Abacus Mutual Fund Stock Market Outlook : जागतिक आव्हाने आणि बाजारातील चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. अॅबाकस म्युचुअल फंडाचे तज्ज्ञ आणि अनुभवी फंड मॅनेजर संजय दोषी यांच्या मते, स्मॉलकॅप क्षेत्रातील मोठ्या घसरणीनंतर आता अनेक कंपन्या आकर्षक मूल्यांकनावर उपलब्ध झाल्या असून, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी संधी सिद्ध होऊ शकते.

आमच्या वाचकांना तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीची थोडक्यात ओळख करुन द्या

मी मुंबई विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी घेतली. माझे पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबईतील प्रतिष्ठित आर ए पोद्दार महाविद्यालयातून झाले. मी २००१ मध्ये पदवी मिळविली आणि २००२ मध्ये सनदी लेखापलाची अंतिम परीक्षा उतीर्ण झालो. मी २००३ ते २००५ दरम्यान एनएमएआयएमएस एमबीएची पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. त्यानंतर माझी पहिली नोकरी जेपी मॉर्गनमध्ये ‘कन्व्हर्टिबल बाँड्स सपोर्टिंग’ चमूसोबत मी काम केले दरम्यान मला लंडन आणि हाँगकाँगमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम शिकण्याची संधीही मिळाली. त्यानंतर मी ‘मॅकक्वेरी सिक्युरिटीज’मध्ये ‘सेल-साइड अॅनॅलिस्ट’ किंवा ‘ब्रोकरेज’ विभागात जवळपास तीन वर्षे काम केले. २००८ मधील जागतिक आर्थिक मंदीच्या काळात, जे लोक त्या परिस्थितीत टिकून राहिले त्यांच्यासाठी अनेक संधी उपलब्ध होत्या; त्यामुळे त्या काळात मला विविध क्षेत्रांचा अभ्यास करण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली. याच दरम्यान, मी माझा ‘सीएफए’ अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ‘सीएफए चार्टर’ मिळवले. २०११ मध्ये तत्कालीन ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’मध्ये रुजू झालो. २०११ पासून ते सप्टेंबर २०२४ पर्यंत मी ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ किंवा सध्याच्या ‘निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड’ (निप्पॉन इंडिया लाइफ असेट मॅनेजमेंट कंपनी)मध्ये कार्यरत होतो. तिथे मी सिमेंट, युटिलिटीज (वीज-पाणी-इंधन सेवा), ऑटोमोबाईल, विमान वाहतूक, अभियांत्रिकी आणि जहाजवाहतूक यांसारख्या विविध क्षेत्रांचा अभ्यास व व्यवस्थापन केले. तसेच, स्वतंत्र फंड मॅनेजर आणि सह-फंड मॅनेजर म्हणून मी विविध फंडांचे व्यवस्थापन केले आहे. या मध्ये मुख्यत्वे ‘पॉवर अँड इन्फ्रा फंड’, ‘रिलायन्स रिटायरमेंट फंड’ आणि ‘लार्ज अँड मिड-कॅप फंड व्हिजन’ यांचा समावेश होता. ‘व्हिजन फंडा’साठी सह-फंड मॅनेजर आणि ‘रिलायंस ग्रोथ फंडाचा’ सहाय्यक फंड मॅनेजर म्हणूनही मी काम केले; तसेच, तत्कालीन मुख्य गुंतवणूक अधिकारी (सीआयओ) मनीष गुणवानी यांच्या मार्गदर्शनाखाली मी जवळपास अडीच वर्षे काम केले.

निप्पॉनमध्ये मी विविध प्रकारच्या गुंतवणूक रणनितींवर काम केले. त्यानंतर, एप्रिल २०२५ मध्ये मी ‘अॅबाकस म्युच्युअल फंड’मध्ये रुजू झालो. ऑगस्ट २०२५ मध्ये आम्हाला म्युच्युअल फंडाचा परवाना मिळाला आणि तिथूनच आमचा ‘अॅबाकस’च्या म्युच्युअल फंड प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. डिसेंबर २०२५ मध्ये आम्ही आमचा पहिला फंड ‘फ्लेक्सी कॅप फंड’ – बाजारात आणला; दीर्घकालीन समभाग गुंतवणुकीसाठी एक योग्य उत्पादन उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर, फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा पश्चिम आशियातील संकट सुरू होण्यापूर्वीच, आम्ही ‘स्मॉल कॅप फंड’ लाँच केला. अशा प्रकारे, ‘अॅबाकस म्युच्युअल फंड’मध्ये आतापर्यंत दोन सक्रिय इक्विटी फंड आणि एक लिक्विड फंड उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंडाच्या क्षेत्रात गुंतवणूकदारांसाठी योग्य उत्पादने आणण्याच्या अनेक संधी आम्हाला दिसत असल्याने, आमचा हा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे.

