5000 monthly SIP to 1 Crore wealth creation : आजच्या महागाईच्या युगात भविष्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करणे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. अनेकांना वाटते की मोठी संपत्ती निर्माण करायची असेल तर दरमहा हजारो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. प्रत्यक्षात मोठा निधा जमा करण्यासाठी मोठ्या रकमेपेक्षा सातत्य आणि आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. म्युच्युअल फंडमधील ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ म्हणजेच SIP च्या माध्यमातून दरमहा अवघ्या ५,००० रुपयांची गुंतवणूक करूनही कोट्यवधी रुपयांचा निधी उभा केला जाऊ शकतो. दरमहा ५००० रुपयांची एसआयपी केली तर किती वर्षात १ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यास किती वर्षे लागतील?

१०% परतावा: २८ वर्षे ११ महिन्यांचा प्रवास

जर तुम्ही दरमहा ५,००० रुपयांची गुंतवणूक सुरू केली. त्यावर सरासरी १० टक्के वार्षिक परतावा मिळाला, तर १ कोटींचा निधी तयार होण्यासाठी जवळपास २८ वर्षे ११ महिने लागतील. या दीर्घ कालावधीत तुमची स्वतःची एकूण गुंतवणूक सुमारे १७.३५ लाख रुपये असेल, तर चक्रवाढ व्याजाच्या प्रभावामुळे सुमारे ८२.६५ लाख रुपये केवळ परताव्याच्या रूपाने तुमच्या खात्यात जमा झालेले असतील.

१२ टक्के परतावा: २५ वर्षे ६ महिन्यांत लक्ष्यपूर्ती

जर तुमच्या फंडने १२ टक्के इतका मजबूत परतावा दिला, तर तुमचे १ कोटी रुपयांचे ध्येय २५ वर्षे ६ महिन्यांमध्ये पूर्ण होऊ शकते. या काळात तुमची मूळ गुंतवणूक १५.३० लाख रुपये राहील आणि जवळपास ८४.७० लाख रुपयांचा घसघशीत परतावा तुम्हाला मिळेल.

१५% परतावा: अवघ्या २१ वर्षांत कोट्यधीश

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास १५ टक्केपर्यंतचा परतावा मिळणे शक्य मानले जाते. जर परतावा १५ टक्के राहिला, तर १ कोटी रुपये जमा होण्यासाठी केवळ २१ वर्षे ११ महिने लागतील. विशेष म्हणजे, यामध्ये तुमची स्वतःची गुंतवणूक सर्वात कमी म्हणजेच १३.१५ लाख असेल, तर ८६.८५ लाख रुपयांचा मोठा नफा केवळ व्याजातून तयार होईल.

५,००० रुपयांच्या मासिक SIP मधून १ कोटीचा हिशोब

वार्षिक परतावा (Return)१ कोटी (कालावधी)एकूण गुंतवणूक अंदाजे परतावा
१० टक्के२८ वर्षे ११ महिने१७.३५ लाख८२.६५ लाख
१२ टक्के२५ वर्षे ६ महिने१५.३० लाख८४.७० लाख
१५ टक्के२१ वर्षे ११ महिने१३.१५ लाख८६.८५ लाख

५ टक्के परताव्याचा मोठा फरक!

१० टक्के आणि १५ टक्के परताव्यामध्ये केवळ ५ टक्के अंकाचा फरक दिसत असला, तरी १ कोटींचा निधी जमा करण्यासाठी ७ वर्षांचा मोठा कालावधी लागतो. हीच चक्रवाढ व्याजाची खरी ताकद आहे.

SIP करताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  1. प्रत्येक गुंतवणूक करताना निश्चित आर्थिक ध्येय असावे, त्यानुसार फंड निवडणे सोपे जाते.
  2. जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसारच एसआयपीच्या रकमेची निवड करा. बजेटपेक्षा जास्त भार टाळणे हिताचे ठरते.
  3. शेअर बाजारात मंदी किंवा घसरण आली तरी SIP बंद करण्याची घाई करू नका. दीर्घ मुदतीत कंपाउंडिंगचा फायदा घेण्यासाठी सातत्य सर्वात महत्त्वाचे आहे.