Daily SIP vs Monthly SIP Returns : गेल्या काही वर्षात सर्वात लोकप्रिय झालेला गुंतवणूक पर्याय म्हणजे एसआयपी. चांगला परतावा, मोबाईल अ‍ॅप्समुळे वाढलेली सुलभता आणि आर्थिक साक्षरतेमुळे पारंपारिक बचतीपेक्षा एसआयपीकडे लोकांचा कल जास्त आहे. एकरकमी पैसे गुंतवण्याऐवजी दरमहा ठराविक रक्कम गुंतवल्याने आर्थिक शिस्तही पाळली जाते. मात्र, अलीकडच्या काळात ‘फोनपे’ (PhonePe) सारख्या फिनटेक प्लॅटफॉर्म्समुळे ‘डेली एसआयपी’ म्हणजेच रोजच्या रोज एसआयपी करण्याचा ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे. दरमहा, आठवड्याला आणि दररोज (डेली) एसआयपी केल्याने परताव्यात किती फरक पडतो? कोणासाठी फायदेशीर आहे?

डेली एसआयपीमध्ये पाचपट वाढ

डेली एसआयपी म्हणजे जे पैसे तुम्ही दरमहा गुंतवणूत होते, तेच आता दररोज गुंतवले जातील. ‘फोनपे म्युच्युअल फंड्स’च्या अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२६ दरम्यान ‘फोन-पे म्युच्युअल फंड्स’मध्ये डेली एसआयपीद्वारे होणाऱ्या व्यवहारात पाच पटीने वाढ झाली आहे. यात दररोज सरासरी ५० रुपयांची गुंतवणूक केली जात असून, तब्बल ७७% गुंतवणूकदार छोट्या आणि निमशहरी भागातील आहेत.

गुंतवणुकीच्या वारंवारतेने परताव्यावर फरक पडतो का?

म्युच्युअल फंड एसआयपी ही ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’च्या तत्त्वावर काम करते. जेव्हा बाजार तेजीत असतो, तेव्हा कमी युनिट्स मिळतात तर घसरणीत तेवढच्या रकमेत जास्त युनिट्स मिळतात. त्यामुळे बाजारातील अल्पकालीन चढ-उतारांचा गुंतवणुकीवर होणारा धोका कमी होतो. मात्र, गुंतवणूक दररोज, दर आठवड्याला की दरमहा केली जाते, याने लाभांशावर किंवा दीर्घकालीन परताव्यावर काही फार मोठा किंवा लक्षणीय फरक पडत नाही, असे अर्थतज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे.

तुलनात्मक विश्लेषण: डेली vs वीकली vs मंथली एसआयपी

वैशिष्ट्ये डेली एसआयपी (Daily SIP)वीकली एसआयपी (Weekly SIP)मंथली एसआयपी (Monthly SIP)
गुंतवणुकीची वारंवारताप्रत्येक ट्रेडिंग दिवशीआठवड्यातून एकदामहिन्यातून एकदा
वार्षिक व्यवहार२५० पेक्षा जास्त५२ व्यवहार१२ व्यवहार
कोणासाठी योग्य?व्यावसायिक, लहान दुकानदार, रोजचे उत्पन्न असणारे ज्यांना आठवड्याला उत्पन्न मिळतेनोकरदार वर्ग
किमान गुंतवणूक दररोज १० पासून सुरू (उदा. PhonePe वर) फंडाच्या नियमांनुसारफंडाच्या नियमांनुसार
रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगसर्वात जास्त बाजारातील किमतींचा अनुभव मध्यम दीर्घकाळात अत्यंत प्रभावी
हिशोब ठेवणे अत्यंत गुंतागुंतीचे (२५०+ व्यवहार) मध्यम सर्वात सोपे (केवळ १२ व्यवहार)
दीर्घकालीन परतावासुमारे समानसुमारे समानसुमारे समान

दररोजच्या एसआयपीमुळे जास्त परतावा मिळतो का?

दररोज गुंतवणूक केल्याने बाजारातील चढ-उतारांचा फायदा मिळण्याची शक्यता थोडी जास्त असली, तरी दीर्घकाळात (५ ते १० वर्षे) मंथली आणि डेली एसआयपीच्या परताव्यात फारसा फरक राहत नाही. शेअर बाजारातील परतावा हा कंपन्यांची आर्थिक प्रगती, देशाची अर्थव्यवस्था आणि तुम्ही किती काळ गुंतवून राहता यावर अवलंबून असतो. तुम्ही कोणत्या दिवशी पैसे टाकले यावर नाही.

आर्थिक सल्लागारांचा महत्त्वाचा सल्ला

  • पगाराचे चक्र उत्तम जुळत असल्याने नोकरदारांसाठी मंथली एसआयपी उत्तम आहे. दरमहाची एसआयपी ट्रॅक करायला सोपी आणि सोयीस्कर असते.
  • ज्यांचे उत्पन्न रोजच्या रोज येते (उदा. छोटे व्यापारी, दुकानदार, फ्रीलान्सर्स), त्यांच्यासाठी दररोज १० किंवा ५० रुपये गुंतवणे सोपे जाते.
  • गुंतवणूक दररोज, दर आठवड्याला की दरमहा केली जाते, हे महत्त्वाचे नसून बाजारातील चढ-उतारात टीकून राहणे हे संपत्ती जमवण्याचे खरे सूत्र आहे.