एक फंड मॅनेजर म्हणून तुम्ही सध्याच्या बाजाराकडे कसे पाहता?

बाजाराबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या दोन-तीन तिमाहींपासून भारतीय बाजारांबाबत आमचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ लागला आहे. याची काही प्रमुख कारणे म्हणजे, गेल्या १८ ते २४ महिन्यांत निवडक ‘स्मॉल-कॅप’ कंपन्यांना स्थैर्य लाभले आहे. गेल्या वर्षी स्मॉलकॅप कंपन्यांच्या भावात मोठी घसरण झाली होती. याची अनेक कारणे होती; जसे की भारताचा विकासदराच्या अनुषंगाने भारताचे मूल्यांकन समर्थनीय नव्हते. विकसनशील देशांच्या बाजारांच्या तुलनेने मुल्यांकन महाग होते त्यामुळे उच्च मुल्यांकनाला वृद्धीदर पुरेसा नव्हता. भारतासारख्या वैविध्यपूर्ण बाजाराच्या तुलनेत ‘टेक ट्रेड’ला (तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीला) अधिक प्राधान्य मिळाले. तसेच, चलन, युद्ध आणि पुरवठा साखळी यांसारखी अनेक जागतिक आणि स्थानिक आव्हाने होती, ज्यांचा भारताच्या विकासदरावर काही प्रमाणात परिणाम झाला. याव्यतिरिक्त, २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालानंतर मूल्यांकनात वाढ झाली होती. त्यामुळे बाजारात काही प्रमाणात घसरण होणे अपेक्षित होते. ती घसरण आता थांबली असून निवडक ‘स्मॉलकॅप’ना स्थैर्य लाभले आहे.

सरकारने मौद्रिक आणि वित्तीय अशा दोन्ही स्तरांवर अनेक उपाययोजना केल्या, ज्यामुळे जीडीपी साडेपाच टक्क्यांवरून ७ ते ८ टक्के वाढ दर्शवेल इथपर्यंत सावरला आहे. त्यासोबतच, महागाईचा दरही ३ ते ४ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे दिसून आले आहे, जे भारतासारख्या बाजारपेठेसाठी अगदी सामान्य आहे, त्यामुळे आपल्याला १०-११ टक्क्यांच्या दरम्यान जीडीपी वाढ दिसू शकते. यामुळे कंपन्यांना १२ ते १५ टक्के कमाईची वाढ देण्याची संधी मिळते, आणि म्हणूनच भारताच्या सापेक्ष कामगिरीतील या घसरणीनंतर, आपल्याला अनेक संधी नव्याने निर्माण होताना दिसत आहेत. विशेषतः जर आपण स्मॉलकॅप कंपन्यांकडे पाहिले, तर त्यांची किंमत खूपच मोठ्या प्रमाणात घसरली होती. स्मॉलकॅप निर्देशांकातील पहिल्या २५० कंपन्या बाजूला ठेवल्यास, जर तुम्ही स्मॉलकॅप क्षेत्रात आणखी खोलवर गेलात, तर कदाचित २,००० कोटींच्या बाजार भांडवलापर्यंत, तुम्हाला आणखी ५००-६०० कंपन्या आजही गुंतवणूक योग्य मुल्यांकनावर दिसतील.

