Chinu Gupta Fund Manager Market Insights : भारतीय वित्तीय बाजारात दोन दशकांचा दीर्घ अनुभव असलेल्या आणि एचएसबीसी म्युच्युअल फंडात फंड मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या चिनू गुप्ता यांनी बाजारातील सद्यस्थिती आणि गुंतवणुकीच्या पद्धतींवर प्रकाश टाकला आहे. गुंतवणूक करताना वेळ साधण्याच्या नादात बहुसंख्य गुंतवणूकदार ५० टक्के नुकसान करुन घेतात, असं फंड मॅनेजर चिनू गुप्ता यांनी म्हटलं आहे.
आमच्या वाचकांना तुमची थोडक्यात ओळख करुन द्या.
मी काम्पुटर सायन्स या विषयात मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर प्रतिष्ठित एसपीजैन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँण्ड रिसर्चमधून पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. मला कँपस रिक्रूटमेंट मधुन एका प्रतीयश बँकेत नोकरीचा प्रस्ताव मिळाला होता. त्या नंतर युटीआय म्युच्युअल फंडाची एक स्पर्धा होती आणि विजेत्याला १ लाख रुपयांचे पारितोषक होते. त्या स्पर्धेत भाग घेऊन आमचा संघ विजेता ठरला. परितोषकाच्या रक्कमेसोबर त्यांनी मला नोकरीचा प्रस्ताव दिला. कॅम्पसमध्ये मिळालेला हा दुसरा प्रस्ताव होता. आमच्या प्राध्यापकांशी चर्चा केल्यानंतर मी अशा निर्णयाप्रत आले की ही नोकरीची संधी गमावणे योग्य नव्हे. आणि मी हा प्रस्ताव स्वीकारला. अशा रितेने माझा गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश केला.
मला असे वाटते की, ज्या क्षेत्रात मी आहे, ते क्षेत्र पूर्णपणे माझ्या आवडीचे होते. तिथूनच माझ्या समभाग विश्लेषक म्हणून कारकीर्दीची सुरुवात झाली. यूटीआय नंतर मी ‘आयएनजी इन्व्हेस्टमेंटस’मध्ये दाखल झाले. परंतु २००८ च्या आर्थिक संकटानंतर त्यांनी आपल्या व्यवसायात धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचा एक भाग म्हणून त्यांनी भारतातून आपला व्यवसाय बंद करण्याचे ठरवले. म्हणून, मी टाटा एआयए लाइफ इन्शुरन्समध्ये दाखल झाले. मी टाटा इन्शुरन्ससाठी ८-९ वर्षे, काम केले. त्या कालावधीत मला बढती मिळून मी विश्लेषकापासून फंड मॅनेजर झाले होते. हे काम करीत असतांना माझी कार्यशैली विम्यापेक्षा म्युच्युअल फंड उद्योगासाठी अधिक अनुकूल आहे असे वाटले, तिथूनच मग, याच विचाराने मी कॅनरा रोबेकोमध्ये दाखल झाले. कॅनरा रोबेकोमधून माझा म्युच्युअल फंड उद्योगातील फंड मॅनेजमेंटचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर, मी एल अँड टी म्युच्युअल फंडात आले, तर सध्या मी एल अँड टीचा व्यवसाय एचएसबीसीने अधिग्रहित केल्यानंतर मी एचएसबीसी म्युच्युअल फंडाचा भाग झाले.
एक निधी व्यवस्थापक म्हणून सध्याच्या बाजाराकडे तुम्ही कसे पाहता?
