Direct vs Regular Mutual Funds : म्युच्युअल फंड सही है! असं म्हणत अनेकजण गुंतवणूक करतात. मात्र, प्रत्येकाला अपेक्षित परतावा मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बहुतांश लोकांना अजूनही यातील बारकावे माहिती नाही. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताना अनेकदा गुंतवणूकदारांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे ‘डायरेक्ट’ प्लॅन निवडावा की ‘रेग्युलर’? वरवर पाहता या दोन्ही योजना सारख्याच वाटत असल्या, तरी त्यांच्यातील एक सूक्ष्म फरक तुमच्या दीर्घकालीन नफ्यावर मोठा परिणाम करू शकतो.
म्युच्युअल फंडाच्या एकाच स्कीमचे दोन प्रकार असतात, डायरेक्ट आणि रेग्युलर. या दोन्हीमध्ये एकच पोर्टफोलिओ, एकच फंड मॅनेजर आणि एकच गुंतवणूक धोरण असते. मात्र, तरीही या दोन्हीच्या परताव्यामध्ये तफावत दिसते. यामागचे मुख्य कारण म्हणजे ‘कमिशन’ आणि ‘खर्चाचे प्रमाण’.
नेमका फरक काय?
- डायरेक्ट प्लॅन : जेव्हा तुम्ही थेट म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवरून किंवा कोणत्याही मध्यस्थाशिवाय गुंतवणूक करता, तेव्हा त्याला डायरेक्ट प्लॅन म्हणतात. यामध्ये कोणालाही कमिशन द्यावे लागत नाही.
- रेग्युलर प्लॅन : जेव्हा तुम्ही एखाद्या एजंट, ब्रोकर किंवा डिस्ट्रिब्युटरमार्फत गुंतवणूक करता, तेव्हा त्याला रेगुलर प्लॅन म्हणतात. ही प्रक्रिया सोपी असली, तरी यामध्ये मध्यस्थाला कमिशन दिले जाते.
डायरेक्ट फंडाचा परतावा जास्त का असतो?
डायरेक्ट फंडाचा गुंतवणूक व्यवस्थापनाचा खर्च कमी असतो, कारण त्यात वितरकाचे कमिशन समाविष्ट नसते. दरवर्षी वाचणारे हे अर्धा ते एक टक्का कमिशन चक्रवाढ पद्धतीने जोडले गेल्यामुळे, दीर्घकाळात डायरेक्ट प्लॅनमध्ये रेगुलर प्लॅनपेक्षा जास्त परतावा मिळतो.
मग रेग्युलर प्लॅनचे महत्त्व काय?
ज्या गुंतवणूकदारांना बाजाराची तांत्रिक माहिती नाही किंवा स्वतःहून फंड निवडणे कठीण वाटते, त्यांच्यासाठी रेगुलर प्लॅन फायदेशीर ठरतो. एक चांगला सल्लागार तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांनुसार योग्य फंड निवडण्यास मदत करतो. बाजारातील चढ-उतारांच्या वेळी घाईने चुकीचे निर्णय घेण्यापासून सल्लागार तुम्हाला रोखू शकतो. कागदपत्रांची पूर्तता आणि पोर्टफोलिओचा आढावा घेण्यासाठी सल्लागाराची मदत होते.
गुंतवणूकदारांनी काय निवडावे?
जर तुम्हाला स्वतःला शेअर बाजाराची माहिती असेल, तुम्हाला म्युच्युअल फंडातील तांत्रिक गोष्टी समजतात आणि बाजाराच्या अस्थिरतेत तुम्ही संयम राखू शकत असाल, तर ‘डायरेक्ट प्लॅन’ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. यामुळे तुमच्या खर्चात कपात होऊन परतावा वाढतो. मात्र, जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल तर, अतिरिक्त फी देऊन ‘रेग्युलर प्लॅन’ निवडणे सुरक्षित ठरेल.
या चुका टाळा
केवळ डायरेक्ट फंड स्वस्त आहेत म्हणून त्यात गुंतवणूक करणे पुरेसे नाही. शेअर बाजारात सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे संयम. अनेक गुंतवणूकदार बाजार पडल्यावर घाईने पैसे काढतात किंवा चांगल्या परताव्याच्या मागे लागून वारंवार फंड बदलतात. या चुकांमुळे होणारे नुकसान हे रेग्युलर फंडाच्या कमिशनपेक्षाही जास्त असू शकते. त्यामुळे तुम्ही कोणताही प्लॅन निवडा, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि सातत्य राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.