यातील अनेक कंपन्यांच्या (जवळपास ५०% कंपन्यांच्या) समभागांच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. शिवाय, त्यातील मोठा हिस्सा ०.६ ते ०.७ इतक्या ‘पेग’ (PEG – Price-Earnings-to-Growth) गुणोत्तरावर उपलब्ध होता; म्हणजेच, या कंपन्यांची जी वाढ साध्य करण्याची क्षमता होती, त्या तुलनेत त्यांचे मूल्यांकन खूपच कमी होते. आणि याच गोष्टीमुळे आम्हाला त्यामध्ये गुंतवणूक करणे योग्य वाटले. आता जर आपण सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च या तिमाहीतील कमाईची आकडेवारी पाहिली, तर भारतीय कंपन्यांची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. ‘निफ्टी’ (Nifty) कंपन्यांची कमाईची वाढ जरी एक अंकी (५.५० ते ८%)असली, तरी ‘बीएसई ५००’ किंवा ‘एनएसई ५००’ मधील कंपन्यांची वाढ १३ ते १६% इतकी चांगली राहिली आहे. याचा अर्थ असा की, आव्हानात्मक परिस्थितीतही ‘मिड-कॅप’ आणि ‘स्मॉल-कॅप’ कंपन्यांनी १५ ते २०% वाढ दर्शविली आहे.

भारताची ‘वास्तविक वाढ (रिअल जीडीपी’) वाढीचा दर ७% राहील, असा आमचा विश्वास आहे. अर्थातच, आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत कच्च्या तेलाचे वाढलेले दर, चलनातील चढ-उतार आणि निर्यात बाजारपेठांमधील मागणीतील काहीशी घट यांचा मोठा परिणाम दिसून येईल. तरीही, उपलब्ध असलेल्या सर्व अंदाजांनुसार, भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.५% ते ७% च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ १०-११% ‘नॉमिनल ग्रोथ’ (नाममात्र वाढ) दिसून येत आहे. जर आपण सूक्ष्म आर्थिक निकषांकडे (मायक्रो पॅरामीटर्स) पाहिले, तर सर्व संकेत अत्यंत सकारात्मक आहेत. वस्तू आणि सेवा कर संकलन, वाहन विक्रीतील वाढ, वीज वापर आणि जवळपास ९-१० तिमाहींच्या खंडानंतर कर्ज वितरणातील वाढीचा दर (क्रेडिट ग्रोथ) पुन्हा दुहेरी अंकात पोहोचणे – या सर्व गोष्टी भारतीय बाजारपेठेची सकारात्मक आणि मजबूत स्थिती दर्शवतात. सरकारने घेतलेले अनेक उपाय प्रभावी ठरत आहेत. देशांतर्गत अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत आहे; आम्हाला विश्वास आहे की आपण १०-१२% ‘अर्निंग्ज ग्रोथ’ (कंपन्यांच्या कमाईतील वाढ) साधण्याच्या मार्गावर आहोत, आणि ‘मिड-कॅप’ व ‘स्मॉल-कॅप’ कंपन्यांच्या बाबतीत १५ ते २०% वाढ शक्य आहे. गुंतवणूकदारांनी वाढीच्या या अपेक्षांचा विचार करणे गरजेचे आहे; जर बाजारपेठेचे मूल्यांकन योग्य असेल, तर तुम्हाला या वाढीच्या प्रमाणातच परतावा मिळेल. हाच आमचा दृष्टिकोन आहे. आता क्रूड घसरले आहे, विशेषत: रिझर्व्ह बँकेने रुपयाच्या स्थैर्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.तुम्ही मोठ्या आर्थिक संचाकडे पाहिले, म्हणजे भांडवली बाजारातील फिनटेक, विमा, आणि इतर, वित्तीय सेवा जसे की भांडवली बाजार पत निश्चिती कंपन्या आणि इतर सेवा , तेथे त्यांची संधी खूप मोठी आहे. भारत एक अर्थव्यवस्था म्हणून अधिक परिपक्व होत असताना, बचतीचे वित्तीयकरण ही खूप मोठी संधी आहे.त्यामुळेच आम्ही भारतीय बाजारा बाबतीत सकारात्मक आहोत.

या पार्श्वभूमीवर मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्यावरून भाषण करतांना पंतप्रधानांनी पहिल्यांदा जीएसटी सुधारणे बाबत सुतोवाच केले. त्या नंतर १ ऑक्टोबर २०५ पासून नवीन जीएसटी दर लागू झाले. त्या आधी अर्थ संकल्पात फेब्रुवारी २०२५ मध्ये १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केले. त्यानंतर सर्वच फंड मॅनेजर वाढत्या क्रयशक्ती (consumption) बाबत चर्चा करत होते; परंतु प्रत्यक्षात ‘कन्झम्पशन फंड्स’ची कामगिरी चांगली राहिलेली नाही किंवा एकूणच या गोष्टींमुळे वाहन विक्री वगळता खपाच्या बाबतीतही अपेक्षित असलेली वाढ दिसलेली नाही. यावर तुमचे काय मत आहे?

तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी सरकारने अनेक वित्तीय आणि मौद्रिक उपाययोजना केल्या होत्या; त्यापैकी ‘जीएसटी’ (GST) हा एक महत्त्वाचा घटक होता, जो सरकारच्या वित्तीय उपाययोजनांच्या कक्षेत येतो. सरकारने प्रामुख्याने दोन-तीन गोष्टी केल्या. पहिली म्हणजे त्यांनी प्राप्तिकराचे दर कमी केले, ज्यामुळे साधारणपणे १ ते १.५ लाख कोटी रुपये करदात्यांच्या हातात शिल्लक राहिले. त्यानंतर, जीएसटीच्या रचनेत केलेल्या सुधारणांमुळे अप्रत्यक्षपणे आणखी १ ते १.५ लाख कोटी रुपयांची बचत झाली. याचा स्पष्ट परिणाम अनेक क्षेत्रांमधील वाढलेल्या उपभोगामध्ये (consumption) दिसून येतो. उदाहरणार्थ, वाहनांच्या विक्रीकडे पाहिल्यास असे दिसते की, गेल्या साधारण दोन वर्षांत त्यांची कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे आणि आता त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.एफएमसीजी क्षेत्राचा विचार केला, तर काही मोठ्या कंपन्यांमध्ये वाढीचा वेग सुरुवातीला खूपच संथ (सुमारे २-४%) होता. मात्र, गेल्या दीड-दोन तिमाहीत (आणि चालू तिमाहीचे आकडेही लवकरच समोर येतील), या मोठ्या कंपन्यांच्या वाढीचा वेग वाढून तो ७ ते १० टक्क्यांच्या दरम्यान पोहोचला आहे. लहान कंपन्यांची कामगिरी अजूनही चांगली आहेच, पण मोठ्या कंपन्यांच्या स्थितीतही सुधारणा दिसून आली आहे. थोडक्यात सांगायचे तर, जीएसटी मधील सुसूत्रीकरण, प्राप्तिकरातील कपात आणि व्याजदर कपातीमुळे कमी झालेले कर्जाच्या हप्यांमुळे ग्राहकांच्या हातात अधिक पैसा उरला आहे किंवा त्यांची क्रयशक्ती वाढली आहे; आणि याचा सकारात्मक परिणाम काही प्रमाणात वाढलेल्या उपभोगामध्ये दिसून येऊ लागला आहे. तर हो, काही प्रमाणात सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतो. अर्थात, जर काही काळा नंतर हे परिणाम आणखी चागले असू शकतील. सरकारने जीएसटी सुसूत्रीकरणासाठी जे प्रयत्न केले आहेत – जसे की करकक्षांचे सुलभीकरण करणे आणि अनेक क्षेत्रांमध्ये कर कपात मिळणे – त्याचे काहीसे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. मला वाटते की हे असेच पुढेही चालू राहील, कारण याचा अर्थ मूलतः अर्थव्यवस्थेचे अधिक प्रमाणीकरण होणे असा आहे; आणि पर्यायाने, या सर्व गोष्टींमुळे होणारी वाढ आर्थिक पातळीवर अधिक स्पष्टपणे आणि अचूकपणे नोंदवली जाईल. याचा सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतो. कदाचित हा परिणाम अत्यंत असाधारण नसेल, कारण मध्ये अनेक गोष्टींचा प्रभाव पडला—जसे की डॉलरच्या विनिमय दरातील चढ-उतार आणि पश्चिम आशियातील संकट; या सर्व गोष्टींचा ग्राहकांच्या मानसिकतेवर आणि खर्चाच्या वृत्तीवर परिणाम होतो.जसे की भारतातील कार्यरत लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा आयटी क्षेत्रात आहे. जर माझ्या करिअरमधील प्रगती, पगार किंवा बोनसबाबत अनिश्चितता असेल, तर त्याचा परिणाम माझ्या खर्चावर होणारच. पण जेव्हा आपण ‘प्रीमियम’ श्रेणीतील उपभोगाचा विचार करतो—उदा. आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी), विमानसेवा किंवा हॉटेल उद्योग—तेथे मात्र मागणी खूपच जोमदार आहे. म्हणजेच, ज्या लोकांची आर्थिक स्थिती अशी आहे की ते फारसा विचार न करता खर्च करू शकतात, त्यांच्याकडून होणारे व्यवहार अतिशय वेगाने होत आहेत. त्यामुळे आम्हाला असे वाटते की, जसजशी भारताची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियनवरून ८ किंवा ९ ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे, मूलभूत गरजांनंतरचा जो ‘विवेकाधीन खर्च’ असतो, त्यात अधिक मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही ‘प्रीमियम’ किंवा ‘विवेकाधीन’ उपभोग क्षेत्राबाबत सकारात्मक आहोत; यात एअर कंडिशनर्स (ACs), मोठे टीव्ही, आदरातिथ्य, (हॉटेल्स आणि विमान सेवा) यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो—या सर्व क्षेत्रांत अधिक तेजी दिसून येईल. मात्र, नजीकच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत जो परिणाम दिसून येईल, त्याचे कारण म्हणजे या वर्षीचा पाउस अनियमित किंवा कमी राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ग्रामीण क्रयशक्तीवर काहीसा ताण येऊ शकतो. याच कारणामुळे आम्हाला वाटते की एफएमसीजी क्षेत्रात कदाचित तितकी मोठी वाढ होणार नाही. तसेच, तेल शुद्धिकरणातून मिळणाऱ्या अन्य उत्पादनांमुळे नजीकच्या काळात काहीसा दबाव असू शकतो; कारण एफएमसीजी कंपन्यांसाठी वाहतूक आणि पॅकेजिंग या दोन्ही गोष्टींमध्ये हा एक मोठा खर्च असतो आणि यातील काही उत्पादने तयार करण्यासाठी कच्च्या तेलापासून मिळणाऱ्या घटकांचा वापर केला जातो. म्हणूनच, मूलभूत जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत आम्ही थोडे सावध आहोत; कारण तिथे वाढीचा दर ‘एका आकड्यात’ (१० टक्क्यांपेक्षा कमी) आहे आणि तरीही त्यांचे मुल्यांकन ४० ते ५० पटींच्या आसपास आहे. त्यामुळे, त्यामध्ये आमचा गुंतवणुकीसाठी फारसा अनुकूल दृष्टिकोन दिसत नाही.आम्ही उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक आहोत. आम्ही भारतीय कंपन्यांसाठी खूप मोठी संधी पाहत आहोत,