सध्या बाजाराच्या स्थितीकडे पाहिल्यास, दोन अगदी परस्परविरोधी चित्रे दिसून येतात. जागतिक परिस्थितीचा विचार केला, तर अत्यंत वाईट टप्प्यावर आहे असे म्हणता येईल. विशेषतः जर आपण एकमेकावारचा ‘विश्वास’ गमावलेला आहे असे वाटते. भू-राजकारणात तो सध्या नीचांकी पातळीवर आहे. म्हणजे, असे कधीही घडले नव्हते की दोन देशांनी एखाद्या गोष्टीबाबत करार करावा आणि अवघ्या १०-१५ दिवसांतच त्यांनी तो मोडीत काढावा किंवा त्यातून माघार घ्यावी, असे या आधी झाले नव्हते. विश्वासाच्या कमतरतेमुळे धोरणे आखणे, तसेच विविध गटांशी जुळवून घेणे किंवा तटस्थ राहणे यांसारख्या गोष्टी अत्यंत कठीण झाल्या आहेत; सध्या आपण नेमके हेच घडताना पाहत आहोत. १०-१५ वर्षांपूर्वी, युद्धासारख्या घटनेला आपण ‘ब्लॅक स्वान इव्हेंट’ (अत्यंत दुर्मिळ आणि अनपेक्षित घटना) म्हणत असू. पण आता, युद्ध ही एक नित्याची बाब बनली आहे. त्यामुळे, ‘ब्लॅक स्वान’ वगैरे सोडा, आता युद्ध ही व्यवस्थेचा एक नियमित भाग झाली आहे.
ही केवळ चढ-उताराची गोष्ट राहिलेली नाही; आता तर प्रश्न असा उरला आहे की, किती युद्धे सुरू आहेत—एक, दोन, तीन, की किती चकमकी घडत आहेत? त्यामुळे, मला वाटते की परिस्थिती अधिक वाईट आहे. त्याशिवाय, पुन्हा, जागतिक स्तरावर, ही गोष्ट म्हणजे विविध देशांसाठी फायदा जास्त आहे.जसे भारताने केले, त्याने आपली तूट कमी केली. म्हणजेच, गेल्या कोविडच्या काळापासून आपण आपली वित्तीय तूट कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत, पण इतर विकसित राष्ट्रांच्या बाबतीत तसे नाही. त्यांची तूट वाढतच गेली आहे आणि त्यांचे कर्ज वाढले आहे. त्याचे परिणाम त्यांच्या व्याजदरात किंवा रोख्यांच्या परताव्याच्या दरात दिसून येत आहेत. आता, हे सर्व जागतिक परताव्याच्या दरांमध्ये प्रतिबिंबित होत असतांना दिसत आहे. त्यामुळे, अमेरिकेत परतावा दर पूर्वी २-३ टक्के असायचा, तो आता ४-५ टक्क्यांच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
जपानमध्ये, तो आता शून्यावरुन ३ टक्क्यांवर पोहचला आहे. तर, जागतिक स्तरावर ही एक समस्या आहेच. भारत, या सर्वांपासून अलिप्त राहू शकत नाही. साहजिकच त्याचे पडसाद भारतात देखील दिसायला लागले आहेत. महागाई वाढली असून, रिझर्व्ह बँकेला व्याजदर वाढविणे क्रमप्राप्त झाले आहे. काही आव्हाने नव्याने समोर आली आहेत. पण मला वाटते की देशांतर्गत पातळीवर परिस्थिती बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे हाताळली गेली आहे. म्हणजे, अर्थातच आपण पाहिले आहे की एका वर्षात रुपयाच्या विनिमय दरात १० टक्क्यांची घसरण झाली आहे; परंतु जर आपण ३-४ वर्षांचा कालावधी विचारात घेतला, तर चित्र वेगळे दिसेल—कारण त्याआधीच्या ३ वर्षांत रुपयाचे मूल्य अजिबात घसरले नव्हते. त्यामुळे, जर तुम्ही एकूण ३-४ वर्षांचा कालावधी पाहिला, तर सरासरी घसरण ३ टक्के म्हणजे सामान्य आहे.
