऊन पैसे काढून घेण्याची शक्यता जास्त असते.

गुंतवणुकीचा स्मार्ट मार्ग कोणता?

अशावेळी सर्व पैसे एकदाच न गुंतवता एसटीपी (Systematic Transfer Plan) चा मार्ग वापरावा. सर्वप्रथम पूर्ण ५ लाख रुपये एखाद्या लिक्विड किंवा शॉर्ट-टर्म डेट फंडात ठेवावेत. तिथून दरमहा एक ठरविक रक्कम (उदा. १२,००० रुपये ते १५,००० रुपये) इक्विटी फंडात एसआयपीच्या माध्यमातून ट्रान्सफर करा. यामुळे बाजारातील चढ-उतारांचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

पोर्टफोलिओसाठी बेस्ट ‘१०-२०-३०-४०’ फॉर्म्युला

  • जोखीम आणि परतावा यांचा योग्य समतोल साधण्यासाठी ५ लाख वेगवेगळ्या फंडात गुंतवता येतील.
  • ५०,००० रुपये (१० टक्के) अचानक येणाऱ्या वैद्यकीय किंवा तातडीच्या खर्चासाठी इमर्जन्सी फंड किंवा लिक्विड किंवा बँकेत बचत खात्यात ठेवता येतील.
  • १,००,००० रुपये (२० टक्के) डेट फंड किंवा सोन्यात गुंतवणूक केल्याने पोर्टफोलिओला स्थिरता येण्यास मदत होईल.
  • १,५०,००० रुपये (३० टक्के) लार्ज कॅप किंवा फ्लेक्सी कॅप फंडात गुंतवले तर कमी जोखमीत चांगला परतावा मिळू शकतो.
  • २,००,००० रुपये (४० टक्के) दीर्घकाळात वेगाने संपत्ती वाढवण्यासाठी मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडात गुंतवणूक योग्य ठरेल.

५ लाखांतून १०-१५ वर्षांत किती फंड बनेल?

जर तुम्ही हा ५ लाख रुपयांचा पोर्टफोलिओ दीर्घकाळासाठी टीकवून ठेवला आणि त्यावर सरासरी १२% ते १४% वार्षिक चक्रवाढ परतावा मिळाला असे गृहीत धरुन..

  1. ५ वर्षांनंतर (१२% परतावा): सुमारे ८.८१ लाख रुपये
  2. १० वर्षांनंतर (१२% परतावा) : सुमारे १५.५३ लाख रुपये
  3. १५ वर्षांनंतर (१४% परतावा): सुमारे ३५.६९ लाख रुपये

गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी ३ नियम पाळा

  • गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी कुटुंबासाठी पुरेसा ‘हेल्थ इन्शुरन्स’ आणि ‘टर्म प्लॅन’ नक्की घ्या, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुमची मूळ गुंतवणूक सुरक्षित राहील.
  • जर तुम्हाला हे पैसे ३ वर्षांच्या आत लागणार असतील, तर इक्विटीपासून दूर राहून एफडी किंवा डेट फंडातच ठेवावेत. ५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी असल्यास इक्विटी म्युच्युअल फंड निवडावेत.
  • बाजारातील रोजच्या चढ-उतारांना पाहून घाबरून पैसे काढू नका. चक्रवाढ व्याजाची खरी जादू ही वेळ दिल्यानंतरच दिसते.

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि विश्लेषणात्मक उद्देशाने दिली आहे.