आम्ही विलासी उपभोगाबाबत सकारात्मक आहोत. आमचा विश्वास आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद भविष्यात सुधारेल, दरडोई उत्पन्न वाढेल आणि याचमुळे विलासी उपभोगाला पुढील वाढीस चालना मिळेल. आणि शेवटी, आरोग्यसेवा तसेच प्रामुख्याने सीडीएमओ (CDMO) क्षेत्राबाबत, उपलब्ध संधी पाहता आम्ही खूप सकारात्मक आहोत. तर ही सर्व प्रमुख क्षेत्रे आहेत, ज्यात स्पेशालिटी केमिकल्सचाही समावेश आहे, जिथे व्हॅल्यू चेन सुधारत आहे, आणि ही सकारात्मक क्षेत्रे आहेत. एक संस्था म्हणून, आम्ही आयटी सेवांबाबत सावध आहोत. आमचा विश्वास आहे की जेनएआय (GenAI) मधील तांत्रिक बदलांचा वेग पाहता, व्यवसाय मॉडेलमध्ये पुनर्रचना करणे आवश्यक आहे. आम्ही काही सूचीबद्ध आयटी सेवा कंपन्यांमध्ये अनेक पटींनी घसरण पाहिली आहे, परंतु आमचा विश्वास आहे की आम्हाला सकारात्मक होण्यासाठी मूलभूत घटक स्थिर होणे आणि नंतर त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे.

इतक्या वर्षाच्या तुमच्या कारकिर्दीत तुम्ही बाजाराकडून काय शिकलात?