एका वर्षाच्या कालावधीत पाहिल्यास हे अचानक घडल्यासारखे वाटू शकते, परंतु मला वाटते की चलनाची स्थिती एकंदरीत चांगली राहिली आहे. खरं तर, आजच्या घडीला FCNR इत्यादींच्या माध्यमातून येणारा ओघ पाहता, चलनाची स्थिती बऱ्यापैकी स्थिर आणि संतुलित असल्याचे दिसते. केवळ भारताच्या चांगल्या समष्टीमुळे संपूर्ण जग भारतात गुंतवणूक करेल असे नाही. भारतातील सर्व आकडेवारी सकारात्मक आहे, कर संकलन सकारात्मक आहे, वाहनांची मागणी चांगली आहे, ग्रामीण भागातील ग्राहकाभिमुख वस्तूंच्या मागणीत वाढ होत आहे. जागतिक स्थिती भीतीदायक आहे, युद्ध सुरू आहे, किंबहुना कच्च्या तेलाचे दर उच्चांकी आहेत. पण भारतात अशी काही उद्योग क्षेत्रे आहेत जिथे मागणी आहे. त्यामुळे, कंपन्यांची निवड करताना आम्ही अत्यंत चोखंदळ रहाणे गरजेचे आहे. संपूर्ण बाजारात तेजी येईल असे वाटत नाही; मात्र, या बाजारपेठेतही काही निवडक कंपन्या चांगली कामगिरी करत राहतील. आमचा दृष्टिकोन हाच आहे की, आम्ही अशा कंपन्यांची निवड करीत आहोत अशा कंपन्यांची निवड करूनच आम्ही ‘अल्फा’ (बाजारपेठेच्या सरासरीपेक्षा अधिक परतावा) मिळवू शकतो, असे आम्हाला वाटते.
तुम्ही बाजारात जवळपास वीस वर्षांपासून कार्यरत आहात. या वीस वर्षांत तुम्ही बाजाराकडून काय शिकलात?
मला वाटतं की पहिला आणि महत्त्वाचा धडा हा आहे की, आखलेली रणनीती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यात एक मोठी दरी असते. अनेक कंपन्यांची निवड ही रणनीती कागदावर चांगली दिसते. अनेक कंपन्यांना आम्ही भेटतो तेव्हा त्यांचे व्यवस्थापन आम्हाला त्यांच्या रणनीतीबद्दल सांगतात, आमची अमुक योजना आहे’ आणि माझ्यावर विश्वास ठेवा, १० पैकी ९ कंपन्यांच्या रणनीती चांगल्या वाटतात परंतु ९ कंपन्यां पैकी फक्त एखादी कंपनी रणनीतीची योग्य प्रकारे अंमंलबजावणी चांगली करते. दोन वर्षांनी तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा अंमलबजावणीची वेळ येते, तेव्हा हा आकडा खूपच कमी असतो. किंबहुना, सातत्यपूर्ण अंमलबजावणीचा अभाव आढळतो.
एखादी सध्या सारखी कठीण परिस्थिती समोर येते. या कंपन्यांना त्यांनी सांगितलेल्या रणनीतीकडे परत येणं खूपच आव्हानात्मक वाटतं. तर, रणनीती आणि अंमलबजावणीमधील ती तफावत, मला वाटते, आश्चर्यकारक आहे. जर तुम्हाला अशा कंपन्या सापडल्या ज्या सातत्याने चांगली अंमलबजावणी देखील करू शकतात, तर वर्षानुवर्षे त्यांच्या परताव्यातील तफावत चक्रवाढ पद्धतीने वाढत जाते. त्या चांगल्या अंमलबजावणीचा केवळ चक्रवाढ वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे, आपण सर्वसाधारणपणे जेवढे म्हणतो त्यापेक्षा अंमलबजावणीला खूप जास्त महत्त्व दिले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे, मूल्यांकन हे गुंतवणूकदारांसाठी एक उपयुक्त साधन आहे. मात्र, कोणत्याही क्षेत्रातील किंवा कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर केवळ मुल्यांकनाच्या आधारावर निर्णय घेणे जोखमीचे ठरू शकते आणि त्यात चूक होण्याची शक्यता असते. कारण सुरुवातीच्या टप्प्यावर, एखादी कंपनी भविष्यात कशी वाढेल किंवा तिचे स्वरूप कसे असेल, हे केवळ मुल्यांकनावरून समजून घेणे कठीण असते. अशा वेळी, अधिक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असते.
