Edelweiss Altiva Equity Long Short Fund NFO : शेअर बाजारात पारंपरिक लार्ज-कॅपपेक्षा अधिक परताव्याची अपेक्षा असणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. एडलवाइज म्युच्युअल फंड आणि अल्टिवा एसआयएफने संयुक्तपणे ‘अल्टिवा इक्विटी लाँग-शॉर्ट फंड’ हा नवीन मुक्त-कालावधीचा इक्विटी लाँग-शॉर्ट फंड लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या तारखा
नवीन फंड ऑफर (NFO) १० सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होऊन २४ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल. किमान गुंतवणूक मर्यादा १० लाख रुपये असणार आहे. (विद्यमान गुंतवणूकदारांसाठी अतिरिक्त गुंतवणूक १,००० रुपये आणि त्यानंतर पटीत). ही गुंतवणूक रणनीती नफ्टी १०० टिआरआय (Nifty 100 TRI) ला बेंचमार्क मानते.
सीईओ राधिका गुप्ता काय म्हणाल्या?
एडलवाइज म्युच्युअल फंडाच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता या लॉन्च प्रसंगी बोलताना म्हणाल्या, “अल्टिवा एसआयएफ प्लॅटफॉर्मला गुंतवणूकदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत आमच्या पहिल्या दोन फंडांनी ११,००० कोटी रुपयांचा एयूएम टप्पा ओलांडला आहे. हा नवा फंड आता लार्ज-कॅप क्षेत्रापर्यंत आमचा दृष्टिकोन नेत असून, डेरिव्हेटिव्ह्जच्या माध्यमातून लार्ज-कॅप समभागांमधील अस्थिर अल्फाच्या आव्हानावर मात करणे हा आमचा उद्देश आहे.”
पोर्टफोलिओ वाटप कसे असणार?
- हा फंड लार्ज कॅप+ रणनीतीवर आधारित असून, याद्वारे लार्ज-कॅप समभागांसोबतच उत्पन्न-केंद्रित डेरिव्हेटिव्ह्जचा अतिरिक्त स्तर जोडण्यात आला आहे.
- दीर्घकालीन बाजार भांडवलाच्या आधारे अंदाजे ८० टक्के वाटप लार्ज-कॅप समभागांमध्ये आणि २० टक्के वाटप मिड- व स्मॉल-कॅप समभागांमध्ये केले जाईल.
- कव्हर्ड कॉल्स, स्ट्रॅडल्स आणि स्ट्रँगल्स यांसारख्या डेरिव्हेटिव्ह रणनीतींचा वापर करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, बाजार परिस्थितीनुसार हे उत्पन्न बदलू शकते.
फंडचे व्यवस्थापन आणि वैशिष्ट्ये
- इक्विटी पोर्टफोलिओचे व्यवस्थापन भारत लाहोटी आणि भावेश जैन पाहतील, तर अमित व्होरा हे ओव्हरसीज फंड मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत.
- युनिट्स वाटपाच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत किंवा ९० व्या दिवशी विक्री केल्यास किंवा स्विच केल्यास ०.५० टक्के एक्झिट लोड आकारला जाईल; त्यानंतर कोणताही लोड असणार नाही.
- फंड डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅन अंतर्गत Growth व IDCW पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
कोणासाठी योग्य?
ज्या गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन ३ ते ५ वर्षांचा आहे, ज्यांना कोअर इक्विटी गुंतवणुकीसह पारंपरिक लार्ज-कॅपपेक्षा अधिक परताव्याची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी हा फंड योग्य ठरू शकतो. मात्र, शुद्ध इंडेक्स-ट्रॅकिंग किंवा अल्पकालीन गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी हा पर्याय नाही.