मी केवळ दोन मुख्य आणि महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकेन ज्या मला शिकायला मिळाल्या. सर्वप्रथम, गुंतवणूकदारांनी हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, बाजारातील चढ-उतारांचा अचूक अंदाज घेऊन व्यवहार (मार्केट टाइमिंग) करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, शिस्त पाळणे आणि शक्य तितका जास्त काळ बाजारात टिकून राहणे अधिक गरजेचे आहे. कारण, ‘चक्रवाढ वाढीचा’ (compounding) लाभ केवळ अशाच वैयक्तिक गुंतवणूकदारांना मिळतो जे दीर्घकाळासाठी बाजारात गुंतवणूक कायम ठेवू शकतात. त्यामुळे, जर तुम्ही १२%, १३% किंवा १४% परतावा मिळवू शकत असाल आणि सलग १५ ते २० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ तसे करत राहिलात, तर चक्रवाढ वाढीमुळे निर्माण होणारी संपत्ती प्रचंड असते. हा झाला पहिला मुद्दा.

दुसरी महत्त्वाची शिकवण म्हणजे, इक्विटी बाजारांकडे—विशेषतः भारतासारख्या बाजारपेठेकडे—पाहताना आशावादी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. जागतिक आर्थिक संकट किंवा कोविडसारख्या आव्हानांच्या काळात जर लोकांनी किंवा गुंतवणूकदारांनी थोडा आशावाद बाळगला असता, तर बाजारातील तीव्र घसरणीच्या वेळी अधिक गुंतवणूक करण्याचा योग्य निर्णय त्यांनी घेतला असता; आणि यामुळे बाजार सावरल्यावर त्यांना अतिरिक्त परतावा मिळाला असता. तर, मला या दोन महत्त्वाच्या गोष्टी वाटतात: एक, अतिशय शिस्तबद्ध आणि बाजारात दीर्घकालीन रहा, त्यामुळे तुम्ही बाजारात घालवलेला वेळ तुम्हाला दीर्घकालीन चक्रवाढीचा लाभ देतो; आणि दुसरे, समभाग गुंतवणुकीकडे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मालमत्ता वर्ग म्हणून पहा त्यामुळे, यातील बहुतांश गुंतवणूकदारांनी आपल्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी किमान एक स्पष्ट ‘एसआयपी’ (SIP) केली पाहिजे. तसेच, जसजसे त्यांचे उत्पन्न आणि बचतीची क्षमता वाढेल, तसतशी त्यांनी या गुंतवणुकीत वाढ (टॉप-अप) करण्याचा किंवा ती अधिक वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे, निवृत्ती, मुलांचे शिक्षण किंवा दुसरे घर (व्हॅकेशन होम) यांसारख्या आयुष्यातील महत्त्वाच्या उद्दिष्टांचे नियोजन जर तुम्ही अगदी सुरुवातीच्या काळातच केले—आणि बाजारात गुंतवणूक करताना अत्यंत पद्धतशीर दृष्टिकोन ठेवून उत्पन्नातील वाढीनुसार गुंतवणुकीची व्याप्ती वाढवली—तर मला वाटते की, याद्वारेच म्युच्युअल फंड गुंतवणूकदार खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करू शकतात.

दुसरे म्हणजे, संयम बाळगा आणि स्वतःहून सर्व गोष्टी करण्याऐवजी तज्ञांची मदत घ्या; विशेषतः ‘स्मॉल-कॅप’ (small-cap) गुंतवणुकीच्या बाबतीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यात जोखीम, अस्थिरता आणि अपयशाची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे, स्वतःची नियमित कामे सांभाळून बाजारात थेट गुंतवणूक करण्याचे अतिरिक्त ओझे घेण्यापेक्षा, सक्षम टीम आणि सहाय्यक यंत्रणेसह हे काम नियमितपणे करणाऱ्या तज्ञांवर विसंबून राहणे अधिक शहाणपणाचे ठरेल.

थोडक्यात सांगायचे तर, मला या दोन मुख्य गोष्टींवर भर द्यायचा आहे: पहिली म्हणजे, दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी आणि ती पद्धतशीर गुंतवणुकीद्वारे कशी साध्य करायची, यासाठी एक स्पष्ट धोरण निश्चित करा; आणि दुसरी म्हणजे, तुमच्या आर्थिक नियोजनातील महत्त्वाच्या बाबींसाठी तज्ञांची मदत घ्या.
संकलन : वसंत कुलकर्णी
संकल्पना : गौरव मुठे