कंपनी नेमके काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे आणि गोष्टी कशा प्रकारे आकाराला येत आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. याशिवाय, कंपनी आपले भांडवल (कॅपिटल) कशा प्रकारे वापरत आहे—म्हणजेच भांडवलाचे वाटप कसे केले जात आहे, ते विवेकाने वापरले जात आहे का, आणि व्यवस्थापन क्षमता कशी विकसित केली जात आहे—या गोष्टींकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे असते. तो टप्पा ओलांडल्यानंतर, जेव्हा तुमची कंपनी एका सामान्य स्थितीत येते—अगदी पूर्णपणे प्रगल्भ झाली नाही तरी चालेल, पण एक स्थिर किंवा सामान्य स्थिती गाठते—तेव्हा मला वाटते की, तिथून पुढे कंपन्यांचे मूल्यमापन करणे हे एक अत्यंत उपयुक्त साधन ठरते. सुरुवातीच्या टप्प्यात, कंपन्या ‘स्मॉल कॅप’मधून ‘मिड कॅप’मध्ये आणि त्यानंतर ‘लार्ज कॅप’मध्ये प्रवेश करतात; अगदी तशाच प्रकारे.मूल्यमापनाकडे एक व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन असायला हवा; आणि शेवटी, एका फंड मॅनेजरसाठी, मला वाटते की ‘अहंकार’ हा सर्वात मोठा शत्रू असतो.
बाजार तुम्हाला नम्र व्हायला शिकवतो. मी हे स्वीकारायला शिकले आहे की चुका होऊ शकतात. चुका कशा प्रकारच्या असू शकतात? समजा, आपण एखादी गोष्ट खरेदी केली, पण तिची किंमत खाली आली किंवा ती अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही. अशा वेळी, ‘ती पुन्हा वर येईलच’ असे म्हणून त्या गुंतवणुकीला चिकटून राहायचे, की ती चूक मान्य करून त्यातून बाहेर पडायचे हे ठरवायला हवे. जर तुम्हाला वाटत असेल की ती एक चूक होती, तर ती मान्य करून बाहेर पडा आणि त्याऐवजी नवीन निर्णय घ्या. मला वाटते, ही गोष्ट तुमच्या गुंतवणुकीचा प्रवास अधिक सुलभ बनवते.
एक फंड मॅनेजर म्हणून, तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना काय संदेश द्याल?
सर्वप्रथम हाच सल्ला असेल की बाजारात वेळ साधण्याचा प्रयत्न करू नये. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता, एसआयपी करता, तेव्हा बाजार वर जातो, खाली येतो, मग हुशारीने योग्य वेळ साधून गुंतवणूक केल्यास काय होते, तर ते अगदी उलट ठरते. तुम्ही बाजाराच्या सर्वात वाईट परिस्थितीत बाहेर पडता आणि बाजाराच्या उच्चांकी पातळीवर प्रवेश करता. योग्य वेळ साधण्याच्या नादात जवळपास ५०% परतावयाला तुम्ही मुकता. तुम्हाला फक्त उरलेला ५०% परतावाच मिळतो. म्हणून, गुंतवणूकदारासाठी सर्वोत्तम कल्पना ही आहे की, बाजाराची वेळ साधण्याऐवजी, बाजारात टिकून राहावे. दुसरी गोष्ट म्हणजे, सातत्य ठेवा आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा.
दृष्टिकोन असा नसावा की, तुम्ही २-३ वर्षे चांगली कामगिरी केली आणि आता बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. हे दीर्घकाळासाठी केले पाहिजे, वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांच्या परताव्याच्या मागे धावू नका. साधारणपणे कल काय असतो, ज्या मालमत्ता वर्गाने चांगली कामगिरी केली आहे, तिथे आपण गुंतवणूक करतो. दोन वर्षांपूर्वी, सोने हा एक मल्टी-ॲसेट पर्याय होता. त्यामुळे तसे करण्याऐवजी, तुम्ही तुमच्या गरजेकडे लक्ष द्या. तुमची गरज समजून घ्या, मला किती दीर्घकालीन दृष्टिकोन हवा आहे, अल्प मुदतीसाठी किती पैशांची गरज आहे, स्थिरतेसाठी किती सोन्याची गरज आहे, हे पाहून तुम्ही तुमच्या प्रोफाइलनुसार तुमचा पोर्टफोलिओ तयार करा. कोणता फंड गट सर्वोत्तम कामगिरी करत आहे अ हे शोधून त्या फंड गटाचा पाठलाग करण्याऐवजी, गुंतवणूकदाराने अशा प्रकारे पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे.
संकलन – वसंत कुलकर्णी
संकल्पना – गौरव मुठे
