Best Mutual Fund Investment : गेल्या २ वर्षांपासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स ५० टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. अशा अस्थिर बाजारात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरते. पण, फंडाच्या कोणत्या वर्गात गुंतवणूक केल्यास सर्वाधिक परतावा मिळेल? असा प्रश्न तुमच्याही मनात येणे साहजिक आहे. याचं उत्तर इक्रा ॲनालिटिक्स’च्या (ICRA Analytics) सप्टेंबर २०२६ च्या अहवालातून समोर आले आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार केल्यास ‘मिड-कॅप’ म्युच्युअल फंडांनी गेल्या ५ आणि १० वर्षांत लार्ज-कॅप आणि फ्लेक्सी-कॅपच्या तुलनेत सर्वाधिक सरासरी परतावा दिला आहे.
१० वर्षांत ‘मिड-कॅप’ची बाजी
| फंड प्रकार | १ वर्ष | ३ वर्षे | ५ वर्षे | १० वर्षे |
| लार्ज-कॅप | -३.७८% | ८.०५% | ७.२०% | १०.७२% |
| मिड-कॅप | ५.२४% | १४.२२% | १३.४१% | १४.८०% |
| फ्लेक्सी-कॅप | ०.९१% | १०.३३% | ९.३८% | १२.४८% |
स्रोत: ICRA Analytics (सप्टेंबर २०२६).
आकडेवारीवरून स्पष्ट होते की, दीर्घ कालावधीत मिड-कॅपने लार्ज-कॅप फंडांच्या तुलनेत चांगला परतावा दिला आहे, तर फ्लेक्सी-कॅप फंडांनी मध्यम मार्ग स्वीकारत लार्ज-कॅपपेक्षा चांगला, पण मिड-कॅपपेक्षा कमी परतावा दिला आहे.
सप्टेंबरमधील घसरणीचा इशारा
दीर्घकाळात तिन्ही फंडांनी चांगली कामगिरी केली असली तरी अल्पकाळात मोठी जोखीम पाहायला मिळते. सप्टेंबर २०२६ मध्ये शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा फटका सर्वच श्रेणींना बसला. गेल्या एका महिन्यात लार्ज-कॅप फंड -५.८७ टक्के, मिड-कॅप फंड -६.०४ टक्के आणि फ्लेक्सी-कॅप फंडाने -५.०३ टक्के परतावा दिला आहे.
शेअर बाजारातील घसरणीची प्रमुख कारणे
भारतीय शेअर बाजार अस्थिर होण्याला देशांतर्गतपेक्षा परदेशी घटक अधिक कारणीभूत आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री, जागतिक रोखे परताव्यातील वाढ, कच्च्या तेलाचे वाढते दर आणि रुपयाची घसरण यामुळे निफ्टी-५० मध्ये मोठी घसरण झाली. एकाच महिन्यात मिड-कॅप फंड लार्ज-कॅपच्या तुलनेत अधिक घसरले आहे. याचा अर्थ बाजारात मंदी आल्यास मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये अधिक पडझड होते.
बाजार घसरूनही गुंतवणुकीचा ओघ सुरूच
- ‘ॲम्फी’च्या सप्टेंबर २०२६ च्या आकडेवारीनुसार, बाजार घसरत असला तरी गुंतवणुकीचा ओघ सुरूच आहे. सप्टेंबरमध्ये मिड-कॅप फंडात सर्वाधिक ७,८३५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जी ऑगस्टमध्ये ६,९८९ कोटी रुपये होती.
- फ्लेक्सी-कॅप फंडात सप्टेंबरमध्ये ६,७०२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, ऑगस्टमध्ये ५,०५९ कोटी रुपये होती.
- सध्या गुंतवणूकदारांनी लार्ज कॅपकडे पाठ फिरवली असून सप्टेंबरमध्ये अवघ्या ८५९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. पण, ही वाढ सकारात्मक आहे.
तीन श्रेणींमधील मुख्य फरक
- लार्ज-कॅप फंड देशातील सर्वात मोठ्या व स्थिर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. मंद बाजारात हे फंड तुलनेने अधिक सुरक्षित मानले जातात. परंतु, अल्प मुदतीत यातही तोटा होऊ शकतो.
- मिड-कॅप फंड मध्यम आकाराच्या, वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. बाजारात तेजी असताना यात मोठा नफा मिळतो, मात्र मंदीच्या काळात जास्त नुकसान होण्याची जोखीम असते.
- फ्लेक्सी-कॅप फंड, फंड मॅनेजरला परिस्थितीनुसार लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये भांडवल हलवण्याची मुभा असते. यामुळे जोखीम आणि परतावा यांचा योग्य समतोल साधता येतो.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला
- उच्च परतावा देणारी फंड श्रेणी प्रत्येक बाजारचक्रात चांगली कामगिरी करेलच असे नाही.
- जर तुम्हाला पुढील ३ ते ५ वर्षांत पैशांची गरज असेल, तर केवळ भूतकाळातील परतावा पाहून गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते.
- तीन वेगवेगळ्या श्रेणींचे फंड घेतले म्हणजे पोर्टफोलिओ सुरक्षित झाला असे होत नाही. फंडांमधील कंपन्या आणि क्षेत्रांची पुनरावृत्ती होत नाही ना? हे तपासा.
